लोणी |वार्ताहर| Loni
राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावात चिकन शॉप चालकाने कोंबडी कापून टाकलेल्या भांड्यात लघुशंका केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये पसरताच गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. आरोपीवर कारवाई करावी या मागणीसाठी अहिल्यानगर जिल्हा सकल हिंदू समाजाने गाव बंदचे आवाहन करीत शनिवारी विराट मोर्चा काढून पोलिसांना निवेदन दिले.
1 जुलै रोजी सकाळी लोणी खुर्द गावातील साद चिकन शॉपमध्ये कोंबडी कापून टाकलेल्या भांड्यात दुकान चालक लघुशंका करीत असल्याचा आरोप एका व्हिडिओच्या माध्यमातून समाज माध्यमावर वेगाने पसरला. त्यातून हिंदू समाजात संतप्त भावना निर्माण झाली. ग्रामपंचायतीने या दुकानदाराला बोलावून घेत त्याला विचारणा केली. संपूर्ण मांसाहारी मार्केट बंद ठेवण्यात आले. सकल हिंदू समाजाने याची गांभीर्याने दखल घेत शनिवारी गाव बंद व निषेध मोर्चाचे आवाहन केले.
दरम्यान, 8 जुलै रोजी या घटनेसंदर्भात किरण नंदकिशोर कोरडे यांनी लोणी पोलिसात फिर्याद दिली.
त्यात सदर दुकानासमोरच आपली बेकारी असून चिकन शॉप चालकाचे कृत्य आमच्यासह आजूबाजूच्या अनेक व्यावसायिकांनी बघितल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. दुकानदाराविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. पोलिसांनी आरोपी साद अल्ताफ शेख, रा. लोणी याच्या विरुद्ध गु.रजि. नं. 413/2025 भादंवि कलम 271, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 115, 117 प्रमाणे गुन्हा दाखल केला. दरम्यान, घटनेला 11 दिवस झाले तरी आरोपीच्या दुकानावर कारवाई झाली नाही, म्हणून संतप्त सकल हिंदू समाजाच्या वतीने शनिवारी लोणीत गाव बंद आणि निषेध मोर्चाचे आयोजन केले होते.
सकाळपासून बंदला व्यावसायिकांनी पाठींबा देत आपली दुकाने बंद ठेवली. वेताळबाबा चौकातून शेकडो हिंदू बांधव मोर्चाने निघून राजमाता जिजाऊ चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक यामार्गाने लोणी पोलीस ठाण्यावर पोहचले. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि राज्य राखीव दलाचे कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. पोलीस ठाण्यावर पोहचल्यावर निषेध सभा झाली. यावेळी आकाश बेग, नवनाथ महाराज म्हस्के यांच्यासह अनेक वक्त्यांची भाषणे झाली. हिंदूंनी जागे व्हा असा नारा त्यांनी भाषणातून दिला. दत्तात्रय खेमनर, संदीप लांडे, प्रसाद बोचरे, स्वप्नील वर्पे, शाम गोसावी, सागर राक्षे, भैय्या गोसावी, बापूसाहेब आहेर, धनंजय आहेर, संजय आहेर यांच्यासह शेकडो हिंदू बांधव यावेळी उपस्थित होते. शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांनी मोर्चेकरांचे निवेदन स्वीकारले.
दुकान काढा, नाहीतर आम्ही काढतो…
आरोपीने अमानवीय कृत्य केले असून हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांचे दुकान अजूनही तसेच आहे. प्रशासनाने तात्काळ हे दुकान काढावे, अन्यथा आम्ही काढतो, असा इशारा आकाश बेग यांनी भाषणातून दिला होता. निषेध मोर्चा संपताच प्रशासनाने तातडीने कारवाई करीत जेसीबीच्या साह्याने सदर दुकान जमीनदोस्त केले.





