Tuesday, September 17, 2024
Homeनगरमहाजन, मुरकुटेंच्या उंबरठ्यावर कानडे !

महाजन, मुरकुटेंच्या उंबरठ्यावर कानडे !

राजकीय भेटींची श्रीरामपूर मतदारसंघात चर्चा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

- Advertisement -

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात राजकीय नेत्यांना निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला आहे. त्यात काँग्रेसच्या उमेदवारीसाठी विद्यमान आ. लहू कानडे व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस हेमंत ओगले यांच्यात स्पर्धा सुरु असताना आ. कानडे यांनी शुक्रवारी माजी आमदार भानुदास मुरकुटे तर काल शनिवारी भाजपाचे मंत्री गिरीष महाजन यांची भेट घेतल्याने राजकीय निरीक्षकांच्या भूवया उंचावल्या आहेत. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या विद्यमान आ. लहू कानडे व हेमंत ओगले यांनी मतदारसंघात आपापल्या स्वतंत्र संवाद यात्रा सुरु केल्या आहेत.

यात हेमंत ओगले यांना जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे (ससाणे गट) यांचा खंबीर पाठिंबा असल्याने ससाणे-ओगले जोडी प्रमुख कार्यकर्त्यांना सोबत घेवून मतदारसंघ पिंजून काढत आहे. त्यात विद्यमान आमदारावर टिकाही केली जात आहे. तर आ. लहू कानडे आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांना सोबत घेवून प्रत्येक गावात व वाड्या-वस्त्यांवर जावून पाच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडत आहे. यापुढील निवडणुका ससाणे गटासोबत लढविण्याचा अलिखीत करार करुन अशोक कारखाना निवडणुकीत ससाणे गटाशी युती केलेले माजी आ. भानुदास मुरकुटे हे मात्र या स्पर्धेपासून अलिप्त दिसत आहेत.

श्रीरामपूर तालुक्यात श्री. मुरकुटे यांना मानणारा एक गट आहे. शिवाय अशोक कारखाना सत्तेच्या माध्यमातून त्यांनी आपला प्रभाव टिकवून ठेवला आहे. आ. कानडे यांनी शुक्रवारी माजी आ. भानुदास मुरकुटे यांची भेट घेवून आगामी निवडणुकीत मदत करण्याची विनंती केली. मात्र अद्याप कोणत्या पक्षाचे उमेदवार कोण हे निश्चित झालेले नसताना आताच मदत कशी करायची? असा प्रश्न श्री. मुरकुटे यांनी करुन सावध भूमिका घेतली आहे. दरम्यान काल राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन काल सायंकाळी एका कार्यक्रमासाठी श्रीरामपुरात आले असता नेवासा रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये आ. कानडे यांनी ना. महाजन यांची भेट घेवून चर्चा केली. त्यामुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मतदारसंघात राज्याचे मंत्री आल्याने लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे स्वागत करणे ही माझी जबाबदरी असल्याने ना. महाजन यांचा सत्कार करण्यासाठी गेलो होतो.
– आ. लहू कानडे

- Advertisment -

ताज्या बातम्या