सहलीसाठी हॉटेल पुरविण्याचे आमिष दाखवून फसवणूक

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सहलीसाठी पंचतारांकित हॉटेल्स पुरविण्याचे आमिष दाखवून दीड लाख रुपये घेतले. मात्र, त्यानंतर हॉटेल्स उपलब्ध करुन न देता नागरिकांची फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी ए.आर. हॉलिडेज कंपनीचे प्रमुख अमित राणा यासह तिघांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

फसवणूक करणार्‍या कंपनीचे वसई येथे मुख्यालय आहे. या कंपनीने 10 जून 2022 रोजी नगर शहरात हॉटेल पॅरेडाईजमध्ये सेमिनार घेतले. या सेमिनारमध्ये नागरिक उपस्थित राहिले, तर त्यांना एका सहलीसाठी मोफत हॉटेल्स दिले जाईल, असे फोनवर सांगितले गेले. त्यानुसार अनेक नागरिक सेमिनारमध्ये गेले. सेमिनारमध्ये आमच्या कंपनीत पुढील पाच वर्षांसाठी दीड लाख रुपये गुंतविल्यास तुम्हाला दरवर्षी सहा रात्र व सात दिवसांसाठी भारतात व आशियाई राष्ट्रांत हॉटेल्सची सुविधा दिली जाईलफ, असे सांगितले गेले. त्याचवेळी अनेक नागरिकांकडून ही रक्कम ऑनलाईन अथवा रोख स्वरुपात घेतली गेली. काही नागरिकांकडून पॅकेजनुसार वेगळे पैसे घेतले गेले. पैसे भरल्यानंतर गुंतवणूकदारांना तसे पत्र पाठविले गेले.

तसेच सेमिनारला उपस्थित राहिल्याबद्दल एका सहलीसाठी हॉटेल पुरविण्याचे फ्री हॉऊचर दिले गेले. त्यानंतर मागणी केल्यानंतरही गुंतवणूकदारांना हॉटेल्स मात्र उपलब्ध करुन देण्यात आले नाही. गुंतवणुकदारांनी फोन तसेच मेलवर वारंवार संपर्क केल्यानंतरही कंपनीने दखल घेतली नाही. याऊलट गुंतवणूकदारांकडे वर्षाअखेर 1 हजार 999 रुपयांचा युटिलिटी चार्ज मागितला गेला. हे चार्जेस भरले तरच हॉटेलचे बुकिंग मिळेल, असे सांगितले गेले. कंपनीच्यावतीने सरफराज, स्वप्नील साळे यांनी सेमिनारमध्ये सादरीकरण केले. मात्र, त्यांनीही गुंतवणूकदारांना नंतर काहीही मदत केली नाही. त्यांनी कंपनीचे मालक अमित राणा, वृंदा, सुवर्णा भोगल या कर्मचार्‍यांशी संपर्क करण्यास सांगितला. मात्र, त्यांनीही काहीही सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. त्यामुळे पोलिसांनी या कंपनीचे कार्यकारी संचालक अमित राणा, सरफराज, स्वप्नील साळे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *