अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
एमआयडीसी परिसरातील एल अॅण्ड टी कंपनीच्या कॅन्टीनमध्ये अस्वच्छता, सडलेला भाजीपाला आणि मुदतबाह्य कच्चा माल आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासनाने कॅन्टीनचा परवाना रद्द केला आहे. तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी नोटीस बजावूनही निर्धारित मुदतीत सुधारणा करण्यात आली नाही. त्यामुळे प्रशासनाने ही कारवाई केली. दरम्यान, या कॅन्टीनमध्ये कंपनीतील सुमारे 1 हजार 800 कर्मचारी दररोज जेवण करत असल्याने कर्मचार्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
एमआयडीसी परिसरात एल अँड टी कंपनी असून, या कंपनीतील सुमारे 1 हजार 800 कर्मचारी दररोज कॅन्टीनमध्ये जेवण करतात. मात्र, कॅन्टीनमध्ये स्वच्छतेचा अभाव असल्याने तसेच जेवणाच्या दर्जाबाबत कर्मचार्यांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. यासंदर्भात अनेक कर्मचार्यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने कॅन्टीनची तपासणी करण्याचा निर्णय घेतला.
सहायक आयुक्त गौरव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. प्रदीप पवार यांनी 22 सप्टेंबर रोजी कॅन्टीनची तपासणी केली. या वेळी कॅन्टीनमध्ये अस्वच्छता आढळून आली. तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार आवश्यक असलेल्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कॅन्टीन व्यवस्थापनाला त्रुटी दूर करून आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत 28 सप्टेंबर रोजी नोटीस बजावण्यात आली होती. नोटीस मिळाल्यानंतर 15 दिवसांच्या आत त्रुटींची पूर्तता करणे आवश्यक होते.
दरम्यान, निर्धारित मुदत संपल्यानंतरही कॅन्टीन व्यवस्थापनाकडून आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या की नाही, याची खातरजमा करण्यासाठी डॉ. पवार व त्यांच्या पथकाने 29 ऑक्टोबर रोजी पुन्हा कॅन्टीनची तपासणी केली. या तपासणीत परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचे आढळले. पहिल्या तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्यानंतर सुधारणा करण्याची संधी देऊनही दुसर्या तपासणीत पुन्हा अनियमितता समोर आल्याने अन्न व औषध प्रशासनाने कॅन्टीनचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली. मोठ्या संख्येने कर्मचारी दररोज जेवणासाठी अवलंबून असलेल्या या कॅन्टीनमध्ये अन्नसुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
मार्केटयार्ड मधील दुकानाचा परवाना निलंबित
अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अहिल्यानगर येथील मार्केट यार्ड परिसरातील मे. सरस ट्रेडिंग कंपनीचा अन्न व्यवसाय परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला आहे. सहायक आयुक्त जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी साजिदा मुल्ला यांनी केलेल्या फेरतपासणीत गंभीर त्रुटी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली. मे. सरस ट्रेडिंग कंपनीमार्फत घाऊक किराणा मालाची विक्री केली जात होती.




