पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
मढी येथील ग्रामसभेत यात्रा काळात मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास बंदी घालण्याचा ठराव अखेर गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी रद्द केला आहे. 23 फेब्रुवारीला मढी येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षपदी सरपंच संजय मरकड होते तर या सभेला ग्रामविकास अधिकारी अनिल लवांडे यांच्यासह मोजके ग्रामस्थ उपस्थित होते. या सभेत ऐनवेळेसच्या विषयात मुस्लिम व्यावसायिकांना मढी यात्रेत व्यवसाय करण्यास बंदी घालण्याचा ठराव संमत करण्यात आला होता.
याानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सरचिटणीस प्रताप ढाकणे यांच्यासह अनेकांनी जिल्हाधिकार्यांची भेट घेत हा ठराव रद्द करण्याची मागणी केली होती तर या विषयावर आपण वेळ पडल्यास कोर्टात जाऊ असा इशाराही ढाकणे यांनी दिला होता तर हा ठराव रद्द करून या ग्रामसभेला उपस्थित असलेल्या लवांडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी मुस्लिम समाज बांधवांसह अनेक संघटनांनी केली होती. या नंतर कांबळे यांनी या विषयावर एक चौकशी समिती नेमत ग्रामविकास आधिकार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
ही नोटीस बजावताना आयोजित केलेली सभा ही घरकुल या विषयवार असतानाही एनवेळेसच्या विषयात वादग्रस्त ठराव कसा घेतला. या सभेस उपस्थित असणार्या नागरिकांसह या ठरावाचे जे सूचक व अनुमोदक आहेत. त्यांचेही जबाब घेण्याचे आदेश कांबळे यांनी नोटिासीत बजावत या नोटिसीचे उत्तर चोवीस तासात देण्याचे आदेश दिले होते. या संदर्भात लवांडे यांनी दिलेला खुलासा व चौकशी समितीच्या अहवालाची छानणी केल्यानंतर कांबळे यांनी हा वादग्रस्त ठराव नामंजूर केला असून तसा अहवाल त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना पाठवला आहे.