Friday, March 14, 2025
Homeनगरमढीत मानाची होळी पेटली !

मढीत मानाची होळी पेटली !

गोपाळ समाज बांधवांना मान || पोलिसांचा तगडा बंदोबस्त

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

सुमारे 473 वर्षांची ऐतिहासिक परंपरा व धार्मिक वारसा असलेली श्रीक्षेत्र मढी येथील मानाची होळी राज्यातील गोपाळ समाज बांधवाच्याहस्ते गुरूवारी सायंकाळी पारंपारिक उत्साहात व शांततेत समाजाने ठरवलेल्या मानकर्‍यांच्या हस्ते पेटली. मढी येथील चैतन्य कानिफनाथ गडाच्या बांधकामासाठी दगडी काम व मोठी दगडी शिळा, पाषाण आदींची वाहतूक करत गडाच्या उभारणीसाठी गोपाळ समाजाने मोठे कष्ट घेतले. गोपाळ समाजाची मदत श्रद्धायुक्त अंत:करणाने झाल्याने चैतन्य कानिफनाथांच्या आशीर्वादानुसार मढी येथील सार्वजनिक होळी पेटवण्याचा मान राज्यातील गोपाळ समाजाला देण्यात आलेला आहे.

- Advertisement -

यामुळे मढीचे ग्रामस्थ होळीच्या दिवशी हा सण साजरा करत नाहीत. दरम्यान, सुमारे 25 वर्षांपूर्वी होळी पेटविण्यावरून मानपानाची लढाई मुद्द्यावरून गुद्यावर पोहचली होती. पोलिसांना लाठीमार करावा लागला व त्यातून बरीच वर्षेे मढीतील मानाची होळीची प्रथा बंद होती. त्यानंतर न्यायालयातून निवाडा झाल्यावर, प्रतिकात्मक स्वरूपात गावातील दत्त मंदिराच्या बारवेजवळ प्रशासनाने ठरवून दिलेल्या जागेवर गोपाळ समाजाच्या हस्ते पुन्हा मानाची होळी पेटविण्याची प्रथा सुरू झाली. त्यानूसार गुरूवारी सायंकाळी समाजातील मानकरी माणिक लोणारे येवला, नामदेव माळी गेवराई, रघुनाथ काळापहाड पाथर्डी, हरिभाऊ गव्हाणे बेलगाव, भागिनाथ नवघरी कोळपेवाडी या मानकर यांना देवस्थान समितीने मानाच्या गोवर्‍या दिल्या. त्यानंतर डफ, ताशा या वाद्यासह गोपाळ बांधवांनी नाथांचा जयजयकार करत गडावर पोहोचले.

तेथे देवस्थान समितीतर्फे त्यांचा सन्मान मानकरी ज्ञानदेव गिर्‍हे शिरूर यांना होळीच्या पारापर्यंत गोवर या डोक्यावर घेवून त्याची गडावरून वाजत गाजत दत्त मंदिराजवळ नियोजित जागेपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेटिंग केलेले होते. तेथे अत्यंत उत्साह व पारंपारिक पद्धतीने सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास होळी मानकर यांनी पेटवली. यावेळी तालुका प्रशासनाच्या वतीने तहसीलदार डॉ. उद्धव नाईक उपस्थित होते. या ठिकाणी बंदोबस्तासाठी 1 पोलिस उपाधीक्षक, पाच पोलिस निरीक्षक, 14 इतर अधिकारी, 130 पोलिस कर्मचारी व 113 होमगार्ड, एक एसआरपी लाटून असा तगडा बंदोबस्त तैनात केल्याने शांतते मढीतील होळी पेटली.

मोहटा गडावर पारंपारिक पध्दतीने होळी
श्री क्षेत्र मोहटादेवी देवस्थान समितीच्या वतीने पारंपारिक पद्धतीने वेदमंत्राचारात होलिका देवीची विधीवत पूजा करून होळी पेटविण्यात आली. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास विश्वस्त डॉ. श्रीधर देशमुख व विठ्ठल कुटे यांच्या हस्ते सपत्नीक होळीची महापूजा करण्यात आली. यावेळी धार्मिक विधीचे पौरोहित्य भूषण साखरे व भास्कर देशपांडे यांनी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. वाईट विचार, वाईट कर्म, दुर्गुण, व्यसने व नकारात्मक वृत्ती अशा सर्व अनर्थकारी गोष्टींचे दहन होळीमध्ये करून हातून सत्कार घडण्यासाठी देवाधिकांची सेवा घडण्यासाठी सर्वांना आशीर्वाद द्यावेत, देशावरील धर्मावरील सर्व संकटे दूर होऊन होलिका मातेने भरपूर पर्जन्यवृष्टी करावी, अशी प्रार्थना उपस्थित भाविकांनी केली. मोहटा देवस्थानच्या होळी उत्सवासाठी परिसरातील भाविक आवर्जून उपस्थित राहतात. देवस्थान समितीतर्फे भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. होळीचा अंगारा अत्यंत प्रभावी व रामबाण इलाज सर्व समस्यांवर असतो अशी भाविकांची श्रद्धा असल्याने चिमूटभर अंगारा घेण्यासाठी सायंकाळनंतर उपस्थित भाविकांनी गर्दी केली होती.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

झेडपीच्या बजेटमध्ये अडीच कोटींची वाढ

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा परिषदेचे 2025-26 या वर्षाचे 52 कोटी 54 लाखांचे मूळ अंदाजपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक आशिष येरेकर यांनी सादर केले. मागील...