Saturday, September 14, 2024
Homeनगरलोणी खुर्द ग्रामसभेत सामाजिक दहशत निर्माण करणारांचा निषेध

लोणी खुर्द ग्रामसभेत सामाजिक दहशत निर्माण करणारांचा निषेध

लोणी |वार्ताहर| Loni

- Advertisement -

संगमनेरच्या नेत्याचे पाठबळ घेवून गावात सामाजिक दहशत निर्माण करणार्‍या प्रवृतींचा ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि महिलांनी रस्त्यावर उतरून निषेध केला. बाहेरच्या महिलांना पाठवून स्थानिक कार्यकर्त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त करणे, खोटे कागदपत्र करून जमिनी बळकावणे, गावातील मुलींना फूस लावून पळविण्यासाठी मदत करणार्‍या व्यक्तींची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे पोलिसांकडे करण्यात आली.

मागील काही दिवसांपासून लोणी खुर्द गावात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रथमच गावातील ज्येष्ठ नागरिक, युवक आणि महिलांनी एकत्रित येऊन आक्रमकपणे ग्रामसभेत या घटनांचा उहापोह केला. या घटना घडविण्यासाठी पाठबळ देणारे स्थानिक नेते बाह्यशक्तीची मदत घेऊन गावात सामाजिक दहशत निर्माण करीत आहे. विविध घटनांमध्ये प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग असलेल्या व्यक्तींवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी केली.

गावातील रहिवासी किरण आहेर यांच्यावर काही दिवसांपूर्वी ‘हॅनी ट्रॅप’च्या माध्यमातून गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेला संगमनेरच्या नेत्यांचे कसे पाठबळ होते याची माहिती त्यांनी दिली. बाहेरील महिलांना पुढे करून स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी यासाठी पुढाकार असून नऊ महिन्यांपासून गावातील लपवून ठेवलेल्या मुलीचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

ज्येष्ठ नेते बाळासाहेब आहेर म्हणाले, अशा गोष्टींसाठी गावाला रस्त्यावर उतरावे लागणे अत्यंत दुर्दैवी आहे. गावाने जुने दिवस पाहिले आहेत. बाहेरच्या माणसांचा हस्तक्षेप कधीही नव्हता, परंतु आता बाह्यशक्तीची मदत घेऊन गावाला बदनाम करण्याचे प्रयत्न महिलांच्या माध्यमातून केले जात आहेत. या घटनांचे कर्तेकरविते कोण आहेत हे पोलिसांनी शोधावे. गावाचे नेतृत्व करणार्‍या व्यक्तीमुळे विकासला खीळ बसली आहे. सहकारी संस्था यांच्याकडे होत्या पण या संस्थाचे नुकसान कसे झाले त्यांना इतरांच्या कामावर बोलण्याचा अधिकार नसल्याचे त्यांनी सांगितले.

कारखान्याचे संचालक संजय आहेर म्हणाले, गावातील शांतता बिघडविण्याचे काम गावातील प्रस्थापित करीत आहेत. ग्रामस्थ नाही तर आता सरकारी कर्मचार्‍यांनाही धमकावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दहशतीच्या वातावरणामुळे विकासाला खीळ बसली असून एकीकडे ना. विखे पाटील यांच्या माध्यमातून निधीची उपलब्धता होत असून दुसरीकडे गावाला बदनाम करण्याचे काम शेजारच्या तालुक्याच्या मदतीने केला जात असल्याची टीका त्यांनी केली.

बाजार समितीचे माजी सभापती बापूसाहेब आहेर यांनी लोणी गावचे गावपण घालविले जात असून बाहेरच्यांचा आधार घेऊन शहाणपणा शिकवायला निघालेल्या स्थानिक व्यक्तींनीच धंदेवाईकांचा आधार घेवून कुटुंब उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू केले असल्याचे सांगितले. शरद आहेर यांनीही हॅनीट्रपच्या जाळ्यामध्ये आपल्याला कसा अडकविण्याचा प्रयत्न केला. खंडणी मागण्याची घटना घडविली गेली आहे. ही घटना घडवून आणणारे आज मोकाट फिरत आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

या ग्रामसभेत महिलांनी उत्स्फूर्तपणे आपल्या भावना व्यक्त करून गावात येणार्‍या अपप्रवृत्तींचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. ग्रामसभेनंतर सर्व महिला आणि युवकांनी मोठ्या संख्येने पोलीस ठाणे गाठून निवेदनाव्दारे पोलिसांकडे या घटनेत सहभागी असलेल्या तसेच या घटना घडवून आणणार्‍या व्यक्तिंविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या