Friday, May 3, 2024
Homeब्लॉगप्रेम ‘दीन’

प्रेम ‘दीन’

गेल्या पाच दिवसांपासून विविध महाविद्यालयांमध्ये अडीच अक्षरांच्या प्रेम दिवसांचा महोत्सव लपून छपून किंवा राजरोसपणे सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. मेट्रो सिटीत हा दिवस युवक युवती मोठ्या उत्साहात साजरा करत असतांना तो खान्देशातही अपवाद वगळता साजरा होत आहे. पाश्चिमात्यांचे अनुकरण म्हणा किंवा पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण म्हणा किंवा भारतीय संस्कृतीवर पाश्चिमात्य संस्कृतीचे अतिक्रमण म्हणत या दिवसास काही संघटना विरोध करत असतात. अशा वेळी ही प्रेमी युगले लपून छपून हा दिवस साजरा करत असतात. संस्कृती कोणतीही असो त्यातील प्रेम हा शब्द आणि त्यामागील भावना महत्वाची ठरते. भारतीय संस्कृतीतही प्रेमाला महत्व दिल्याचे दिसून येते. पाश्चिमात्य असो वा भारतीय या दोन्ही संस्कृतीमध्ये प्रेमात त्याग आणि समर्पणाची शिकवण यातून दिली गेली आहे. ही शिकवण आपण मात्र विसरून त्यामुळे या दिवसाचे अनुकरण नव्हे अंधानुकरण करून त्याचा विपर्यास, अतिरंजितपणा करत त्याचा शेवट हा हिंसकपणे केला जात असल्याने ‘प्रेमदिना’ ऐवजी ’प्रेम दीन’ झाल्याचे घडलेल्या घटनांमधून दिसून येत आहे.

गेल्या मंगळवारपासून विविध महाविद्यालयांसह मेट्रोसिटीत प्रेमाच्या दिवस अर्थात व्हॅलेटाईन डे सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. ख्रिश्चन संत व्हॅलेटाईन यांच्या मरणोपरांत त्यांच्या चाहत्यांनी त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ म्हणा किंवा प्रति आदर म्हणा हा दिवस 14 फेब्रुवारी रोजी साजरा करत आहेत. पाश्चिमात्य देशातून आलेला सण म्हणून यास भारतात विरोध होत असला तरी आपण भारतीय तसे उत्सवप्रियच. त्यामुळे जे जे साजरे करण्यासारखे आहे ते ते कितीही विरोध केला तरी साजरे करणे सोडत नाही. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात. या दिवसाबाबत एक कथा सांगितली जाते. इ.स. 270 च्या आसपास एक ख्रिश्चन संत व्हॅलेन्टाईन होऊन गेले. एका दंतकथे नुसार संत व्हॅलेन्टाईनचा हा बलिदान दिवस आहे.

अन ग्लोबल रूप मिळाले

- Advertisement -

संत व्हॅलेंटाईन यांच्या विषयी अनेक गोष्टी प्रचलित आहेत पण सर्वात लोकप्रिय कथा रोमन किंग क्लॉडियस आणि संत व्हॅलेंटाईन यांची आहे. रोमन किंग क्लॉडियसने याच्या काळात आपल्या सैनिकांना लग्न करण्यास मनाई केली होती, पण संत व्हॅलेंटाईनने अनेक सैनिकांना लग्नासाठी तयार केले आणि त्यांचे लग्न लावून दिले. आपण आपल्या सैनिकांसाठी केलेला आदेश पायदळी तुडवल्याचा रोमन किंगला राग आला आणि त्याने रागाच्या अहंकारात 14 फेब्रुवारी 269 रोजी संत व्हॅलेंटाईनला फाशीवर चढवलं. त्यापुर्वी 14 फेब्रुवारीला रोममध्ये ङ्गर्ङीशिीलरश्रळरफ नावाचा उत्सव साजरा केला जायचा. या उत्सवात मुले बॉक्समधून मुलींच्या नावाच्या चिठ्ठी काढत असत.

उत्सवादरम्यान ही जोडपी प्रेयसी-प्रियकर बनून फिरत असत आणि कधी कधी ते लग्नबंधनात देखील बांधली जात असल्याची गोष्ट आहे. नंतर पुढे चर्चमध्ये हा दिवस ख्रिश्चन उत्सव म्हणून आणि संत व्हॅलेंटाईनच्या स्मरणार्थ हा दिवस एखाद्या सणाप्रमाणे साजरा करण्यास सुरूवात झाली. आणि मग लोक आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी संत व्हॅलेंटाईन नावाचा वापर करू लागले.

