Sunday, March 30, 2025
Homeशब्दगंधवेध ‘लक्ष्या’चा!

वेध ‘लक्ष्या’चा!

निखत झरीनने जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून कमाल केली. तिच्या आजवरच्या संघर्षाचे चीज झाले. आता तिने सगळे वादविवाद मागे सोडत आपल्या कामगिरीवर लक्ष केंद्रित केले. आता तिला ऑलिम्पिक पदक पटकवायचे आहे.

निखत झरीनने जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावून देशाचे नाव उंचावले आहे. भारताच्या पुरुष बॅडमिंटनपटूंनी थॉमस चषक जिंकल्यानंतर निखत झरीनच्या या देदीप्यमान यशामुळे भारतीय क्रीडा क्षेत्राला गगन ठेगणे झाले आहे. निखतने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत फ्लाय वेट (52 किलो) विभागात थायलंडच्या जुटामास जितपोंवर विजय मिळवून झळाळते सुवर्णपदक स्वत:च्या नावे केले. जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा जिंकणारी निखत ही भारताची पाचवी बॉक्सर ठरली असून तिच्या विजयामुळे भारताची चार वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. याआधी 2018 मध्ये मेरी कोमने स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले होते. महिलांच्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेतले हे भारताचे दहावे सुवर्णपदक ठरले. या दहापैकी सहा पदके मेरी कोमने जिंकली असून सरिता देवी, जेनी आर.एल. आणि लेखा सिने प्रत्येकी एक सुवर्णपदक पटकावले आहे. झरीनच्या या विजयामुळे बॉक्सिंगमध्ये कारकीर्द घडवू इच्छिणार्‍या मुलींच्या स्वप्नांना नवे पंख मिळाले आहेत. जिद्द, मेहनत आणि दृढ निश्चयाच्या बळावर एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटंंबातील मुलगी काय करू शकते, हे निखतने दाखवून दिले आहे.

निखत झरीन ही तेलंगणामधल्या सामान्य कुटुंबातील मुलगी. पण आज कुटुंबियांना तिचा प्रचंड अभिमान आहे. निखतने कुटुंबाचेच नाही तर देशाचे नाव उंचावल्याची त्यांना जाण आहे. निखत झरीन ही मोहम्मद जमील अहमद आणि परवीन सुलताना या जोडप्याची तृतीय कन्या. या कुटुंबाला चार मुली. या चौघींमध्ये निखत धडाडीची, हिंमतीची. आयुष्याला एकाच साच्यात न अडकवता काहीतरी वेगळे करावे, असे तिला लहानपणापासूनच वाटायचे. अर्थात, मुलगी असल्यामुळे निखतला संघर्ष काही चुकलेला नव्हता. तिच्याही वाटेत अनेक काटे होते, अडचणी होत्या, अडथळे होते. पण निखतने कशालाही जुमानले नाही. तिला टोमणे ऐकावे लागले, टीका सहन करावी लागली. पण ‘हा माझा मार्ग एकला’ असे म्हणत निखत पुढे जात राहिली.

- Advertisement -

निखतला सुरुवातीपासूनच क्रीडा क्षेत्रात गती होती. ती 100 मीटर, 200 मीटर धावण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घेत असे. निखत वडिलांसोबत जवळच्या क्रीडा संकुलांमध्ये जात असे. या क्रीडा संकुलांमध्ये बॉक्सिंग सोडल्यास अन्य खेळ मुली खेळताना दिसत. छोट्या निखतला ही बाब खटकत असे. तिने वडिलांनाही याबद्दल विचारले. बॉक्सिंग हा पुरुषांचा खेळ आहे, असे तिच्या आसपासचे लोक म्हणत असत. तिला हे अजिबात पटले नाही. बॉक्सिंग हा मुलींचा खेळ नाही हा समज खोटा ठरवायचा होता. म्हणून मग ती बॉक्सिंगकडे वळली. मुलीही उत्तम बॉक्सर होऊ शकतात हे दाखवण्यासाठी निखतने हे आव्हान स्वीकारले. छोट्या शहरांमधली, ग्रामीण भागांमधली गुणवत्ता कोणीतरी हेरावी लागते.

तेलंगणातल्या निझामाबादमध्ये उदयोन्मुख बॉक्सर्सना प्रशिक्षण देणार्‍या शमशुद्दीन यांना निखतची धडाडी, विजिगिषू वृत्ती भावली. निडर निखतने बॉक्सिंगमध्ये कारकीर्द घडवायला हवी, असे त्यांना वाटले. निखत बॉक्सिंगमध्ये मोठी मजल मारू शकते, असा विश्वास त्यांना वाटत होता. मग निखतने वयाच्या तेराव्या वर्षी बॉक्सिंगला सुरुवात केली. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत निखतने बॉक्सिंगच्या आखाड्यात आपली गुणवत्ता दाखवायला सुरुवात केली. करीमनगरमध्ये आयोजित राज्य अजिंक्यपद स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर पंजाबमध्ये आयोजित ग्रामीण राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली.

