Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्यानांदूरमध्यमेश्वर जलाशयावर कमळ पुष्पांची चादर

नांदूरमध्यमेश्वर जलाशयावर कमळ पुष्पांची चादर

निफाड । प्रतिनिधी

महाराष्ट्राचे भरतपूर किंबहुना राज्यातील पहिले ‘रामसर’ अशी ओळख असलेल्या तसेच आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झालेल्या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात ( Nandurmadhyameshwar Wildlife Sanctuary) आता पक्ष्यांप्रमाणे विविध फुलांची चादर बघायला मिळत आहे.

- Advertisement -

अभयारण्य परिसरातील नदीपात्रातील पाण्यावर पानथळामध्ये हजारो कमळाची( Lotus) फुले बहरल्याने येथील जलाशयाला जणू सौंदर्याचे कोंदण लाभल्याचे दिसत आहे. साहजिकच हिवाळ्यात पक्षी निरीक्षणाची मेजवानी तर पावसाळ्यात फुलांनी बहरलेला परिसर असे दृश्य दिसत आहे.

मागील करोना संसर्गामुळे पक्षी अभयारण्य पर्यटकांसाठी बंद असल्याने निसर्गप्रेमींना कमळपुष्पांचा आनंद घेता आला नाही. मात्र यावर्षी करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पक्षी अभयारण्य हे निसर्ग व पक्षीप्रेमींना खुले करण्यात आले असल्याचे नांदूरमध्यमेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काळे यांनी म्हटले आहे. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की निसर्ग विविध रंगसंगतीने बहरण्यास सुरुवात करतो. त्याच निसर्गात उमलणार्‍या विविध प्रजातींची फुले मानवाला नेहमीच आकर्षित करत असतात.

नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या ( Nandurmadhyameshwar Wildlife Sanctuary) या जलाशयात अडीच एकरावर यावर्षी राष्ट्रीय फूल ( National flower) असलेल्या कमळाची (Lotus) हजारो फुले फुलली, उमलली असल्याचे दिसून येत आहे. या सौंदर्यात भर घालण्यासाठी गोदावरी नदीच्या अथांग पात्रातील या लाल-पांढर्‍या फुलांवर मोठ्या संख्येने पक्षी बसू लागल्याने येथील निसर्गसौंदर्य अधिकच खुलू लागले आहे.

या अभयारण्यामध्ये करण्यात आलेल्या पक्षी निरीक्षणातून येथे 240हून अधिक प्रकारचे पक्षी आढळून आले आहेत. तर येथील जलाशयात 24 जातींचे मासे व परिसरात 400 हून अधिक प्रजातीच्या वनस्पतींची विविधता आहे. या परिसरात उदमांजर, कोल्हे, मुंगूस, लांडगे, बिबटे, मोर यासह विविध प्रकारचे सर्प दिसून येतात. पावसाळा सुरू झाल्याने अभयारण्य परिसर हिरवाईने नटला असून फुले, पक्षी आणि हिरवाईमुळे या परिसराला सौंदर्याचे कोंदण लाभल्याचे दिसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या