मुंबई | Mumbai
नव्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच आज शनिवार (दि.०१ मार्च रोजी) एलपीजी सिलेंडरचे (LPG Cylinders) नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. यात १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. तर घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी व्यावसायिकांना मोठा झटका बसला आहे.
एलपीजी (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) च्या नवीन दरानुसार केंद्रीय अर्थसंकल्पाच्या (Budget) दिवशी सर्वसामान्यांना काहीसा दिलासा देण्यात आला होता. मात्र, आज नवीन महिन्याच्या पहिल्याच दिवशी १९ किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर सहा रुपयांनी महाग झाला आहे. तर इंडियन ऑइलने जारी केलेल्या नवीन दरानुसार, हे सिलेंडर आता दिल्लीत १८०३ रुपयांना उपलब्ध होईल. फेब्रुवारीमध्ये त्याची किंमत १७९७ रुपये होती, तसेच जानेवारीमध्ये ती १८०४ रुपये होती.
त्यानंतर १ फेब्रुवारी २०२५ रोजी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या (Commercial LPG Cylinders) किमती ७ रुपयांपर्यंत कमी केल्या होत्या. तर मुंबईत एलपीजी सिलेंडरची किंमत आता १७५५.५० रुपये झाली आहे, तर फेब्रुवारीमध्ये ती १७४९.५० रुपये आणि जानेवारीमध्ये १७५६ रुपये होती. यानंतर आता पुन्हा एकदा एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचा खिसा रिकामा होणार आहे.
घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर काय आहेत?
दिल्लीत १४ किलोचा घरगुती एलपीजी सिलेंडर ८०३ रुपयांना विकला जात आहे. तर लखनऊमध्ये १४ किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत ८४०.५० रुपये आहे आणि १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत १९१८ रुपये आहे. याशिवाय कोलकात्यात एलपीजी सिलेंडरची किंमत ८२९ रुपये, मुंबईत ८०२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ८१८.५० रुपये आहे.