अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सुमारे साडेतीन वर्षापासून रखडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगासह जिल्हा निवडणूक विभागाची पूर्व तयारी सुरु झाली आहे. आज (सोमवारी) जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या 75 गट आणि 150 गणांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर होणार आहे. दरम्यान, जाहीर होणार्या या प्रभाग रचनेकडे इच्छुकांचे लक्ष राहणार असून या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 23 हजार 633 कर्मचार्यांची गरज भासणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून संबंधीत कर्मचार्यांची माहिती संकलित करण्यास सुरू करण्यात आली आहे.
साधारण दिवाळीनंतर नगरसह राज्यात जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या निवडणूका होणार आहेत. या निवडणूकांची पूर्व तयारी राज्य निवडणूक आयोगासह जिल्हा निवडणूक विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या 75 गटांची आणि पंचायत समितीच्या 150 गणांची सुधारित प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहे. ही प्रभाग रचना जाहीर झाल्यावर त्यावर हरकती आणि सुचना घेण्यात येणार आहेत. दरम्यान, मागील आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाने निवडणूका होणार्या जिल्ह्यातील जिल्हाधिकार्यांकडून निवडणुकीसाठी आढावा घेतला आहे. यात मतदान केंद्र, मतदान यंत्रांची उपलब्ध यासह आवश्यक असणार्या निवडणूक अधिकारी- कर्मचारी यांची माहिती अद्यावत करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच निवडणुकीसाठी आवश्यक असणार्या मास्टर ट्रेनर यांचा माहितीचा आढावा घेण्यात आला आहे.
नगर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्यच्या निवडणुकीसाठी 23 हजार 605 अधिकारी- कर्मचार्यांची कुमक गरजेची असून यासह 14 तालुक्याचे 14 निवडणूक अधिकारी, 14 सहाय्यक निवडणूक अधिकारी असे 23 हजार 633 कर्मचार्यांची माहिती संकलनाचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे. या कर्मचार्यांची निवडणूक कामी नेमणूक करणे, त्यांना जबाबदार्या वाटून देणे, निवडणूक कामकाजाचे प्रशिक्षण आदी कार्यक्रम जिल्हा प्रशासनाकडून राबवण्यात येणार आहे.
आजपासून प्रभागनिहाय इच्छुकांची गोळाबेरीज
जिल्ह्यात गट आणि गणाची अंतिम प्रभाग रचना पुढील महिन्यांत 18 ऑगस्टला होणार आहे. दरम्यान प्रसिध्द होणार्या प्रभागात कोणती गावे राहणार याची गोळा बेरीज आजपासून सुरू होणार आहे. तसेच झालेली प्रभाग रचना यात दोष असल्यास त्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे अपिल करता येणार आहे. या अपिलावर सुनावणी होवून राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. आज जाहीर होणार्या प्रभाग रचनेवर निवडणूकांचे पुढील भवितव्य अवलंबून राहणार आहे.




