Monday, May 27, 2024
Homeनाशिकलॉकडाऊन कायम; नाशिकमध्ये काय सुरु, काय बंद? पहा एका क्लिकवर

लॉकडाऊन कायम; नाशिकमध्ये काय सुरु, काय बंद? पहा एका क्लिकवर

नाशिक | प्रतिनिधी

राज्यातील करोना अद्याप नियंत्रणात आलेला नाही. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आज पुन्हा लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये रेड झोनमध्ये निर्बंध कायम तर ऑरेंज झोनमध्ये काही प्रमाणात शिथिलता पाळली जाणार आहे.

- Advertisement -

अस्तित्वातील लॉक डाऊन 3 ला शासनाने दि 31 मे पर्यंत मुदत वाढ दिली आहे. कोणत्याही नवीन /वेगळ्या सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे आपल्या स्तरावर देखील अस्तित्वात असलेल्या लॉक डाऊनला मुदत वाढ देण्यात आली आहे. बाकी काही बदल नाहीत. करोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या अधिकारानूसार नाशिकमध्ये रेड झोन मधील कंटेनमेंट झोन वगळता इतर व्यवहार मात्र पूर्वीप्रमाणे ९ ते ५ या वेळेतच सुरू राहणार आहेत. शासनाच्या निर्देशानूसार यात वेळोवेळी बदल करण्यात येतील असे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे.

नाशिक जिल्हा रेड झोनमध्ये असला तरी जिल्हयातील १५ पैकी ५ तालुके हे ऑरेंज झोनमध्ये आहे. तर १० तालुके रेड झोनमध्ये आहेत. करोनासाठी मालेगांव तालुका हॉटस्पॉट ठरत आहे. जिल्हयातील सर्वाधिक रूग्ण हे मालेगांव तालुक्यात आढळून आले आहेत तसेच आसपासच्या ग्रामीण भागातही करोनाने शिरकाव केला आहे.

शहरी भागात करोना नियंत्रणात आहे. त्यामुळे रेड झोनमधीलदेखील व्यवहार सुरु आहेत. यात केवळ कंटेनमेंट झोनमध्येच शिथिलता देण्यात आलेली नाही. उद्योगांना कारखाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मालेगांव शहर जवळपास ९० टक्के प्रतिबंधित असल्याने तिथे केवळ जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व व्यवहार मात्र बंदच राहणार आहेत.

शिथिलता असलेल्या ठिकाणी सामाजिक अंतर, तोंडाला मास्क लावणे, दुकानातील किंवा कार्यालयातील कर्मचारयांना स्वच्छतेसाठी सर्व साधने उपलब्ध करून करून ग्राहकांची काळजी घेणे दुकानदारांना आवश्यक करण्यात आले आहे.

नाशिकमध्ये एकूण १८६ प्रतिबंधित क्षेत्रे आहेत. यामध्ये नाशिक शहर २३, मालेगांव महापालिका क्षेत्रात ११९, मालेगांव ग्रामीण २, नांदगाव ३, येवला १२, चांदवड २, नाशिक ग्रामीण ६, निफाड ९, सिन्नर ५, दिंडोरी ३, कळवण १, बागलाण १ कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवा वगळता बाहेर जाता येणार नाही अगर आतही येता येणार नाही.

जिल्ह्यात नाशिक महापालिका व देवळाली कॅन्टोनमेंट क्षेत्र यासोबतच, मालेगाव महापालिका हदद व तालुका, निफाड, चांदवड, सिन्नर, येवला, नांदगाव, दिंडोरी, बागलाण, कळवण हे तालुके रेड झोनमध्ये आहेत. तर इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, देवळा हे तालुके ऑरेंज झोनमध्ये आहेत.

या सेवा बंदच 

बससेवा, रेल्वे, टॅक्सी, रिक्षा, सलून, स्पा, सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यायामशाळा, खेळ, संकुले, जलतरण तलाव, करमणूक उद्याने, बार, सभागृह, सर्वशाळा, कॉलेज, शैक्षणिक, प्रशिक्षण, कोचिंग संस्था, आंतरजिल्हा व आंतरराज्यीय वाहतूक, जिल्हांतर्गत आणि जिल्हाबाहेर बस वाहतूक इत्यादी.

- Advertisment -

ताज्या बातम्या