अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
दुष्काळी परिस्थितीचा सामना करणार्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकर्यांना कर्जमाफीमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची तिसरी यादी जाहीर केली असून, यात जिल्ह्यातील 6 हजार 727 शेतकर्यांना 63 कोटी रुपयांची कर्जमाफी मंजूर झाली आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून आतापर्यंत एक लाख नऊ हजार शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालय आणि जिल्हा बँकेच्या सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात यंदा पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप हंगामावर परिणाम झाला आहे. अनेक भागांत पिकांची वाढ खुंटली असून, रब्बी हंगामाच्या पेरण्यांबाबतही अनिश्चितता आहे. अशा परिस्थितीत कर्जमाफीच्या तिसर्या यादीत समावेश झालेल्या शेतकर्यांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेच्या पहिल्या यादीत जिल्हा सहकारी बँकेच्या 66 हजार शेतकर्यांचा, तर दुसर्या यादीत 36 हजार शेतकर्यांचा समावेश झाला होता. आता तिसर्या यादीत आणखी 6 हजार 727 शेतकर्यांना लाभ जाहीर झाला आहे. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकर्यांची संख्या एक लाख नऊ हजारांवर पोहोचली आहे.
तिसर्या यादीतील 6 हजार 727 शेतकर्यांसाठी 63 कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित शेतकर्यांना कर्जाच्या परतफेडीचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे. मात्र, कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी, पात्र शेतकर्यांच्या खात्यांतील नोंदी आणि लाभ वितरणाची स्थिती यानुसार अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी सध्या पावसाअभावी अडचणीत आहेत. खरीप उत्पादन घटण्याची शक्यता, वाढता शेतीखर्च आणि आगामी रब्बी हंगामाची चिंता या पार्श्वभूमीवर कर्जमाफीचा लाभ महत्त्वाचा मानला जात आहे.




