Sunday, May 19, 2024
Homeअग्रलेखसावध ऐका पुढल्या हाका!

सावध ऐका पुढल्या हाका!

महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणाचा अलीकडच्या काळात बराच उद्घोष सुरु आहे. महिलांनी एखादे क्षेत्र काबीज केले किंवा कर्तृत्व दाखवले की त्यांचे विशेष कौतूक केले जाते. अमेरिकेत अनेक मोठमोठ्या कंपन्यात अनेक भारतीय महिला उच्चाधिकारी बनल्या आहेत त्याचे कौतूकाचे रकाने माध्यमात आढळतात. महिलांच्या कार्यकर्तृत्वावर चित्रपट बनवले जातात. जागतिक महिला दिवस जगभर साजरा होतो. असा कौतूकसोहळा फक्त महिलांच्याच वाट्याला का येतो? कारण परंपरेने त्यांना बहाल केलेले दुय्यमत्व. भारतीय समाजव्यवस्था पुरुषप्रधान आहे. त्यामुळे महिलांवर परंपरेने दुय्यमत्व लादलेच गेले. विविध कारणांनी ते दुय्यमत्व दिवसेदिवस अधिकाधिक घट्ट होत गेले. ‘सातच्या आत घरात’ अशी नानाप्रकारची बंधने जणू काही महिलांसाठीच बनवली गेली. महिलांनी घरगुती आणि सामाजिक स्तरावर कसे वावरावे? कसे राहावे? याची चौकट घट्ट होत गेली. महिलांना निर्णय स्वातंत्र्य कायमच नाकारले गेले. महिलांनी कर्तृत्वाचे कितीही मोठे शिखर गाठले तरी त्या त्यांचे घर कसे सांभाळतात यालाच आजही अनन्यसाधारण महत्व दिले जाते. सानिया मिर्झा ही भारताची आघाडीची टेनिसपटू. या खेळात तिने कायमच मैदान गाजवले. ‘तु सेटल कधी होणार?’असा प्रश्न तिलाही एका मुलाखतीत विचारला गेला होता. तेव्हा, ‘जगात नंबर वनला असणार्‍या आणि सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या मुलींनी आणखी कशात सेटल व्हावे? त्यांचे सेटल होणे म्हणजे नेमके काय?’ अशा आशयाचा समर्पक प्रती प्रश्न सानियाने संबंधित मुलाखतकाराला केला होता. तात्पर्य, दुय्यमत्वाचे हे जोखड पिढ्यानपिढ्या चालत आले आहे. ते महिलांच्या इतके अंगवळणी पडले आहे की त्यात काही गैर आणि अन्यायकारक आहे याची जाणीवच राहिलेली नाही. त्यामुळेच एखादीने हे जोखड फेकून देण्याचा प्रयत्न केला तर महिलाच तिला मागे खेचतात. तिला वेगवेगळी विशेषणे बहाल करतात. एकाच कुटुंबातील मुलाला आणि मुलीला वेगवेगळ्या पद्धतीने वाढवले जाते हा सार्वत्रिक अनुभव आहे. तथापि बदल हा काळाचा स्थायीभाव आहे. त्यामुळे मुलींना व तरुणींना मात्र हे दुय्यमत्व आता खटकू लागले आहे. काही जणी या जोखडाला आव्हान द्यायचा प्रयत्न करु लागल्या आहेत. ‘सक्षम असुनही स्वत:कडे कमीपणा घेणे किंवा तो स्वीकारणे तू कसे सहन करु शकते?’ असा प्रश्न काही घरातील तरुण मुली त्यांच्या आईला सुद्धा विचारु लागल्या आहेत.‘आपण सक्षम आहोत. आपल्याला कोणाचीच दडपशाही खपणार नाही. त्यामुळे लग्न करायचा विचारच नाही’ अशी टोकाची मतेही अनेक तरुण मुली व्यक्त करताना आढळतात. बंधने नाकारण्याचे धाडसही क्वचित वाढीस लागत आहे. गेल्या वर्षभरात राज्यातील दोनशे पेक्षा जास्त मुलींनी घर सोडले. चालू वर्षाच्या (2022) पहिल्या तीनच महिन्यात 80 अल्पवयीन मुली घर सोडून निघून गेल्या आहेत. सोशल मीडियाचा अतिरेक, कौटुंबिक विसंवाद, मार्गदर्शनाचा अभाव ही त्याची कारणे सांगितली जातात. तथापि घराघरात मुलींना मिळणारी दुय्यम वागणूक हे त्याचे एक प्रमुख कारण असावे याची नोंद क्वचितच घेतली गेली आहे. घर सोडून गेलेल्या काही मुलींना शोधण्यात पोलीसांना यश आले. त्या मुलींशी संवाद साधला गेला तेव्हा त्यांनीही दुय्यमत्वाचा मुद्दा उपस्थित केला. मुलींच्या वाट्याला आपुलकी येत नसल्याचेही मत काहींनी व्यक्त केले असे माध्यमात यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे. अडनिड्या-अजाणत्या वयातील मुली घर सोडून जात आहेत ही गंभीर सामाजिक समस्या होऊ शकते. वेळीच त्याबाबत विचारवंत समाजतज्ञांनी या समस्येची दखल घ्यायला हवी. मुलींच्या मानसिकतेत होणारा बदलही नजरेआड करता येण्यासारखा नाही. समाजाचे भविष्यातील चित्र ही आकडेवारी दर्शवते का? दुय्यमत्व नको म्हणून घर सोडणे हे मुलींनी उचललेले पाऊल चुकीचे आहे. त्याचे विपरित परिणाम कदाचित काही मुलींना भोगावे लागू शकतात. पण दुय्यमत्वाचे जोखड फार काळ लादले जाऊ शकणार नाही याची दखल पालकही घेतील का? मुलीसुद्धा स्वतंत्रपणे निर्णय घेऊ पाहात आहेत हे परंपराप्रिय समाजाला कदाचित मानवणार नाही. तथापि शोषणाची आणि अन्यायाची जाणीव नवीन पिढीला तीव्रतेने होऊ लागली आहे हे नजरेआड सुद्धा करुन चालणार नाही. या बदलाचे दुष्परिणाम कसे टाळावेत याचे मार्गदर्शन समाजधुरीण वेळीच समाजाला करतील का?

- Advertisment -

ताज्या बातम्या