Sunday, June 14, 2026
HomeनगरRahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

राहाता |प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार जोसेफ सिलास साळवी यांना पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तातडीने शासकीय सेवेतून निलंबित केले आहे.

- Advertisement -

ममदापूर परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध कत्तलखाने सुरू असून त्या ठिकाणी गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल केली जाते. या अवैध व्यवसायाची माहिती मिळूनही बाभळेश्वर पोलीस दूरक्षेत्रात कार्यरत असलेले पोलीस हवालदार जोसेफ साळवी हे कोणतीही प्रभावी कारवाई करत नसल्याची तक्रार पोलीस प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. इतकेच नव्हे तर साळवी यांचे या कत्तलखाना चालकांशी आर्थिक लागेबांधे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षकांनी चौकशीचे आदेश दिले होते. गेल्या एका वर्षात ममदापूर येथे प्राणी संरक्षण अधिनियमान्वये दाखल झालेल्या गुन्ह्यांचा आढावा घेतला असता, साळवी हे या गुन्ह्यातील आरोपींच्या नियमित संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन करणे आवश्यक असताना, साळवी यांनी कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर केल्याचे तपासात स्पष्ट झाले.पोलीस हवालदार साळवी यांचे हे वर्तन अत्यंत बेजबाबदार आणि शिस्तबाह्य असून, यामुळे पोलीस दलाची जनमानसातील प्रतिमा मलीन झाली आहे. या गंभीर प्रकारामुळे त्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलातील भ्रष्ट आणि कर्तव्यात कसूर करणार्‍या कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

ताज्या बातम्या

शेत रस्त्याच्या वादातून तरुणास मारहाण

0
मानूर | वार्ताहर Manur कळवण तालुयातील भादवण शिवारात शेतजमिनीच्या वहिवाट रस्ता वादातून एका तरुणासह त्याच्या वडिलांना मारहाण केली. यामुळे मारहाण झालेल्या युवकाने विष घेत आत्महत्या...