घारगाव |वार्ताहर| Ghargaon
संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रुक येथे तीन वर्षांच्या चिमुरडीला चॉकलेटचे आमिष दाखवून जवळ बोलावण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी (दि.9) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जगदीश संपत हांडे यांचे गावात किराणा दुकान आहे ते दुकानात होते. त्यांची पत्नी घरात शिवणकाम करत होती, तर तीन वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत होती. याच दरम्यान एक कार तेथे आली. कारमधून खाली उतरलेल्या एका व्यक्तीने हातातील चॉकलेट दाखवून मुलीला स्वतःजवळ बोलावण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलगी कारजवळ गेली नाही. त्यानंतर संबंधित व्यक्तीने चॉकलेट खाली ठेवून बाजूला जाण्याचा प्रयत्न केला, तरीही मुलगी त्याच्याकडे जाण्यास तयार झाली नाही.
दरम्यान, कारमध्ये बसलेल्या एका महिलेने हिंदी भाषेत आवाज देत मुलीला चॉकलेट घेण्यासाठी बोलावले. अनोळखी व्यक्तीचा हिंदी भाषेतील आवाज ऐकून मुलीच्या आईला संशय आला. तिने तातडीने घराबाहेर धाव घेतली. त्यावेळी तिला एक पुरुष आणि एक महिला दिसली. मुलीच्या आईला पाहताच या दोघांनीही चॉकलेट तिथेच सोडून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच जगदीश यांचे बंधू वैभव हांडे यांनी घारगाव पोलिसांशी संपर्क साधला. या घटनेमागील नेमका उद्देश काय होता, संबंधित व्यक्ती मुलीला कशासाठी बोलावत होत्या, याबाबत परिसरात विविध शंका व्यक्त केल्या जात आहेत. मात्र, या व्यक्तींचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही.
संशयितांचा शोध घेण्याची मागणी…
या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासावे, संबंधित कारचा क्रमांक व अन्य माहिती मिळवावी आणि त्या महिला-पुरुषांचा शोध घेऊन सखोल चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. लहान मुलांना चॉकलेट किंवा अन्य वस्तूंचे आमिष दाखवून जवळ बोलावण्याच्या प्रयत्नांबाबत पालकांनी सतर्क राहण्याची गरज या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे. घारगाव पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




