Thursday, September 19, 2024
Homeनगरपिचड-शरद पवारांच्या भेटीच्या वृत्तामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ

पिचड-शरद पवारांच्या भेटीच्या वृत्तामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ

अकोलेतील 19 जुलैच्या कार्यक्रमातून संभ्रमावस्था दूर होणार

अकोले |प्रतिनिधी| Akole

- Advertisement -

माजी मंत्री मधुकर पिचड आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट झाल्याच्या वृत्ताने अकोले तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. महायुती आणि महविकास आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये या वृत्ताने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. प्रत्येक कार्यकर्ता आपापल्यापरीने या बातमीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करीत आहे. एका वहिनीवर भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकर पिचड व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाल्याचे वृत्त प्रसारित झाले. पिचड यांचे एकेकाळचे निकटचे सहकारी विजयसिंह मोहिते यांच्या पाठोपाठ ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांनाही शरद पवार यांनी साद घातल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

हे वृत्त झळकताच त्याचे पडसाद अकोले तालुक्यातील राजकीय क्षेत्रात उमटले. शरद पवार हे 19 जुलै रोजी अकोले येथे ज्येष्ठ नेते स्व. अशोक भांगरे यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित शेतकरी मेळाव्यासाठी येत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अकोले विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक असलेले अमित भांगरे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्या पार्शवभूमीवर ही बातमी आल्यामुळे ती अधिकच चर्चिली गेली. या बातमीबाबत पिचड पिता-पुत्रांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वी माजी आमदार वैभव पिचड हे स्वगृही परतणार असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यावेळी माजी आमदार पिचड यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत या वृत्ताचा इन्कार केला होता व आपण भाजपमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते.

पिचड यांच्या संभाव्य पक्ष बदलीमुळे त्यांचे समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळी मते व्यक्त केली जात आहेत. ते स्वगृही परतले आणि माजी आमदार वैभव पिचड यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळाली तर निवडणूक सोपी जाईल असे काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. कारण महायुतीच्या जागा वाटपात अकोलेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला मिळणार असल्याची शक्यता आहे. आपणच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे हे ठामपणे सांगत आहेत. तर पिचड पिता-पुत्रांनी कोणताही पक्ष बदल न करता भाजपमध्येच राहावे असे काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पिचड पिता-पुत्रांचे चांगले संबंध आहेत.

माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या शब्दाला भाजपमध्ये किंमत आहे. अलिकडेच एका कार्यक्रमात ज्येष्ठनेते मधुकर पिचड यांची पंतप्रधान नरेंद मोदी यांनी विशेष दखल घेतली होती. मात्र महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दल कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. शरद पवार सन्मानाने बोलवत असतील तर पिचड पिता-पुत्रांनी स्वगृही परतावे असे सांगणारे अनेक कार्यकर्ते आहेत. लोकसभा मतदारसंघात अकोले विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला 54 हजार इतके विक्रमी मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे अकोलेचा कल हा महविकास आघाडीकडे आहे, याची दखल घेतली जावी अशीही पिचड यांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे.

मात्र, 19 जुलै रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार्‍या मेळाव्यातच या बातमीत तथ्य आहे की नाही हे स्पष्ट होईल. त्यांनी अमित भांगरे यांच्या उमेदवारीचे संकेत दिले तर या बातमीत कोणतेही तथ्य नसल्याचे दिसून येईल आणि तसे न करता त्यांनी काही वेगळी भूमिका मांडली तर अकोलेच्या राजकारणात पुन्हा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण होईल. दरम्यान, पिचड यांच्या प्रवेशाबाबत अकोले राष्ट्रवादीने पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. पिचड शरद पवार गटात येण्याच्या वृत्तात तथ्य नसल्याचे सुरेश गडाख यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या दोन दिवस आदी अशी बातमी येते हे राजकारण असल्याचेही गडाख म्हणाले. गद्दारांना शरद पवार गटात थारा नाही, असे पवार साहेबांनी सांगितले आहे, असे विनोद हांडे यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या