अकोले |प्रतिनिधी| Akole
माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवावर अकोले तालुक्यातील राजूर येथील मधुकरराव पिचड (Madhukarrao Pichad) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी स्व. पिचड यांच्या पार्थिवाचे राजूर (Rajur) येथील निवासस्थानी अंत्यदर्शन (Funeral) घेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी पिचड कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले.
याप्रसंगी माजी मंत्री, आमदार राधाकृष्ण विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil), आमदार दिलीप वळसे (MLA Dilip Walse), आमदार डॉ. किरण लहामटे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, हेमलता पिचड, माजी आमदार वैभव पिचड, हेमंत पिचड व कुटुंबीय उपस्थित होते. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे जाणे ही अतिशय दुःखद घटना असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणातील दलित, आदिवासी वंचित समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा त्यांची उन्नती व्हावी यासाठी आणि आदिवासींच्या वन जमिनींचा प्रश्न सोडवण्यासाठी ते कार्यतत्पर होते. राजकारणी म्हणून नव्हे तर एक समाजसुधारक म्हणूनही त्यांनी चांगले काम केले. आदिवासींच्या हक्कांसाठी त्यांनी काम केले.
निळवंडे धरणाचे 20 किलोमीटरचे काम थांबले होते, तेव्हा पिचड साहेबांच्या माध्यमातून ते काम मार्गी लागले. या धरणामुळे शंभर किलोमीटरपर्यंतच्या परिसरातील शेतकर्यांना आज पाणी मिळत आहे. भंडारदरा (निळवंडे) धरणाला क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय नाव देण्यासाठी त्यांनी आग्रही भूमिका मांडली होती. ते मितभाषी, व्यासंगी आणि उत्तम वक्ते होते. विविध विषयाचे ज्ञान, व्यासंग आणि सर्वांशी संपर्क ठेवून होते. महाराष्ट्रातील एक सुसंस्कृत, वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या जाण्याने अतीव दुःख झाले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे शुक्रवारी नाईन पर्ल नाशिक या रुग्णालयात उपचार घेत असताना सायंकाळी निधन झाले. शनिवारी सकाळी त्यांचे पार्थिव नाशिकवरुन रुग्णवाहिकेतून आणण्यात आले. सर्वप्रथम देवठाण येथे त्यांच्या पार्थिवाचे दर्शन आढळा परिसरातील नागरिकांनी घेतले.
यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी पिचड साहेब यांच्या आठवणींना उजाळा देताना अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाही. त्यानंतर वीरगाव फाटा, तांभोळ, कृषी उत्पन्न बाजार समिती, मॉडर्न हायस्कूल येथेही नागरिकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. अकोले शहरात महात्मा फुले चौक येथे पिचड साहेब अमर रहे, जब तक सूरज चांद रहेंगा, पिचड साहेब नाम तुम्हारा नाम रहेंगा…! अशा घोषणा देत रस्त्याने फुलांचा सडा टाकीत त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर पार्थिवाचे पक्ष कार्यालय येथे अंतिम दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. तसेच अमृतसागर दूध संघाच्या कार्यालयात दर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर अकोले महाविद्यालय येथे नागरिकांनी दर्शन घेतले.
यावेळी पद्मश्री राहीबाई पोपरे, अगस्ति कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर, उपाध्यक्षा सुनीता भांगरे, ज्येष्ठ नेते दशरथ सावंत, कैलास वाकचौरे, विजय वाकचौरे, डॉ.अजित नवले, शिवाजी धुमाळ, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कायम विश्वस्त गिरजाजी जाधव, विश्वस्त मधुकर सोनवणे, संस्थेचे अध्यक्ष सुनील दातीर, सचिव सुधाकर देशमुख, खजिनदार धनंजय संत, सर्व कार्यकारिणी सदस्य, नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, उपनगराध्यक्ष शरद नवले, कल्पना सुरपुरीया, तुषार सुरपुरीया, प्राचार्य डॉ. भास्कर शेळके, प्रकाश मालुंजकर, गुलाबराव शेवाळे, प्रकाश नवले, सीताराम भांगरे, दत्ता नवले, सुरेश गडाख, बाजीराव दराडे, किसन लहामगे, सूर्यकांत शिंदे, आनंदराव वाकचौरे, अप्पासाहेब आवारी, संदीप शेटे, मधुकर बिबवे, नगरपंचायतचे सर्व सभापती, नगरसेवक, नगरसेविका, पोलीस निरीक्षक मोहन बोरसे आदिंसह मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी यांनी दर्शन घेतले.
