Saturday, June 15, 2024
Homeनगरलोकसभेच्या निकालाआधीच विधानसभेची ‘पोस्टरबाजी’

लोकसभेच्या निकालाआधीच विधानसभेची ‘पोस्टरबाजी’

‘यंदा फक्त तात्याच’ ने वेधले श्रीरामपूरकरांचे लक्ष

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीचा निकाल आज (दि. 4 जून) जाहीर होणार आहे. या निकालाआधीच विधानसभेच्या उमेदवारीची ‘पोस्टरबाजी’ सुरु झाली आहे. श्रीरामपूर नगरपालिकेजवळ लावलेल्या ‘यंदा फक्त तात्याच!’ या पोस्टरने श्रीरामपूरकरांचे लक्ष वेधले आहे.

श्रीरामपूर विधानसभा हा काँगे्रस पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. सन 2014 च्या मोदी लाटेतही भाऊसाहेब कांबळे यांच्या विजयाने हा मतदारसंघ कायम राखण्यात पक्षाला यश आले आहे. त्यानंतरच्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही लहू कानडे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये येवूनही या मतदारसंघातील मतदार काँग्रेसच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिल्याने कानडे यांचा विजय सोपा झाला. हा इतिहास पाहता काँग्रेसच्या बालेकिल्ल्यास भेद देणेे विरोधकांना आतापर्यंत जमलेले नाही. त्यामुळे काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी या मतदारसंघात नेहमी स्पर्धा असते.

आगामी विधानसभा निवडणुकीस अवघा पाच ते सहा महिन्यांचा अवधी असल्याने काँग्रेस पक्षाची उमेदवारी आपणास मिळावी यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरु झाले आहेत. त्यात विद्यमान आ. लहू कानडे व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणिस हेमंत ओगले यांच्यात स्पर्धा सुरु आहे. आ. लहू कानडे आतापर्यंतच्या

त्यांच्या आमदारकीच्या काळात मतदार संघात केलेल्या विकास कामांच्या तसेच विद्यमान आमदार या निकषावर आगामी विधानसभेची उमेदवारी आपणासच मिळेल असा दावा करीत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणिस हेमंत ओगले गेली 15 वर्षे उमेदवारीची प्रतिक्षा करुनही उमेदवारी मिळाली नाही तरी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून या मतदारसंघात सोशल फौउंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत पक्षाची उमेदवारी आपणास मिळेल, असा दावा करीत आहेत.

गेल्या विधानसभा निवडणूक निकालानंतर थोड्याच दिवसात माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे व आ. लहू कानडे यांच्यात मतभेद झाले. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व माजी आ. डॉ. सुधीर तांबे यांनी अनेकदा त्यांचे ‘मनोमिलन’ करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात यश आले नाही. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे आ. लहू कानडे यांच्या विजयात मोलाचा वाटा असलेला ससाणे गट आता हेंमत ओगले यांच्या पाठिशी आहे.

विधानसभेची दावेदार असलेले हे दोन्ही नेते एका पक्षात असूनही लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान एकाच (महाविकास आघाडी) उमेदवाराचा स्वतंत्रपणे प्रचार करताना दिसले. या निवडणूक निकालात त्यांनी प्रचार केलेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांना श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात विरोधी उमेदवारापेक्षा अधिक मते मिळाली तर आ. कानडे आपण राबविलेल्या प्रचार यंत्रणेचा हा विजय असल्याचा दावा करतील तर ससाणे गट आमची या मतदारसंघात असलेली ताकद आम्ही दाखवून दिली असा दावा करेल. हे दावे-प्रतिदावे निकालानंतर होतील मात्र त्या आधीच विधानसभा निवडणुकीची उमेदवारी ससाणे गटाच्या उमेदवारालाच मिळेल असा दावा करुन या गटाच्या उत्साही कार्यकर्त्यांनी ‘यंदा फक्त तात्याच!’असा फ्लेक्स बोर्ड श्रीरामपूर नगरपालिका प्रवेशद्वाराजवळ लावला आहे. हा फलक श्रीरामपूरकरांचे लक्ष वेधून घेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने जाणारे-येणारे या फ्लेक्स जवळ थांबून हे तात्या कोण? अशी चर्चा करताना दिसत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या