Wednesday, September 11, 2024
Homeनगरलोहगाव खून खटल्यात 9 जणांना जन्मठेप

लोहगाव खून खटल्यात 9 जणांना जन्मठेप

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

राहाता तालुक्यातील लोहगाव येथे शेतीच्या वादातून गौरव अनिल कडू यांचे डोक्यात कुदळ मारून व लोखंडी रॉडने मारहाण करून खून केल्याच्या खटल्यातील आरोपी अमोल दिलीप नेहे, किशोर लहानु नेहे, वसंत लहानु नेहे, सुरेश लहानू नेहे, सचिन वसंत नेहे, प्रसाद प्रकाश नेहे, आकाश रोहिदास चेचरे, मयुर रोहिदास चेचरे, जगन्नाथ किसन पडांगळे यांना कोपरगाव येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

- Advertisement -

याबाबत लोणी पोलीस ठाण्यात आरोपींविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन कोपरगाव येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात वरील नऊ आरोपींविरुद्ध दोषारोप सिध्द होऊन त्यांना सत्र न्यायाधीश बी.एम.पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

सदर खटल्यामध्ये सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता शरद गुजर यांनी काम पाहीले. सदर प्रकरणात एकूण अकरा महत्त्वाचे साक्षीदार तपासले. त्यामध्ये फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, स्पॉट पंच, जप्ती पंच, पी. एम. रिपोर्ट, तपासी अधिकारी यांचे जबाब नोंदविण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार याची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकारी वकिलांनी त्याचे युक्तिवादात सर्व मुद्दे न्यायालयापुढे सिध्द केले. सरकारी अभियोक्ता यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून कोपरगाव येथील सत्र न्यायाधीश बी.एम. पाटील यांनी सर्व नऊ आरोपी यांना भा.दं.वि. कलम 302, 307, 148, 149 अन्वये दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

तसेच एक लाख ऐंशी हजार रुपयांचा दंड ठोठावला असून त्या दंडाच्या रकमेपैकी मयताच्या कुटुंबास नुकसान भरपाई पोटी एक लाख पन्नास हजार रुपये देण्याचे आदेश करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा तपास सपोनि समाधान पाटील यांनी केला असून कोर्ट पैरवी सहाय्यक फौजदार नारायण माळी यांनी काम पाहिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या