Sunday, June 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजLPG Price Hike : सर्वसामान्यांना झटका! घरगुती सिलेंडर महागला; तब्बल 'इतक्या' रुपयांची...

LPG Price Hike : सर्वसामान्यांना झटका! घरगुती सिलेंडर महागला; तब्बल ‘इतक्या’ रुपयांची झाली वाढ

नवी दिल्ली | New Delhi

देशभरात दैनंदिन वापरातील आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने (Central Government) आज (रविवारी) सर्वसामान्यांना आणखी एक आर्थिक झटका दिला आहे. घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात (Domestic Cylinder Price) २९ रुपयांची वाढ करण्यात आली असून, ही नवी दरवाढ रविवारी सकाळपासून लागू झाली आहे. यामुळे आधीच महागाईच्या ओझ्याखाली दबलेल्या सामान्य नागरिकांच्या किचन बजेटवर अतिरिक्त ताण पडणार आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारकडून १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत (Rate) ही वाढ करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीत (Delhi) सिलेंडरचा दर ९१३ रुपयांवरून ९४२ रुपयांवर पोहोचला आहे. तर मुंबईत ९१२.५० रुपयांचा सिलेंडर आता ९४१.५० रुपयांना मिळणार आहे. देशातील इतर भागांतही सिलेंडरच्या दरात समान २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या तीन महिन्यांत घरगुती एलपीजीच्या किमतीत ही दुसरी वाढ आहे. यापूर्वी ७ मार्च रोजी सिलेंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे अल्पावधीतच गॅसच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या दरातही वाढ केली होती. ०१ जूनपासून १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या (Commercial Cylinders) किमतीत ४२ रुपयांची वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात १५८० रुपये असलेला १९ किलो सिलेंडरचा दर आता ३११३.५० रुपयांवर पोहोचला असून, अवघ्या पाच महिन्यांत त्याच्या किमती जवळपास दुप्पट झाल्या आहेत. परिणामी हॉटेल्स आणि खाद्यपदार्थांच्या दरातही वाढ झाली आहे.

दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांच्या माहितीनुसार, घरगुती एलपीजी सिलेंडरवर अद्याप प्रत्येक सिलेंडरमागे सुमारे ७०३ रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे आगामी काळात सिलेंडरच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस आणि अन्नधान्यांच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिक आधीच आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यातच पावसाने ओढ दिल्यास महागाई आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वाढत्या महागाईने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

ताज्या बातम्या

Sharad Pawar : … तर सत्ताधाऱ्यांना वाढत्या महागाईची किंमत मोजावी लागेल...

0
मुंबई | Mumbai केंद्र सरकारने आज (रविवारी) सर्वसामान्यांना आणखी एक आर्थिक झटका दिला असून, घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ केली आहे....