संत व्हॅलेंटाईन यांच्या मृत्यूला आणखी एका खास कारणासाठी लक्षात ठेवले जाते. त्या काळात नगर तुरुंगाधिकारी याकोबस नावाची मुलगी होती, ती आंधळी होती. सेंट व्हॅलेंटाईनने जेलरच्या मुलीला तिच्या मृत्यूच्या वेळी डोळे दान केले. यासोबतच जेकबसच्या नावाने एक पत्रही लिहिलं होतं, ज्यात त्याने ‘युवर व्हॅलेंटाइन’ असं लिहिलं होतं. पाश्चित्य संस्कृतीनुसार तत्कालीन काळात ते योग्य असले तरी ही प्रथा आता जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. पण या प्रथेला जे स्वरूप दिले गेलयं ते चुकीचे असल्याचे घडलेल्या दुर्देवी घटनांवरून सिध्द होत आहे.

या प्रथेतला मुळ गाभा आहे तो प्रेमाचा. अर्थात मानवी भावनेचा. आणि प्रेम ही भावना प्रत्येक सजीवात जन्मापासून आहे. ही भावना जर काढून टाकता येणे शक्य नाही. पण म्हणून तीला विकृत स्वरूप देणे हे चुकीचे आहे. त्यामुळेच समाजमन त्यास विरोध करत असतो. एखाद्या व्यक्तीबद्दल मनात प्रेम भावना निर्माण होणे हे निसर्गदत्त आहे. ते त्या व्यक्तीसमोर व्यक्त करणे चुकीचे नाही. पण आपल्या प्रेमाचा स्विकार करण्यास त्याच्या इच्छेविरुध्द भाग पाडणे हे चुकीचे आहे. ‘मेरी नही तो किसी की नही’ असे म्हणत तीला यमसदनी पाठवणे किंवा तीच्या परिवाराला त्रास देत त्यांचाही खून करणे ही कृती कोणत्याही कायद्याला धरून नाहीच नाही तशी प्रेमातही नाही.

‘प्रेम’ केले जाते किंवा होत असते याबाबत दुमत असले तरी प्रेमात रक्तरंजितपणा कधीच मान्य नाही. प्रेम म्हणजे काय हेच नेमके कळलेले नाही. ‘प्रेम’ म्हणजे त्याग आणि समर्पण. आपल्याल्या जी व्यक्ती आवडते किवा त्याच्याबद्दल मनात (हृदयात) ‘ कुछ कुछ होता हैं’ असे वाटते त्याच्या सुखाबाबत विचार केला जातो. त्यासाठी प्रसंगी त्याग ही केला जातो. याचे उदाहरण आपल्या घरातच अनुभवायास मिळते ते आपल्या आईवडीलांकडून. हे दोघेही आपल्या सुखासाठी,करिअरसाठी आणि समाजात एक चांगले नागरीक म्हणून आपली ओळख तयार करण्यासाठी खूप सारे कष्ट करत असतात. आठवा बालपण ते आतापर्यंत. आपण आजारी पडलो तर आईवडील रात्रभर आपल्याजवळ जागे असतात. नोकरी, घरकाम सांभाळून ते आपल्याला रूग्णालयात उपचारासाठी नेतात. आपल्या करीअरसाठी चंगळवादाला तिलांजली देत असतात. आपल्याला यश मिळाले तर सर्वाधिक आनंद नव्हे तर आनंदाश्रु त्यांच्याच डोळ्यात तरळतात.

कवीवर्य मंगेश पाडगावकर म्हणतात ‘पे्रम’ म्हणजे प्रेम असते तुमचे नी आमचे सेम असते.कृष्णाने राधेवर केले ती लिला असते आम्ही केले तर ते लफडे असते. असा विचारही समोर येतो. पण हा विचार मांडतांना कृष्णाच्या आणि राधेच्या निस्सीम,निस्वार्थी आणि त्यागमय प्रेमाचा विसर कसा पडतो. ज्या संत व्हॅलेटाईन यांच्या नावाने हा दिवस साजरा केला जातो त्यांनीही त्यांच्या प्राणांचा त्याग केला. तो विवाहेच्छूंचा विवाह लावून. मृत्यू पत्करला तो ही जेलरच्या मुलीला नेत्रदान करून. एवढच नव्हे तर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले तेही स्वातंत्र्य सैंनिक, तत्कालीन नेते, समाजधुरींधरांच्या त्यागातून. त्यांच्या देशावरील आणि देशातील नागरीकांच्या प्रेमातून. त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी स्वत:च्या परिवारावर आणि घरावर तुळशीपत्र ठेवून. याचा विसर आजच्या दिवशी का पडावा.प्रेमाचा आधारच मुळात त्याग आणि समर्पण आहे. त्यामुळे ज्याच्याबद्दल प्रेम वाटत त्याच्यासमोर व्यक्त करणे एक वेळ चुकीचे नाही.

