Monday, October 12, 2026
HomeनगरAhilyanagar : पशूधन वाचविण्यासाठी डोअर टू डोअर सर्वेक्षण

Ahilyanagar : पशूधन वाचविण्यासाठी डोअर टू डोअर सर्वेक्षण

चारा उपलब्धतेचा घेतला जातोय गावोगावी आढावा || सिंचनाची सोय असलेल्या शेतकर्‍यांकडून चारा उत्पादनाचे नियोजन

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पावसाने ओढ दिली, पाणीसाठे आटू लागले आणि खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले. आता पुढील उन्हाळ्यात पशुधनासाठी चारा कुठून आणायचा, असा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. या संभाव्य संकटाची चाहूल घेत पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यात गावोगावी डोअर टू डोअर सर्वेक्षण सुरू केले आहे.
प्रत्येक शेतकर्‍याकडील लहान-मोठे पशुधन, उपलब्ध हिरवा व सुका चारा, पिण्याच्या पाण्याची स्थिती आणि चारा उत्पादनासाठी उपलब्ध सिंचन क्षेत्राची माहिती संकलित करण्यात येत आहे. गेल्या चार-पाच दिवसांत तब्बल 50 हजारांहून अधिक पशुपालकांची माहिती संकलित झाली असून, या आकडेवारीच्या आधारे आगामी काळातील चारा उपलब्धतेचे नियोजन केले जाणार आहे.

- Advertisement -

अहिल्यानगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वांत मोठ्या जिल्ह्यांपैकी एक असून, येथे पशुधनाची संख्या लाखोंच्या घरात आहे. दूध उत्पादक जनावरांची संख्या मोठी असल्याने चारा आणि पाण्याची उपलब्धता हा ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत यंदा जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत सुमारे 66 टक्के पाऊस झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील सर्व 14 तालुक्यांचा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विचार सुरू असताना, आगामी उन्हाळ्यात पशुधनाच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील तीन मोठ्या धरणांचा अपवाद वगळता अनेक लहान-मोठ्या पाणी साठवण प्रकल्पांमध्ये मर्यादित पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याची उपलब्धता कमी झाल्यास चारा पिकांच्या उत्पादनावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात चार्‍यासाठी होणारी संभाव्य धावपळ टाळण्यासाठी राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन विभागाने आतापासूनच माहिती संकलनावर भर दिला आहे.

दुष्काळात पिके वाचविण्याबरोबरच पशुधनाचे संगोपन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच चार्‍याची संभाव्य गरज आणि उपलब्धता यांचा ताळमेळ घालण्याचे आव्हान पशुसंवर्धन विभागासमोर आहे. सर्वेक्षणातून समोर येणार्‍या आकडेवारीचे प्रत्यक्ष चारा उत्पादनात रूपांतर किती प्रभावीपणे होते, यावर आगामी काळातील नियोजनाचे यश अवलंबून असेल.

दोन लाखांहून अधिक दूध उत्पादकांचा अंदाज
जिल्ह्यात दोन लाख दोन हजार ते दोन लाख दहा हजारांच्या दरम्यान दूध उत्पादक शेतकरी असल्याचा पशुसंवर्धन विभागाचा अंदाज आहे. याशिवाय केवळ शेळी व मेंढीपालन करणार्‍या पशुपालकांचीही स्वतंत्र माहिती संकलित केली जात आहे. जिल्ह्यातील पशुधनाची सुधारित आकडेवारी उपलब्ध करून घेण्यासोबतच भविष्यातील चारा उत्पादनाचे नियोजन करण्यासाठी हे सर्वेक्षण महत्त्वाचे ठरणार आहे.

सीईओ भंडारी यांचे आवाहन
हिरव्या आणि सुक्या चार्‍याची उपलब्धता, जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची स्थिती, रब्बी हंगामात चारा लागवडीसाठी योग्य असलेले क्षेत्र आणि सिंचनाची सुविधा असलेली जमीन, अशा विविध बाबींची माहिती घेतली जात आहे. या माहितीच्या आधारे चारा उत्पादन वाढविण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याचे नियोजन करण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी या सर्वेक्षणात शेतकर्‍यांनी पशुसंवर्धन विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

सर्वेक्षणात घेण्यात येत असलेली माहिती
पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्ह्यात सध्या सुरू असणार्‍या सर्वेक्षणात प्रत्येक गावातील घर टू घर शेतकर्‍यापर्यंत पोचून त्यांच्याकडे असणारे गाय वर्ग कंसात लहान व मोठे व एकूण तसेच म्हैस वर्ग एक वर्षावरील एक वर्षाखालील आणि एकूण पशुधन यापैकी दुखी जनावरे दैनंदिन दूध उत्पादन कंसात लिटरमध्ये शेळ्या मेंढ्या कंसात बंदिस्त व स्थलांतरित यांची आकडेवारी घेण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात तालुका निहाय जनावरांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध आहे का याची स्वतंत्र माहिती घेण्यात येत असून उपलब्ध हिरवा व सुका चारा याची माहिती घेण्यासोबत सध्या विक्रीसाठी उपलब्ध असणारा चारा रब्बी हंगामात चारा लागवडीसाठी योग्य क्षेत्र आणि सिंचन सुविधा उपलब्ध असणारे क्षेत्रची स्वतंत्र माहिती पशुसंवर्धन विभागाकडून घेण्यात येत आहे.

चारा किती, जनावरे किती; गावनिहाय हिशोब सुरू
या सर्वेक्षणासाठी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच नोंदणीकृत पशुवैद्यकीय सेवा देणार्‍या खासगी पशुवैद्यकांची मदत घेतली जात आहे. प्रत्येक गावात घरोघरी जाऊन पशुधनाची संख्या, जनावरांचे प्रकार, दूध उत्पादन आणि चारा उपलब्धतेची माहिती नोंदवली जात आहे. यामुळे कोणत्या गावात किती पशुधन आहे, सध्या किती चारा उपलब्ध आहे आणि आगामी काळात किती चार्‍याची गरज भासू शकते, याचा अंदाज बांधणे शक्य होणार आहे. केवळ सध्याच्या चारा साठ्याची माहिती घेण्यापुरते हे सर्वेक्षण मर्यादित नाही. ज्या शेतकर्‍यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशा शेतकर्‍यांची स्वतंत्र माहितीही संकलित केली जात आहे. संबंधित शेतकर्‍यांच्या घरी आणि शेतात प्रत्यक्ष भेट देऊन पाण्याची उपलब्धता, चारा लागवडीसाठी योग्य क्षेत्र आणि बियाणे उपलब्ध करून दिल्यास किती चारा उत्पादित होऊ शकतो, याची पडताळणी केली जात आहे. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उमेश पाटील आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दशरथ दिघे यांनी ही माहिती दिली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : उमेदवारीसाठी एकमेकांना वाकुल्या; माघारीच्या डेडलाईनकडे लक्ष

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत माघारीसाठी अवघे दहा दिवस उरले असताना राजकीय गणितांना वेग आला आहे. बिनविरोध निवडणुकीसाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असतानाच...