अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मिनी विधानसभा समजल्या जाणार्या नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू सुरू झाले असताना सोमवारी मुंबईत जिल्ह्यातील 11 नगरपरिषद व 4 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करण्यात आले आहे.
या सोडतीमध्ये शिर्डी नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिला तर राहुरी नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले आहे. तर कोपरगाव, पाथर्डी, राहाता नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाले असून संगमनेर, जामखेड, शेवगाव या तिन्ही नगराध्यक्षपद खुला प्रवर्ग महिलांसाठी, देवळाली प्रवरा, श्रीगोंदा व श्रीरामपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद खुला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. नगरपंचायतमध्ये नेवासा नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद खुला प्रवर्गासाठी निश्चित झाले आहे.
नगराध्यक्षपदाची निवडणूक जनतेमधून होणार असल्याने मिनी विधानसभा निवडणूक नगरपरिषद व नगरपंचायतसाठी ठरणार आहे. जिल्ह्यात गेल्या सहा वर्षांपासून नगरपरिषदांच्या निवडणूक रखडल्या आहेत. त्यात श्रीगोंदा, जामखेड व शेवगाव या नगरपरिषदांच्या तर नेवासा नगरपंचायतीची निवडणुक दोन वर्षापासून झाली नाही. आता या सर्वच नगरपरिषदा व नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
शिर्डी नगरपरिषदेची पहिली निवडणूक होत असून नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने या ठिकाणी अनेकांची कोंडी झाली आहे.
याठिकाणी राखीव असणार्या अनुसूचित जाती महिला नगराध्यक्ष होणार आहे. तर राहुरीमध्ये अनुसूचित जमातीसाठी नगराध्यक्षपद राखीव झाल्याने स्पर्धा कमी झाली आहे. कोपरगाव, पाथर्डी, राहाता नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी राखीव झाल्याने या ठिकाणी स्पर्धा वाढली आहे. ओबीसी प्रमाणपत्र ज्याकडे आहे, तो नगराध्यक्षपदाची निवडणूक लढू शकतो. त्यामुळे पाथर्डी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे.
देवळाली प्रवरा, श्रीगोंदा व श्रीरामपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद खुला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. या तिन्ही नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक चुरशी होणार असल्याचे दिसत आहे. खुला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने सर्वच मातब्बर या निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यात श्रीगोंदा नगरपरिषदेची निवडणूक महत्वाची ठरणार आहे. नेवासा नगरपंचायतीचे आरक्षण खुला प्रवर्गासाठी निश्चित झाल्याने या ठिकाणी चुरस निर्माण झाली आहे.
असे आहे आरक्षण
अनुसूचित जाती 1, अनुसूचित जमाती व्यक्ती 1, ओबीसी व्यक्ती 6, खुल्या प्रवर्गातील व्यक्ती 4 आणि खुल्या प्रवर्गातील महिला 3 असे आरक्षण राहणार आहे.
श्रीरामपूर, देवळाली, राहाता, कोपरगाव, श्रीगोंदा, संगमनेर, नेवाशात चुरस वाढणार
जिल्ह्यात श्रीरामपूर, नेवासा, देवळाली प्रवरा, श्रीगोंदा या ठिकाणी नगराध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गासाठी तर शेवगाव, जामखेड, संगमनेर या ठिकाणी खुल्या प्रवर्गातील महिलांचे आरक्षण निघालेले आहे. तसेच राहाता, कोपरगाव, पाथर्डीत ओबीसी आरक्षण आहे. अनेकांनी कुणबी प्रमाणपत्र काढल्याने या ठिकाणीही लढती रंगण्याच्या शक्यता आहे. या ठिकाणी नगरपरिषद अथवा नगरपंचायतींच्या राजकारणात रस असणारे लकी ठरले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणूका झालेल्या नाहीत. आता आरक्षण जाहीर झाल्याने टप्प्याने निवडणुकीच्यादृष्टीने वाटचाल सुरू झाल्याने राजकीय पक्षांसह नेते आणि कार्यकर्ते यांचा हुरूप वाढणार आहे.
पारनेर, अकोले, कर्जतमध्येमुदत संपण्यापूर्वीच आरक्षण
पारनेर, अकोले, कर्जत या तीन नगरपंचायतींची पाच वर्षांची मुदत अद्याप संपली नाही. मात्र पुढील वर्षी या नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहे. त्यापूर्वीच नगराध्यक्षांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. पारनेर व अकोले दोन नगरपंचायतींचे नगराध्यक्ष नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी राखीव झाले असून कर्जत नगरपंचायतींचे नगराध्यक्ष महिला नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाले.
शिर्डी, राहुरीत आरक्षणाने उडवली इच्छुकांची दांडी
जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेचे ठरणारे आणि प्रतिष्ठेचे असणारे शिर्डी नगरपरिषदेचे आरक्षण पद राखीव झाल्याने अनेकांची राजकीय अडचण झाली आहे. अशीच परिस्थिती राहुरीत झाली आहे. या दोन्हीही ठिकाणी खुल्या प्रवर्गातील आणि ओबीसीतील अनेकजण इच्छुक होते. पण त्यांच्या स्वप्नावर विरजण पडले आहे.
28 ऑक्टोबरला मतदार यादी कार्यक्रम
मागील आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला असून प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी येत्या 28 ऑक्टोबरपर्यंत प्रसिध्द करण्यात येणार आहे. यात प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी उद्या 8 ऑक्टोबरला त्यानंतर 13 ऑक्टोबरपर्यंत प्रारूप मतदार यादीवर हरकती व सुचना दाखल करण्याचा कालावधी राहणार आहे. तसेच हरकती व सूचनावर सुनावणी झाल्यानंतर 28 ऑक्टोबरला अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिध्द करण्यात येवून 7 नोव्हेंबरला मतदार केंद्रांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 1 जुलै 2025 पर्यंत नोंदणी झाल्या मतदारांची नाव या मतदार यादी राहणार आहे. त्यानुसार विधानसभेच्या मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन करून ती यादी नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी वापरता येणार आहे. तसेच आयोगाने स्पष्ट केले आहे.





