पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
मढी ग्रामसभेत मोठ्या वादळानंतर पुन्हा एकदा मुस्लिम व्यापार्यांना यात्रेत व्यवसाय करण्यास बंदी घालण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. या निर्णयावर न्यायालयाने आधीच स्थगिती दिली असली, तरी नवीन ग्रामसभा घेण्यास मनाई नव्हती, याचा फायदा घेत ग्रामस्थांनी हा ठराव पुन्हा संमत केला.
ग्रामसभा अत्यंत तणावपूर्ण वातावरणात पार पडली. दोन गटांमध्ये शाब्दिक चकमकी झाल्या, काही जण परस्परांच्या अंगावर धावून जाण्याच्या स्थितीत आले. परिस्थिती हाताळण्यासाठी पाथर्डी पोलिसांना मोठा बंदोबस्त तैनात करावा लागला.
पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने संतप्त ग्रामस्थांवर नियंत्रण मिळवून शांतता प्रस्थापित केली. ग्रामसभेच्या वेळी काही ग्रामस्थांनी मुस्लिम व्यापार्यांना विरोध नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, काही गंभीर आरोपांनी सभेचे वातावरण अधिक तापले. यामुळे अनेक ग्रामस्थ धार्मिक भावनांनी प्रेरित होऊन ठरावाच्या बाजूने मतदान करू लागले. सभेत सरपंच संजय मरकड यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नेते अण्णासाहेब मरकड, प्रदीप पाखरे, समाधान मरकड, फिरोज शेख, सालार शेख, विष्णू मरकड, नंदकिशोर मरकड, गणेश पाखरे आदींनी सहभाग घेतला. काही ग्रामस्थांनी जातीय आणि धार्मिकतेच्या मुद्द्यांवर चर्चा होत असल्याने ती थांबवण्याची मागणी केली. प्रभारी ग्रामविकास अधिकारी गणेश ढाकणे यांनी मुख्य प्रस्तावावरच चर्चा करण्याचे आवाहन करत वादग्रस्त चर्चा रोखली.
22 फेब्रुवारी 2025 रोजी मढी ग्रामपंचायतीने यात्रेदरम्यान मुस्लिम व्यापार्यांना व्यवसाय करण्यास बंदी घालण्याचा ठराव संमत केला होता. मात्र, गटविकास अधिकार्यांनी तांत्रिक कारणांमुळे हा ठराव रद्द केला. काही मुस्लिम व्यापार्यांनी न्यायालयात धाव घेतल्याने न्यायालयाने 22 फेब्रुवारीच्या ठरावाच्या अंमलबजावणीस मंगळवारी (11 मार्च) स्थगिती दिली. मात्र, नवीन ग्रामसभा घेण्यावर कोणताही बंदी आदेश नसल्याने बुधवारी (12 मार्च) पुन्हा सभा घेऊन तोच ठराव मंजूर करण्यात आला. ग्रामसभेतील मतदानात ठरावाच्या बाजूने 327 मते, तर विरोधात 127 मते पडली. यादी पडताळणी पूर्ण झाल्यानंतर आकडेवारीत बदल होण्याची शक्यता आहे.
गावच्या मतदार यादीत नाव असलेल्या आणि उपस्थिती दर्शवणार्या ग्रामस्थांच्याच मतांची गणना करण्यात आली. ग्रामसभेचे प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी गणेश ढाकणे यांनी केले, तर आभार सरपंच संजय मरकड यांनी मानले. यात्रा आजपासून सुरू होणार असून, गोपाळ समाजाची मानाची होळी उद्या पार पडेल. दरम्यान, या ठरावाकडे राज्याचे लक्ष लागले होते. मंत्री नितेश राणे, आमदार संग्राम जगताप तसेच काही संत-महंतांनी जाहीर सभेत ठरावाच्या समर्थनार्थ भूमिका मांडली होती.
तणावपूर्ण परिस्थिती
ग्रामसभेनंतर मढी, पाथर्डी आणि तिसगाव येथे तणावपूर्ण परिस्थिती वाढल्याचे पाहायला मिळाले. स्थानिक व्यापारी आणि व्यावसायिकांची यात्रेच्या काळात मोठी गर्दी असते. मुस्लिम समाजानेही पूर्वीच्या परंपरेनुसार त्यांना यात्रेत व्यवसाय करण्याची परवानगी देण्याची मागणी न्यायालयात केली आहे.