Saturday, May 4, 2024
Homeनगरलम्पीनंतर संकरीत जनावरांच्या किमतीत घसरण

लम्पीनंतर संकरीत जनावरांच्या किमतीत घसरण

खैरी निमगाव |वार्ताहर| Khairi Nimgav

करोना साथरोगाचा प्रभाव काहीसा कमी होताच लम्पी या जनावरांमधील साथरोगाने कहर केला होता. लम्पीवर नियंत्रण मिळवल्यानंतर दूध दरात वाढ झाल्याने संकरीत जनावरांच्या किमती प्रचंड वाढल्या होत्या. मे महिन्यात दुग्धजन्य पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने दूध दरात वाढ होण्यासारखी स्थिती असताना मात्र दूध दर पडल्याने लम्पीनंतर प्रथमच दूध दराबरोबर संकरित जनावरांच्या दरातही घट होताना दिसत आहे.

- Advertisement -

सध्या शेतीच्या मशागतीला वेग आला असून आर्थिक तजवीज करण्यासाठी गहू, कांदा, सोयाबीन, कापूस कशालाच भाव मिळत नसल्याने तसेच चार्‍याअभावी पोटच्या पोराबाळांप्रमाणे सांभाळलेली जनावरे नाईलाजाने विकण्याची वेळ पशुपालक शेतकर्‍यांवर येत आहे. त्यामुळे बाजारात जनावरांची संख्या वाढली आहे. मात्र, फारशी मागणी नाही. परिणामी जनावरांची किमतीच्या 15 ते 25 टक्के किंमतीत घट येऊन मागणी होत असल्याने जनावरे परत घेऊन जावी लागत आहेत. करोनानंतर अनेकजण नोकर्‍या सोडून दुग्ध व्यवसायाकडे वळाले आहेत. मात्र त्या प्रमाणात चार्‍याची उपलब्धता नाही. सर्वच विकत घेऊन असल्याने आणि दुधाचे दर कमी झाल्याने पडतळ बसत नाही. याचा फायदा व्यापारी वर्ग घेताना दिसुन येत आहे.

विशेष म्हणजे जनावरांसाठी मका आणी मुरघास मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने मकाच्या किंमतीही टनाला पोहच 2000 च्या पुढे नाही. एकूणच बाजारात कॉलीटी जनावरे उपलब्ध असताना देखील उलाढाल काहीशी मंदावली आहे. मात्र शेती मशागतीसाठी आर्थिक तजवीज करण्यासाठी दूध डेअरी चालकाकडून उचल घेताना दिसत आहे. सोशल माध्यमांत जनावरांच्या किमती खुप दाखवल्या जात असताना प्रत्यक्षात व्यवहार कमी दरात होत असल्याने शेतकरी संभ्रमात असून बाजाराचे दर आणि व्यापार्‍यांचे दर याचा अंदाज लावूनच शेतकरीही जनावरांची विक्री करताना दिसत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या