सार्वमत
नवी दिल्ली – कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने तीन भागात देशाचे विभाजन केले आहे. पहिला हॉटस्पॉट जिल्हे, दुसरे कोरोनाचे रुग्ण आढळले पण हॉटस्पॉट नसलेले नॉन-हॉटस्पॉट जिल्हे आणि तिसरा ग्रीन झोन जिथे कोरोना रुग्ण नाहीत, असे वर्गीकरण करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली. देशातील जवळपास 170 जिल्हे हॉटस्पॉट घोषित केले जातील. तर हॉटस्पॉट नसलेले 207 जिल्हे आहेत असेही ते म्हणाले.
केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी बुधवारी देशातील विविध राज्यांचे पोलीस महासंचालक, आरोग्य सचिवालय, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महापालिका आयुक्त आणि जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. खासकरून राज्यांमध्ये ज्या ठिकाणी हॉटस्पॉट आहेत त्या राज्यांच्या प्रमुख अधिकार्यांशी कॅबिनेट सचिवांनी चर्चा केली. स्थानिक पाथळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव कसा रोखायचा आणि कोण-कोणत्या उपययोजना राबवायच्या याच्या सूचना संबंधित अधिकार्यांना देण्यात आल्या, असं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं. हॉटस्पॉट आणि कंटेन्मेंटच्या नियोजनाची सविस्तर माहिती त्यांना दिली गेली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढण्याची घोषणा केली. यासोबतच 20 एप्रिलपर्यंत देशातील प्रत्येक शहराची आणि जिल्ह्याची तपासणी केली जाईल. कुठल्या भागात आणि जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत आणि तिथे कशा प्रकारे रुग्णांवर उपचार सुरू आहेत हे बघितले जाईल. हे तपासण्यासाठी केंद्राकडून काही दिशानिर्देश जारी केले जातील, असं पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी सांगितलं होतं. त्यानुसार आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना दिशानिर्देश जारी केले आहेत.
लॉकडाऊनच्या कालावधीचा पूरेपूर उपयोग करावा लागेल. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत जे यश आले आहे त्यानुसार पुढेही काम करायचे आहे. यानुसार देशातील जिल्ह्यांचे तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे. पहिल्या प्रकारात हॉटस्पॉट जिल्हे, दुसर्या प्रकारात हॉटस्पॉट नसलेले पण तिथे कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत असे जिल्हे आणि तिसरा प्रकार म्हणजे ग्रीन झोन जिल्हे या जिल्ह्यांमध्ये एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही, असे तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे.
हॉटस्पॉट ?
ज्या ठिकाणी कोरोनाचे अधिक रुग्ण आढळून येत आहेत किंवा कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण अधिक आहे किंवा रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचे प्रमाण वाढत आहे, असे जिल्हे हॉटस्पॉटमध्ये येतात.