नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक (Nashik) हे प्रथा, परंपरा, ऐतिहासिक मंदिरांचे शहर म्हणून ओळखले जाते. मंदिर म्हटले की त्या त्या देवतांच्या आख्यायिका असतात, त्याच्या भोवती असलेले सेवेकरी त्यांच्या सुध्दा इतिहासात गोष्टी आहेत. नाशिकमधील सुप्रसिद्ध असलेले आणि शिवभक्तांचे (Shivbhakt) आराध्य देवांपैकी एक असलेले कपालेश्वर (Kapaleshwar) महादेव यांचे पंचमुखी मुकुट ज्यांच्याकडे आहे कै. दादाजी उमाशंकर वैद्य यांचे वंशज असलेले सुहास वैद्य आहेत. वैद्य कुटुंबीयांकडे १३२ वर्षांची मुकुटाची प्रथा आहे. या मुकुटाचा नेमका इतिहास काय आहे? हे दैनिक देशदूतच्या संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी संवादातून जाणून घेतले आहे.
याबाबत सुहास वैद्य सांगतात की, कपालेश्वराचा पंचमुखी मुकुट हा पंचकेदारांवर आधारित असून कै. दादा उमाशंकर वैद्य यांनी १८९३ मध्ये कपालेश्वरचरणी अर्पण केला. त्यानंतर आजपर्यंत प्रत्येक महाशिवरात्री, श्रावणी सोमवार आणि वर्षातील प्रत्येक सोमवती अमावस्येला कपालेश्वराला नेण्यात येऊन त्याची पारंपरिक पद्धतीने पालखी काढण्यात येते. ज्या दिवशी पंचमुखी मुकुटाची पालखी निघते त्याला महापर्व असे म्हटले जाते. वैद्य कुटुंबाचे वैद्य पालखी प्रोसेशन ट्रस्ट असून, त्यामार्फत वर्षाच्या प्रत्येक सोमवारी पालखी काढण्यात येते. वर्षातील ५२ सोमवार आणि महिन्यातील दोन प्रदोष असे २४ प्रदोष अशा ७६ पालख्या वैद्य कुटुंबीय १८९३ पासून ते २०२५ पर्यंत सलग १३२ वर्षे अविरत काढली जात आहे.
या मुकुटाच्या (Crown) सेवेबाबत हर्षा वैद्य यांनी सांगितले की, पंचमुखी मुकुट असल्यामुळे प्रत्येक मुखाची दिशा वेगवेगळी असून, त्यानुसार प्रत्येकाचे वेगवेगळे श्लोक आहेत. पंचामृताच्या अभिषेकाने त्याची विधिवत पूजा केली जाते. या पंचामृतात दूध, दही, मध, साखर आणि तुपाचा त्यात समावेश असतो, त्यासोबतच उसाचा रसही प्रसाद म्हणून असतो. पंचमुखी मुकुट पंचकेदारांवर आधारित असून मधल्या मुखावर गंगेची मूर्ती आहे. त्या मूर्तीवर पंचमुखी नागाची प्रतिमा आहे. प्रत्येक मुखाला अनुसरून ही पंचमुखी नागाची प्रतिमा आहे. भगवान शिवाच्या जटेत चंद्र असल्याने त्यात चंद्राची कोर आहे. या मुकुटाचे वैशिष्ट्य म्हणजे कपालेश्वराच्या शिवलिंगावर बसेल अशा आकाराचा हा मुकुट बनवण्यात आला आहे.
महाशिवरात्रीला (Maha Shivaratri) विशेष महत्त्व असल्याने त्या दिवशी भक्त आधी दुपारी शिवलिंगाचे दर्शन घेतात आणि नंतर या मुकुटाची पालखी निघते. ही पालखी निघण्यापूर्वी वैद्य कुटुंबीयांच्या घरी या मुकुटाची विधिवत पूजा करण्यात येते. अनेक भक्तगण घरी या मुकुटाच्या दर्शनासाठी येत असतात. त्यासाठी फुलांची सजावट करण्यात आलेली असते, त्यानंतर हा मुकुट कपालेश्वर मंदिरात नेण्यात येतो. दुपारी दोन वाजता कपालेश्वराची आणि मुकुटाची आरती करण्यात येते. त्यानंतर हा मुकुट पालखीत ठेवून त्याची मिरवणूक काढली जाते. ज्या पालखीतून मुकुटाची मिरवणूक काढली जाते ती पालखी देखील १३२ वर्षे जुनी असून शिसमच्या लाकडापासून बनवली आहे. यासोबतच मुकुटावरील रुद्राक्षाची माळही तेवढीच जुनी असल्याचे सुहास वैद्य यांनी सांगितले.
दरम्यान, यानंतर, पालखीची मिरवणूक (Procession) मालवीय चौक, शनी चौक, श्री काळाराम मंदिराचा पूर्व दरवाजा, सरदार चौक, गोरेराम लेन येथे सडा रांगोळी, पुष्पवृष्टी होऊन औक्षणाने आरती करत स्वागत केले जाते. त्यानंतर मुठे गल्लीतून रामकुंडावर येते. येथे संध्याकाळी साधारण दोन ते तीन तास रामकुंडावर पुरोहितांमार्फत मुकुटावर अभिषेक करण्यात येतो. त्यानंतर मुकुटाला फुलांचा साजशृंगार करण्यात येतो आणि कपालेश्वराला महाराज म्हणत असल्यामुळे त्यांना फेटा परिधान करण्यात येतो. आणि त्यानंतर पारंपरिक वाद्याच्या गजरात आरती करण्यात येते. त्यानंतर पुन्हा हा मुकुट पालखीत ठेवल्यावर ही पालखी मंदिरात बाजत गाजत नेण्यात येते. तेथे कपालेश्वर मंदिरातर्फे पुन्हा आरती करण्यात येते आणि त्यानंतर कपालेश्वराच्या शिवलिंगावर हा मुकुट विराजमान केला जात असल्याचे सुहास वैद्य सांगतात. यानंतर हा मुकुट भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येतो. भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुकुट वैद्य कुटुंबीयांच्या देवघरात स्थापन केला जातो.