दरम्यान, अकोले, राजूर, देवठाण, कोतूळ यांसह प्रमुख बाजारपेठा असलेल्या तालुक्यातील गावांत व्यापारी वर्गाने स्वयंस्फूर्तीने आपले व्यवहार बंद ठेवले होते. शनिवारी सकाळी अकोले शहरातून जाणारा कोल्हार-घोटी मार्ग पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला होता. अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे सर्व महाविद्यालये, माध्यमिक विद्यालये, आयटीआय, पॉलिटेक्निक, एमबीए, एमसीए, बीबीए, बीसीएस, परफेक्ट इंग्लिश मीडियम स्कूल, कार्यकारी विश्वस्त यांनी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना श्रद्धांजली अर्पण करून सुट्टी जाहीर केली.तर आदिवासी उन्नती सेवा मंडळाच्या सर्व आश्रमशाळा, अगस्ति सहकारी साखर कारखाना यांनीही स्व. पिचड यांच्या निधनाबद्दल सुट्टी जाहीर केली होती. त्यानंतर स्व. पिचड यांचे पार्थिव त्यांच्या राजूर या मूळगावी त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. यावेळी पिचड कुटुंबातील सदस्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. हा भावनाप्रधान प्रसंग पाहून उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांनाही आपले अश्रू आवरता आले नाही.
त्यानंतर मधुकरराव पिचड विद्यालय राजूर येथे आदिवासी भागातील जनतेने त्यांचे अंतिम दर्शन घेतले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री, आमदार दिलीप वळसे यांनीही दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली व पिचड कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
याप्रसंगी माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, बाळासाहेब थोरात, शिवाजीराव मोघे, आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, हेमंत सावरा, भास्कर भगरे, राजाभाऊ वाजे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, आचार्य डॉ. रामकृष्णदास लहवितकर, बगाड बाबा, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, भानुदास मुरकुटे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, सी. बी. भांगरे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमित भांगरे, अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकर नवले आदिंनी स्व. पिचड यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाशझोत टाकत श्रद्धांजली अर्पण केली.
प्रांताधिकारी शैलेश हिंगे, योगी केशवबाबा चौधरी, दीपक महाराज देशमुख, विवेक महाराज केदार, दिलीप शिंदे, कपिल पवार, संभाजी दहातोंडे, माजी नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी, राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते, ज्येष्ठ नेते कारभारी उगले, पांडुरंग घुले, गिरजाजी जाधव, अमृतसागरचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सीताराम देशमुख, पर्बत नाईकवाडी, कचरू शेटे, राजेंद्र डावरे, बाळासाहेब देशमुख, बी. जे. देशमुख, मधुकर तळपाडे, बाजीराव दराडे, संजय वाकचौरे, प्रकाश नवले, अॅड. सदानंद पोखरकर, भास्कर आरोटे, अॅड. के. बी. हांडे, प्राचार्य डॉ. बी. वाय. देशमुख, संतोष कचरे, अमर कतारी, सचिन जगताप, भाजप तालुकाध्यक्ष यशवंत आभाळे, सरचिटणीस राहुल देशमुख, सचिन जोशी, भाऊसाहेब वाकचौरे, प्रा. संदेश कासार, अमोल वैद्य, सचिन शेटे, विजय पवार, आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे अध्यक्ष भरत घाणे, सचिव मंगलदास भवारी, संतोष बनसोडे, गोकुळ कानकाटे, शेखर वालझाडे, राजेंद्र कानकाटे, सुनील सारोक्ते, दिलीप भांगरे, अगस्तिचे संचालक अशोक देशमुख, प्रदीप हासे, मच्छिंद्र धुमाळ, महेश नवले, लकी जाधव, जालिंदर वाकचौरे, दिनेश शहा, प्रभाकर फापाळे, नितीन आहेर, मंगेश कान्होरे, गणेश कानवडे, संतोष मुर्तडक, आबासाहेब थोरात, राजेंद्र गोडसे, डॉ. अशोक इथापे, माजी सभापती भानुदास गायकर, आशा पापळ, अंजना बोंबले आदी मान्यवर उपस्थित होते.
पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार..
स्व. मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवावर वंदनीय मधुकरराव पिचड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. पोलीस दलाने बंदुकीच्या हवेत फैरी झाडून मानवंदना दिली.
विदर्भातील एका दुर्गम आश्रमशाळेत मी गेलो होतो. तिथे जाणे कठीण होते, गाडी उतरून थोडे पायी चालावे लागले. तिथे गेल्यावर तेथील मुख्याध्यापक म्हणाले या दूरच्या शाळेत बाहेरचे फक्त तुम्ही आणि आदिवासी मंत्री मधुकरराव पिचड फक्त आले होते. त्यांना मी अकोल्याचा हे माहीत नव्हते. मी हसून म्हणालो सर त्यांच्याच तालुक्यात मी राहतो. त्यांचे आश्रमशाळा व आदिवासींसाठी केलेले धोरणात्मक निर्णय हे खूप मोठे योगदान आहे.
– हेरंब कुलकर्णी, अकोले