लोणी |वार्ताहर| Loni
मराठा आरक्षणाला पाठिंबा देत लोणी बुद्रुक व खुर्द या दोन्ही गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. रस्त्यावर येऊन घोषणाबाजी करीत मराठा समाजसह इतर समाजाच्या नागरिकांनी सहभागी होत आरक्षणाची जोरदार मागणी केली. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील व शालिनीताई विखे पाटील यांनीही आंदोलनात सहभागी होत आरक्षण मागणीला पाठिंबा दिला.
सोमवारी राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक व खुर्द या दोन्ही गावांतील बाजारपेठ बंद ठेऊन कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी लोणी बुद्रुक येथे पद्मश्री विखे पाटील पुतळ्यासमोर तर लोणी खुर्द येथे वेताळबाबा चौकात नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत मराठा आरक्षणासाठी जोरदार घोषणाबाजी केली. लोणी बुद्रुक येथे संगमनेर रस्ता अडवत आंदोलकांनी काही वेळ रास्ता रोको आंदोलन केले. भगवे झेंडे, भगव्या टोप्या आणि आसमंत दणाणून सोडणार्या घोषणांमुळे आंदोलकांमधील उत्साह द्विगुणित झाला होता.
जिल्हा बँकेचे संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील म्हणाले, अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी आक्रोश करीत आहे. शांततेच्या मार्गाने अनेक आंदोलने करूनही जर न्याय मिळणार नसेल तर समाजाचा संयम सुटू शकतो. सरकारने आता आणखी वेळ न घेता टिकणारे आरक्षण देऊन समाजाचा महत्त्वाचा प्रश्न सोडवावा.
शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या, मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने 58 मोर्चे काढून आपल्या तीव्र भावना सरकारच्या लक्षात आणून दिल्या.सरकारने दिलेले आरक्षण टिकले नाही. परिणामी मराठा समाजातील अस्वस्थता वाढत चालली आहे. समाजातील गरीब माणूस कठीण परिस्थितीचा सामना करीत आहे. केंद्राने आणि राज्याने एकत्रीतपणे यावर समाधानकारक मार्ग काढून टिकणारे आरक्षण द्यावे. या आंदोलनात विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ, शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक व कामगार तसेच विविध समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.