अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यातील मुलींची घटती संख्या ही गंभीर व चिंताजनक बाब ठरत असताना, गर्भात असलेल्या चिमुकलीचे संरक्षण आणि स्त्रीभ्रूणहत्येस आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील प्रत्येक गावात विशेष ग्रामसमितीची स्थापना करण्यात आली आहे.
या माध्यमातून समाजजागृती व प्रभावी अंमलबजावणीचा संकल्प करण्यात आला आहे. या ग्रामसमितीमध्ये सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, आशासेविका, ए.एन.एम. तसेच शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख यांचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामसमिती अधिक सक्षम व कार्यक्षम होण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी दिली.
‘स्त्री जन्माचे स्वागत करा’ या चळवळीच्या आद्यप्रवर्तक तसेच पी.सी.पी.एन.डी.टी. स्टेट डव्हायझरी बोर्डच्या सदस्या डॉ. सुधा कांकरिया यांच्या संकल्पनेतून 11 कलमी कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात 26 जानेवारीच्या ग्रामसभेत स्त्रीजन्म स्वागताचा ठराव, प्रत्येक ग्रामपंचायतीत 0 ते 6 वयोगटातील मुला-मुलींची संख्या दर्शविणारा माहिती फलक, लोकसहभागातून कन्याजन्म आनंद सोहळ्यासाठी 10 रूपयांची जादू योजना, गर्भवती मातांसाठी गर्भरक्षण व गर्भसंस्काराचे मार्गदर्शन (ए.एन.सी. ट्रॅकिंग- मैत्री योजना), सामुदायिक डोहाळे जेवणाचे आयोजन, फक्त मुली असलेल्या कुटुंबांचा सन्मान, नकोशीसारखी नकारात्मक नावे बदलून नकोशीला करूया हवीशी पुनर्नामकरण उपक्रम,
विवाहसोहळ्यात आठवा फेरा- स्त्रीजन्माच्या स्वागताचा, सोनोग्राफी मशीन : शाप की वरदान? या विषयावर जनजागृती, सामूहिक शपथ कार्यक्रम, दहा तालुक्यांत कार्यशाळा यांचा समावेश आहे. डॉ. कांकरिया यांच्या प्रमुख उपस्थितीत आतापर्यंत अहिल्यानगर, श्रीरामपूर, राहाता, कोपरगाव, श्रीगोंदा, पाथर्डी, शेवगाव, राहुरी, नेवासा आणि पारनेर या तालुक्यांमध्ये कार्यशाळा यशस्वीपणे पार पडल्या आहेत. या कार्यशाळांमध्ये डॉ. कांकरिया लिखित स्त्री जन्माचे स्वागत करा या पुस्तकाच्या प्रती जनजागृती व लोकशिक्षणासाठी वितरित करण्यात आल्या. या पुस्तकामध्ये 9 नाटिका, प्रेरणादायी कविता, कायद्याची माहिती तसेच 11 कलमी कृती कार्यक्रमाचा सविस्तर समावेश आहे. तसेच 11 कलमी कार्यक्रमाच्या माहितीपत्रिका देखील सहभागी सदस्यांना देण्यात आल्या.




