लोणी (वार्ताहर)- रविवारी लोणीत गोळीबार करून श्रीरामपूर येथील तरुणाची हत्या करून पसार झालेल्या सातपैकी चार आरोपींना येवला व शिरूर येथून जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. उर्वरित तिघा आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
रविवार दि. 1 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील हॉटेल साईछत्रमध्ये श्रीरामपूर येथील फरदिन अबू कुरेशी या तरुणावर बंदुकीतून गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यातील सातही आरोपी पसार झाले होते. पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, शिर्डीचे विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी अधिकारी व कर्मचार्यांची वेगवेगळी पथके तयार करून आरोपींचा ठावठिकाणा शोधला.
पुणे जिल्ह्यातील शिरूर व नाशिक जिल्ह्यातील येवला येथून चार आरोपी जेरबंद करण्यात त्यांना यश आले. संतोष सुरेश कांबळे, सिराज आयुब शेख, शाहरुख शहा पठाण हे श्रीरामपूर येथील तर अरुण चौधरी हा लोणी येथील आरोपी गुन्हे शाखेने अवघ्या चोवीस तासांत पकडले. उर्वरित उमेश नागरे, अक्षय बनसोड व शुभम कदम या लोणीतील तिघांचा पोलीस शोध घेत आहेत.
आरोपींना जेरबंद करणार्या पथकात पो. हे. काँ. दत्ता हिंगडे, मनोहर गोसावी, अण्णा पवार, शंकर चौधरी, रवींद्र कर्डिले, विजय वेठेकर, संदीप घोडके, संतोष लोढे, संदीप दरंदले, भागीनाथ पंचमुख, योगेश सातपुते, सागर ससाणे, रवींद्र घुंगासे, संदीप चव्हाण, प्रकाश वाघ, रवी सोनटक्के, मेघराज कोल्हे, सचिन आडबल, विजय ठोंबरे, मयूर गायकवाड, बबन बेरड आदींचा समावेश होता.सर्व आरोपी लोणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पकडलेल्या आरोपीपैकी सिराज शेख याच्यावर श्रीरामपूर, अहमदनगर पोलीस ठाण्यात आठ गुन्हे दाखल आहेत. संतोष कांबळे याच्याविरुद्ध ठाणे, पुणे, जेजुरी, राहुरी, संगमनेर येथे सात गुन्हे दाखल आहेत. तर शाहरुख शहा याच्याविरुद्ध पुणे व औरंगाबाद जिल्ह्यात चार गुन्हे दाखल आहेत.