पण त्यालाही आपल्यावर त्याच्या इच्छेविरूध्द प्रेम करण्यास भाग पाडणे, त्यासाठी त्याचा खुन करणे हे कोणालाच मान्य नाही. आणि म्हणून प्रेम दिवस नसून ते प्रेम ‘दीन’ होत असते. त्यामुळेच हा दिवस आला की अनेकांच्या हृदयाची धडधड वाढत असते कधी ती उत्सुकतेने, अपेक्षेने असते तर कधी ती भयावह असते. कोणी प्रेम नाकारले म्हणून निराश न होता, बस्स आता सर्व काही संपले असे न वाटून घेता मैत्रीपूर्ण त्यास स्विकारा. त्याच्यापासून किंवा तीच्या पासून दुर जातांना मनाला वेदना होतील. पण .. काळ.. हाच मोठे औषध आहे. शाळा महाविद्यालयात वयानुसार प्रेम भावना प्रबळ होत असली तरी सर्वात प्रथम आपल्या करीअरवर लक्ष द्या. कारण प्रेमाने पोट भरत नसते. पोटाची खळगी भरण्यासाठी करीअर आणि कष्ट हवे असतात. त्याचाही विचार करावा. प्रेम विवाह केलेल्या युवतीला तीन महिन्यात का बरे आत्महत्या करावीशी वाटली किंवा त्याला तीचा खून करणे गरजेचे वाटू लागले याचाही विचार हा दिवस साजरा करतांना करणे गरजेचे आहे.

आईवडीलांचा विश्वास व संस्कारांना तडा

समाज माध्यमात अशा वाईट घटना घडल्यावर साधकबाधक प्रतिक्रिया व्यक्त होत असतात. यात त्या दोघांसह त्यांच्या आईवडीलांनाही दोष दिला जातो. ज्यांनी आपल्याला जन्म दिला. आपल्यावर विश्वास ठेवत संस्कारांची रूजवण केली. त्यांच्या 20 वर्षाच्या विश्वासाला 20 मिनीटात तडा देऊन कोणासोबत तरी निघून जात असल्याच्या घटना माध्यमातून वाचत असतो. यातून ऑनर किलींगची प्रकरणेही घडत आहेत. याला अपवाद असले तरी यामुळे मानसिक ताण आणि समाजात विविध प्रतिमा तयार होतात. त्यांच्या मागे भावंडे असल्यास त्यांनाही मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. सज्ञान असल्याचा असाही गैरफायदा घेणार्‍या मुलांमुळे होणारा त्रासही लक्षात घेण्यासारखा आहे. येथे त्यांचे प्रेम ‘दीन’ होत असते.

परिवार व मित्रांसोबतही साजरे करता येईल

आपल्या परिवारासह व मित्रांसोबत एकत्रपणे प्रेम दिवस साजरा करता येईल. यातून परिवारातील सदस्यांसह मित्रांच्या परिवारातील सदस्यांचे ऋणाणूबंध अधिक दृढ होतील. एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होण्यात अधिक आनंद वाटेल.

ज्याच्या त्याचा व्हॅलेंटाईन

या दिवसाला कोणी कितीही विरोध करो वा समर्थन देवो, जो तो आपापल्या परिने हा दिवस साजरा करतच असतो. प्रस्ताव ठेवण्यापासून तर होकार मिळाला आनंद तर कधी नकार मिळाल्याचे दु:ख असो. शेवटी ज्याच्या त्याच्या व्हॅलेटाईन असतो.

निकोप मैत्रीचा आदर्श

होय आजही समाजात जरा उघड्या डोळ्याने पाहिले तर आज अनेकजण असे आढळून येतील की त्यांचे प्रेम होते. पण काही अपरिहार्य कारणामुळे किंवा त्याग, समर्पणांच्या संस्कारामुळे ते व्यक्त करून ही मैत्रीपूर्ण संबध आहेत. की जे त्यांच्या घरीही मान्य आहेत आणि समाजातही. येथे खरे प्रेम असले तरी ते उघड होत नाही. असो व्हॅलेटाईड डे ला जसा विरोध आहे तसा पाठिंबाही देणारे आहेत. हे असे असले तरी प्रेमाचा धागा हा यात कायम आहे. प्रेमात विश्वास, त्याग आणि समर्पण असते. याची जाणिव आजच्या दिवशी प्रत्येकाने मनात रूजवावी.

- Advertisment -

ताज्या बातम्या