शिक्षकाच्या नजरेला मुलांच्या भावभावना टिपता यायला हव्यात. एक माणूस म्हणून सभोवतालच्या मुलांच्या वागण्यातील बदल समजून घ्यावेत. मुलांविषयी सजग राहिले की ते मनात आणि मनातून थेट कागदावर टिपता येते. अशाच यादगार भेटी तुमच्यापर्यंत पोहोचवणारे नवे कोरे सदर.
ए नयी म्याडम, उघड वं दार. ह्यो बघ माह्यावाला डोला लय लाल झालाया…’ धारा जीवाच्या आकांताने माझ्या खोलीचे दार ठोठावत होती. धारा दुसरीमधली विद्यार्थिनी. याचवर्षी शाळेत नव्याने दाखल झालेली. आधी मूळ गावी होती. आई-वडिलांच्या जवळ राहणारी. पण यावर्षी कामानिमित्त स्थलांतरीत होण्याच्या विचाराने या गोंडस धाराची रवानगी आमच्या शाळेत झाली. आमची शाळा अर्थात शासकीय आश्रमशाळा. एका छोट्या गावात वसलेली. धाराप्रमाणे मीही याचवर्षी शाळेत बदलीने आले होते.
प्राथमिक शिक्षिका हे पद असूनदेखील स्त्री अधीक्षिका हे पद रिक्त असल्याने माझा हा चार्ज होता. मुलींची देखभाल आणि त्यांचे आजारपण माझ्यासाठी नित्याचेच झाले होते. कधी कोणती मुलगी आजारी पडेल याचा काहीच नेम नसायचा. मुलगी आजारी पडली की तिला तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे किमान नऊ किलोमीटरवर ग्रामीण रुग्णालयात न्यावे लागायचे. वेळेत गाडी मिळाली तर ठीक नाहीतर बराच वेळ थांबावे लागायचे.
सतत पडणारा पाऊस आणि कायम ओलसर वातावरण यामुळे पावसाळ्यात बर्याचदा डोळे येण्याची साथ इकडे असतेच आणि संसर्गजन्य असल्यामुळे एकीकडून हे वाण दुसरीला. जोडीला माझ्या मैत्रिणीला डोळे आले, म्हणजे मला पण येतीलच डोळे ही भावना.
सकाळची वेळ होती. साधारण आठ वाजले असावेत. मी पोळ्यांसाठी कणिक मळत होते आणि धारा धाड धाड दार ठोठावत होती. मी उठले आणि दार उघडले. दार उघडल्यावर धाराच्या रडवेल्या चेहर्याचे दर्शन झाले. धारा खरे तर खूप घाबरली होती. डोळे आलेत की काय या भीतीने. पण प्राथमिक अंदाजावरून तिला डोळे आलेले नव्हते. कारण तिचा एकच डोळा लाल झालेला होता. कदाचित झोपेतून उठल्यावर डोळा चोळला असावा तिने किंवा एका अंगावर रात्रभर झोपली असावी ती. दार उघडल्यावर लगेच धारा मला बिलगली. डोळे आले नाही हे तिला सांगून पटण्यासारखे नव्हते. कारण मुळातच ती खूप घाबरली होती. डॉक्टरकडे जाऊ एवढेच मी तिला म्हणणे समाधानाचे होते.
मी : का गं राणी, का रडतेस?
धारा : (रडवेल्या सुरातच) बघ नं… त्या पोशी पाई (मुलगी) माझं बी डोळे लाल झालं.. तरी म्या सांगितलं हुतं की संग राहू नग…?
मी : बरं रडू नकोस हं आता.. मी ना थोड्या वेळात जाणारे तालुक्याला तेव्हा तुझ्यासाठी औषध आणते. तू जा… आणि जाऊन झोप बरे थोड्या वेळ. दहा वाजता शाळा भरली की मग उठ… मी येते तुला उठवायला आणि औषध टाकून देते तुझ्या डोळ्यात.
धारा : नक्की आण वं औषध… पर आधी तेवढ्या चपात्या करून घे. मंग जाय…
अगदी समजूतदारपणे मला सांगून धारा तिच्या खोलीत निघून गेली. माझ्यापुढे प्रश्न होता आता धारासाठी औषध कसे आणावे याचा? एकच डोळा लाल झाला होता तिचा. त्यामुळे कोणतेच औषध तिच्या डोळ्यात टाकता येणार नव्हते. पोळ्या करणे आणि विचार या दोन्ही बाबी चालू होत्या. शेवटी मला एक उत्तम पर्याय सापडला आणि मी माझ्या शाळेत जायच्या तयारीला लागले.
पावणेदहा वाजले होते. शाळेची घंटा झाली. होस्टेलमधल्या मुलींच्या शाळेत जाण्याच्या गडबडीने धाराला कदाचित जाग आली असावी. उठल्या उठल्या तिने तडक माझ्या खोलीकडे मोर्चा वळवला. दार उघडेच होते माझ्या खोलीचे.
धारा : इतक्यात जाऊन बी आलीया पेठाला (पेठ)? बरं जाऊ दे! आणलंस का माझं औषध?
मी : झाली का झोप धारा? चल, आता मस्त फ्रेश हो… कशी दिसतेस आरशात पाहिलेस का?
मी तिला माहिती काढून घेण्याच्या दृष्टीने विचारले. कारण आता तिच्या डोळ्याची लाली पूर्णपणे कमी झाली होती आणि माझ्या उपायासाठी तिने आरशात न बघणे सोयीचे होते. नाहीतर डोळ्यांत औषध टाकल्याचे समाधान तिला मिळाले नसते. मी विचारात असल्याचे पाहून धाराने माझा हात हातात घेतला.
धारा : म्या इथं बिछान्यावं निजू का? मंग औषध डाल माझ्या डोळ्यात.
मी काही म्हणायच्या आतच धारा पलंगावर जाऊन डोळे मिटून पडली. तिने डोळे मिटले. मी औषध काढले आणि तिच्या दोन्ही डोळ्यांत एक एक थेंब टाकला. थोड्या वेळ तिला डोळे मिटायला सांगितले. साधारण दोन मिनिटात तिने डोळे उघडले. मी तिला आरसा दिला आणि म्हणाले, ‘बघ बरं, बरे झाले किनई तुझे डोळे! उगाच रडत बसलीस. वेडूबाई.’
धाराची कळी खुलली. पटकन होस्टेलमध्ये जाऊन शाळेसाठी तयार झाली. वर्गात जाऊन बसली. त्यानंतर धाराचे डोळे कधीच आले नाहीत. जालीम औषधच वापरले होेते ना मी… तुम्हाला सांगू का त्या औषधाचे नाव? ते औषध म्हणजे होते फक्त पाण्याचे दोन थेंब… ‘जादूचं औषध!’
अमृता भालेराव