नाशिक | प्रतिनिधी Nashik
जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी आज मतदान होत आहे. सकाळपासून विविध ठिकाणच्या मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे मतदानासाठी मतदारांचा उत्साह दिसून येत आहे. मात्र अशातच नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी त्र्यंबकेश्वरच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर मतदान केले. यावेळी मतदान केल्यानंतर शांतिगिरी महाराजांनी आपल्या गळ्यातील फुलमाळा फेकून ईव्हीएम मशीनला घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचा आरोप विरोधकांनी केला. यानंतर मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी सदर घटनेची दखल घेत याप्रकरणी शांतीगिरी महाराज यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना शांतिगिरी महाराज म्हणाले की, मतदान केंद्र हे पवित्र ठिकाण असून आम्ही शुद्ध भावनेतून पूजा केल्याचे त्यांनी म्हटले.