Thursday, April 9, 2026
HomeनगरPathardi : मढीच्या बाजारात गाढवांनी खाल्ला भाव!

Pathardi : मढीच्या बाजारात गाढवांनी खाल्ला भाव!

कमी पुरवठा, वाढती मागणी || काठेवाडी आणि गावरान गाढवांची आवक || ग्राहकांची गर्दी

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

यांत्रिकीकरणाच्या युगातही गाढवांचे महत्त्व कायम आहे. श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ यात्रेनिमित्त भरलेल्या प्रसिद्ध गाढवांच्या बाजारात यंदा गाढवांनी मोठा भाव खाल्ला आहे. ग्राहकांची गर्दी जास्त आणि विक्रेत्यांची संख्या कमी असल्याने गाढवांच्या किंमतीत दुप्पट वाढ झाली आहे. राज्यातील सर्वांत मोठ्या गाढव बाजारात केवळ 200 गाढवे विक्रीसाठी आली असून, गुजरातच्या काठेवाडी गाढवांना विशेष मागणी आहे.

- Advertisement -

फाल्गुन कृष्ण चतुर्थी, रंगपंचमी आणि नाथषष्ठी या तीन दिवसांच्या या बाजारात गाढवांचा बाजार राज्यात प्रसिद्ध आहे. गाढवांच्या वयानुसार भाव ठरतो. गावरान गाढवांची किंमत 10 हजार ते 40 हजार रुपयांपर्यंत आहे, तर काठेवाडी (गुजराती) गाढवांची किंमत 30 हजार ते 90 हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा किंमतीत तेजी आली आहे. गाढवांची आवक कमी झाल्याने मागणी वाढली आहे. ग्राहक जास्त आणि विक्रेते कमी असल्याने भाव गगनाला भिडले आहेत असे व्यापारी अविनाश उर्फ सोनू बोरुडे (बेलापूर) यांनी सांगितले.

राज्यात वर्षभरात फक्त चार ठिकाणी गाढवांचा बाजार एकदाच भरतो. यात देऊळगाव राजा (बुलढाणा), जेजुरी (पुणे), मढी (अहिल्यानगर) आणि माळेगाव (नांदेड) या ठिकाणांचा समावेश आहे. मढीचा बाजार यात सर्वांत मोठा आणि प्रसिद्ध आहे. गाढवांचा उपयोग आजही वीटभट्ट्यांसाठी माती आणि वाळू वाहतुकीसाठी होतो. गड-किल्ल्यांवर सामान नेण्यासाठी, उंच डोंगराळ भागात विविध वस्तू घेऊन जाण्यासाठी गाढवांचा मोठा वापर केला जातो. विशेष म्हणजे, गाढवाचे दूध लहान मुलांच्या औषधांसाठी वापरले जाते, ज्यामुळे त्याची मागणी आणखी वाढली आहे.

यांत्रिकीकरणाच्या काळात ट्रॅक्टर आणि ट्रक उपलब्ध असूनही, दुर्गम भागात गाढव हे विश्वसनीय साथीदार ठरतात. डोंगराळ रस्त्यांवर मशिन्स पोहोचू शकत नाहीत तिथे गाढवच उपयोगी पडतात असे अमोल धोत्रे या व्यापार्‍यांने सांगितले. गुजरातच्या काठेवाड प्रांतातील गाढवांना मजबूत आणि टिकाऊ समजले जाते, त्यामुळे त्यांची मागणी सर्वाधिक आहे. या बाजारात गाढवांच्या खरेदी-विक्रीसाठी दूरवरून लोक येतात. मात्र, यंदा पुरवठा कमी आणि भाव दुप्पट असल्याने अनेक ग्राहक निराश होऊन परतत आहेत. यात्रेनिमित्त भरलेल्या या बाजाराने स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते.

गाढवाच्या जाती व प्रकृतीनुसार त्याची किंमत ठरवली जाते. गाढवाचे वय प्रामुख्याने त्याच्या दातांवरून निश्चित केले जाते आणि त्यानुसार बाजारभाव ठरतो. काठेवाडी जातीच्या गाढवांना बाजारात चांगली मागणी असते. या गाढवांची उंची-लांबी चांगली असून दिसायलाही आकर्षक असतात. तसेच माल वाहून नेण्याची क्षमता जास्त असल्याने व्यापार्‍यांकडून त्यांना अधिक पसंती दिली जाते, अशी माहिती व्यापारी दादू गोटीराम शिंदे यांनी दिली.

विविधता कमी
मढी येेथील पारंपरिक गाढवांच्या बाजारात साधारणपणे गुजरातच्या काठेवाडी, पंजाबातील जाफरानी तसेच स्थानिक गावरान अशा विविध जातींच्या गाढवांची खरेदी-विक्री होत असते. मात्र यंदाच्या बाजारात काठेवाडी आणि गावरान या दोनच जातींच्या गाढवांची आवक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे बाजारातील विविधता कमी झाल्याचे व्यापारी व खरेदीदारांकडून सांगण्यात आले.

खरेदीदारांमध्ये चिंता
यंदा दुपटीने गाढवांचे भाव वाढले आहे. त्यामुळे आता खरेदी करावी की नाही? अशी मनस्थिती आहे. पण गाढव खरेदी करणं हे महत्त्वाचं आहे, त्यामुळे आता जादा पैसे देऊन गाढव खरेदी करावे लागेल.
– मारुती पवार (फलटण), ग्राहक.

ताज्या बातम्या

पडसाद : शितावरून भाताची परीक्षा…

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक कोणत्याही निवडणुकीत कोणालाही बहुमत न मिळणे हे जसे लोकशाहीला धोकादायक समजले जाते, तद्वतच एखाद्या पक्षालाच पाशवी...