निखतने या स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर तामिळनाडूत झालेल्या उपकनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेतही तिने सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर ती स्पोर्टस् अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या शिबिरात दाखल झाली आणि आय. व्यंकटेश्वरा राव यांच्या हाताखाली बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेऊ लागली. आठ महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर झरीनने पुन्हा एकदा कमाल केली. 2011 मध्ये तिने मुलींच्या जागतिक कनिष्ठ आणि युवा अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. निखत कायम प्रशिक्षण घेत राहिली, शिकत राहिली. ती कधीही आपल्या ध्येयापासून ढळली नाही. फावल्या वेळात ती बेल्लारी येथील इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टस्मध्ये सराव करत राहायची आणि हेच तिच्या तंदुरुस्तीचे रहस्य आहे.

जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यानंतर निखत झरीन हे नाव भारतीय क्रीडा क्षेत्रात झळकत आहे. आज निखतने सगळे वादविवाद, समज-गैरसमज मागे सोडले आहेत. भारताची बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोमला टोकियो ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळाल्यानंतर निखत झरीनने तिच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. हा वाद चांगलाच चिघळला होता. गुणवत्तेनुसार ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळावा, अशी तिची मागणी होती आणि त्यासाठी निखत मेरी कोमसोबत बॉक्सिंगच्या आखाड्यात दोन हात करायलाही तयार होती. त्यावेळी ही निखत झरीन आहे तरी कोण, असा प्रश्न मेरी कोमने उपस्थित केला होता. निखत झरीनने या प्रश्नाचे उत्तर आपल्या कामगिरीने दिले आहे. निखत झरीन कोण आहे, हे तिने अवघ्या वर्षभरात सिद्ध करून दाखवले आहे.

आता ती बॉक्सिंगमधली वर्ल्ड चॅम्पियन आहे. निखतने मेरी कोमच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करून तिच्यासोबत सामना खेळला खरा पण 22 वर्षांच्या या कोवळ्या तरुणीला मेरी कोमसारख्या दिग्गज आणि कसलेल्या बॉक्सरवर मात करणे शक्य झाले नाही. मेरीने निखतला सहज हरवले आणि ती ऑलिम्पिक खेळायलाही गेली. पण यानंतरही निखतने हार मानली नाही. खांदे पाडले नाहीत. कारण निखतला सुरुवातीपासूनच संघर्ष करावा लागला. या संघर्षातूनच ती घडत गेली, खंबीर होत गेली. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा जिंकणारी निखत शांत बसणारी नव्हती.

यंदाच्या वर्षात मेरी कोमने महत्त्वाच्या स्पर्धा न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धांमध्येही ती सहभागी होणार नव्हती. मेरी कोमच्या अनुपस्थितीचा निखतने पुरेपूर लाभ करून घेतला. तिने स्वत:ला सिद्ध केले. भारताबाहेरच्या बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी निखत झरीन ही मेरी कोमनंतरही फक्त दुसरीच बॉक्सर ठरली आहे. निखतला यावर्षी चांगलाच सूर गवसला आहे. तिने स्टँडजा बॉक्सिंग मेमोरियल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत एकापेक्षा अधिक सुवर्णपदक पटकावणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली. त्यानंतर तिने जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत वर्चस्व गाजवले.

या विजेतेपदानंतर निखत झरीनला 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकचे वेध लागले आहेत. या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचे स्वप्न तिने उराशी बाळगले आहे. ऑलिम्पिक पदक पटकावून निखतला नेहमी पाठीशी उभे राहणार्‍या वडिलांची मान आणखीन ताठ करायची आहे. आता ती ऑलिम्पिकच्या तयारीला लागणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये निखतकडून पदकाची अपेक्षा असेल. त्यामुळे आता मेरी कोमनंतर अवघ्या 25 वर्षांची निखत झरीन हे बॉक्सिंगमधले भारताचे भविष्य असेल यात शंका नाही!

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

सातपूरला भवानी मातेच्या यात्रोत्सवास प्रारंभ

0
सातपूर । प्रतिनिधी Satpur सातपूर गावातील भवानी मातेचा यात्रोत्सव फायर शो आणि फटाक्यांच्या आतषबाजीने मोठ्या उत्साहात पार पडला. गुढीपाडव्यानिमित्त हजारो भाविकांच्या उपस्थितीत (अर्धनारीनटेश्वर) श्रीगणेशाने बारागाड्या...