Tuesday, May 28, 2024
Homeनगरमढी येथे अध्यक्ष निवडीवरून राडा

मढी येथे अध्यक्ष निवडीवरून राडा

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी|Pathardi

तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळातील दोन गटात अध्यक्ष पदावरून हाणामारी होऊन यात सातजण जखमी झाले. यावेळी झालेल्या तुफान हाणामारीत लाठ्या, काठ्या व गजाचा वापर करण्यात आला असून या घटनेत देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा मढीचे सरपंच संजय मरकड हे गंभीर जखमी झाले आहेत. पुढील उपचारासाठी त्यांना नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी विश्वस्त शिवजीत डोके यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सहा आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

या हाणामारीत अध्यक्ष संजय मरकड, शिवजीत डोके यांच्यासह संकेत मरकड, प्रतीक काळदाते, सुनील निमसे, अक्षय कुटे, प्रसाद डोके हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरूवारी (दि.14) सकाळी देवस्थानच्या नवीन अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार होती. या बैठकीसाठी बारा पैकी दहा विश्वस्त बैठकीसाठी आले होते. मात्र, एका गटाने ज्या ठिकाणी बैठक होेती, त्या हॉलला कुलूप लावत बैठक होणार नाही, असा पवित्रा घेतल्यानंतर संजय मरकड व शिवजीत डोके यांच्यात शाब्दिक वादाला सुरवात झाली.

हा वाद विकोपाला जाऊन दोन्ही गटात हाणामारी झाली. या हाणामारीत सहभागी झालेल्या काही तरूणांकडे परवाना असलेले रिव्हॉलर होते. मात्र, त्याचा वापर न झाल्याने मोठी दुर्घटना टळली. हाणामारीचा हा प्रकार कानिफनाथांची समाधी असलेल्या मुख्य गडावर घडल्याने याठिकाणी आलेल्या भाविकांची पळापळ झाली. तर या घटनेची माहिती कळताच मढीच्या ग्रामस्थांनी गडाकडे धाव घेतली. या घटनेतील सर्व जखमी पाथर्डी पोलीस स्टेशनला व उपजिल्हा रुग्णालयात आल्यानंतरही मोठी गर्दी याठिकाणी जमा झाली होती.

या संदर्भात शिवजीत डोके यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संजय मरकड, संकेत मरकड, दत्ता मरकड, अक्षय कुटे, बाळासाहेब मरकड, प्रतीक काळदाते व इतर दहा ते पंधरा अज्ञात व्यक्तींविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर माजी सभापती गोकुळ दौंड यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपुस केली. दरम्यान, या प्रकाराबाबत कानिफनाथ भाविकांनी नाराजी व्यक्त केली.

अध्यक्षपद कळीचा मुद्दा

मढी देवस्थानचे अध्यक्षपद हा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून कळीचा मुद्दा बनला आहे. काही महिन्यांपूर्वी मरकड यांच्या विरूद्ध तक्रारी करून काही विश्वस्तांनी बहूमताने दुसरे अध्यक्षही निवडले होते. मात्र, या निवडीविरोधात संजय मरकड यांनी न्यायालयात दाद मागत पुन्हा अध्यक्षपद मिळवले होते. तेव्हापासून अध्यक्षपदाबाबतचा विषय स्फोटक झाला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या