अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
गोवा येथून इंदौर (मध्यप्रदेश) येथे विक्रीसाठी नेण्यात येत असलेल्या अवैध दारूचा ट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अरणगाव (ता. नगर) शिवारात दळवी वस्ती जवळ पकडला. 66 लाख 24 हजार रूपये किंमतीची दारू, 36 हजाराचा ट्रक असा एक कोटी दोन लाख 69 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, ट्रक मधील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एकुण सात जणांविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रकचा मालक दीपक आदिकराव पाटील (रा. धामवडे, शिराळा, ता. सांगली), चालक शहाजी लक्ष्मण पवार (रा. मलकापूर, ता. कराड, जि. सातारा), शैलेश जयवंत जाधव (रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली), हेमंत शहा (रा. इंदौर, मध्यप्रदेश, हल्ली रा. मडगाव, गोवा), सायमन उर्फ मायकल (पुर्ण नाव नाही), जमीर मुलाणी (रा. मलकापूर मार्केटजवळ, ता. कराड, जि. सातारा) व सुखदेवसिंग गिल उर्फ कवलजितसिंग भूल्लर उर्फ लवी शेठ (रा. इंदौर, मध्यप्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अवैध धंद्यावर कारवाई करत आहेत.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना काल, शनिवारी माहिती मिळाली की, गोवा येथून हेमंत शहा, सायमन उर्फ मायकल व जमीर मुलाणी असे मिळून लवी शेठ याच्याकरीता त्यांच्या हस्तकामार्फत मडगाव (गोवा) मधून आणलेल्या विदेशी दारूवर ‘फॉर सेल इन मध्यप्रदेश ओनली’ असे लेबल बदलून ट्रक मधून (एमएच 11 एएल 6248) दौंड, अहिल्यानगर ते शिर्डीकडे जाणार्या रस्त्याने मध्य प्रदेशकडे जाणार आहे. माहिती मिळताच निरीक्षक आहेर यांनी उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार संतोष लोढे, फुरकान शेख, शरद बुधवंत, शिवाजी ढाकणे, बाळासाहेब गुंजाळ, जालींदर माने, प्रशांत राठोड, अर्जुन बडे, रवींद्र कर्डिले, मेघराज कोल्हे यांचे पथक तयार करून त्यांना कारवाईच्या सुचना केल्या.
पथकाने अरणगाव शिवारात बायपास रस्त्यावर दळवी वस्ती जवळ सापळा रचुन संयशित ट्रक ताब्यात घेतला. ट्रक मधील तिघांकडे विदेशी दारूबाबत विचारणा केली असता सदरची दारू ही हेमंत शहा, सायमन उर्फ मायकल, जमीर मुलाणी यांच्या मालकीचे असून ती सुखदेवसिंग गिल उर्फ लवी शेठ याला देण्यासाठी मध्यप्रदेश येथे घेऊन जात असल्याची कबूली दिली आहे.