नाशिक | Nashik
राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या अशा एकूण २८८ सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकींसाठी ०२ डिसेंबरला मतदान तर ०३ डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केली. तसेच आजपासून निवडणूक जाहीर झालेल्या नगर परिषदा व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू झाल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) एकूण ११ नगरपरिषदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
जिल्ह्यातील भगूर,मनमाड,नांदगाव, सटाणा, येवला, सिन्नर, चांदवड, इगतपुरी, ओझर,पिंपळगाव बसवंत आणि त्र्यंबकेश्वर या नगरपरिषदांसाठी निवडणुका होणार आहेत. यातील अध्यक्षपदासाठी त्र्यंबकेश्वर, येवला (ओबीसी) तर सटाणा, इगतपुरी आणि भगूर या ओबीसी महिला प्रवर्गाकरिता राखीव झाल्या होत्या. तर सिन्नर, नांदगाव आणि मनमाड या नगरपरिषदा अध्यक्षपदासाठी खुल्या प्रवर्गाकरिता आरक्षित झाल्या होत्या.
दरम्यान, याशिवाय पिंपळगाव बसवंत अनुसूचित जमाती खुला आणि चांदवड अनुसूचित जाती व ओझर अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या होत्या. त्यानंतर आता निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने खऱ्या अर्थाने निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे.
निवडणूक कार्यक्रम
- नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात – १० नोव्हेंबर २०२५
- नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम मुदत – १७ नोव्हेंबर २०२५
- नामनिर्देशनपत्रांची छाननी – १८ नोव्हेंबर २०२५
- अपील नसलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र माघारीची अंतिम मुदत – २१ नोव्हेंबर २०२५
- अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशन माघारीची अंतिम मुदत – २५ नोव्हेंबर २०२५
- मतदानाचा दिवस – ०२ डिसेंबर २०२५
- मतमोजणीचा दिवस- ०३ डिसेंबर २०२५
एकूण मतदार व मतदान केंद्र
- पुरुष मतदार- ५३,७९,९३१
- मसहला मतदार- ५३,२२,८७०
- इतर मतदार- ७७५
- एकूण मतदार – ०१,०७,०३,५७६
- एकूण मतदान केंद्र – सुमारे १३,३५५
एकूण जागा आणि आरक्षित जागा
- निवडणूक होत असलेल्या नगरपरिषदा – २४६
- निवडणूक होत असलेल्या नगरपंचायती – ४२
- एकूण प्रभाग – ३,८२०
- एकूण जागा- ६,८५९
- महिलांसाठी जागा – ३,४९२
- अनुसूचित जातींसाठी जागा- ८९५
- अनुसूचित जमातींसाठी जागा- ३३८
- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा- ०१,८२१
नाशिक विभाग एकूण – ४९ जागा
अहिल्यानगर – १२
धुळे – ०४
जळगाव – १८
नंदुरबार – ०४
नाशिक – ११




