Friday, November 15, 2024
HomeनगरMahalakshmi Idol In Kambi Shevgoan : छतावर कोरलेली 'महालक्ष्मी'ची मूर्ती, नंदी नसलेलं...

Mahalakshmi Idol In Kambi Shevgoan : छतावर कोरलेली ‘महालक्ष्मी’ची मूर्ती, नंदी नसलेलं ‘शिवलिंग’; कांबीतील ‘महालक्ष्मी’ मंदिर आहे आश्चर्याचा खजिना

शेवगाव । शहर प्रतिनिधी

हेमाडपंथी स्थापत्यशैलीत बांधलेल्या महालक्ष्मी देवी मंदिराच्या गाभाऱ्यात महाराष्ट्रात कुठेही नाही अशी छतावर कोरलेली महालक्ष्मीची मूर्ती शेवगाव तालुक्यातील कांबी गावात आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील कोल्हापूर वाशिनी म्हणून या महालक्ष्मीचा उल्लेख केला जातो.शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात गोदावरी नदी पासुन बाजूला वसलेल्या कांबी गावाला प्राचीन इतिहास आहे. जिल्ह्याच्या (नगर ) ठिकाणापासुन एकशेपाच,तर तालुक्याच्या (शेवगाव) ठिकाणापासून पस्तीस किलोमीटर अंतरावर हे गाव आहे.

कांबीचे भौगोलिक स्थान पाहिल्यास कांबी हे गाव नगर, बीड, जालना आणि औरंगाबाद या चार जिल्ह्यांच्या सीमेवर येते. गोदावरी काठच्या या परिसराला काम्यक वन म्हणून ओळखले जाते. तसा उल्लेख काशीखंड कथासार या पुराणग्रंथात आढळतो,महाभारतामध्ये पांडवांनी ज्या जंगलातून वनवास केला त्या जंगलास काम्यक वन म्हटले आहे.

या वनातील परिसरात ऋषी, मुनी, साधू, तपस्वी यांनी आश्रम स्थापून वास्तव्य केले आहे. यादव घराण्याचा उदय महाराष्ट्रात बाराव्या शतकात झाला. दृढ प्रहार हा राजा यादव घराण्याचा संस्थापक होय. देवगिरीच्या राजधानी मधुन यादव राजांनी अनेक मंदिरांची निर्मिती केली आहे. हेमाडपंथी स्थापत्यशैली यादवांच्या काळात विकसित झाली असल्याने त्या पद्धतीची मंदिरे निर्माण केली आहेत. त्यातीलच एक कांबी गावातील महालक्ष्मीचे मंदिर आहे.

ते पूर्वाभिमुख असुन मंदिरामध्ये अनेक ठिकाणी दगडांवर शिल्पकाम केलेले आढळते. मंदिरात महालक्ष्मीची विलोभनीय मूर्ती आहे. ती दरवाज्यासमोर नसून, छतावर कोरलेली आहे. महालक्ष्मी मंदिरात एक शिवलिंग असुन त्या जवळ नंदी नाही. मंदिरामधील शिलालेखाचे वाचन ब्रह्मानंद देशपांडे यांनी केले असून त्यात मंदिर निर्माण करणाऱ्या यादव राजाविषयी माहिती दिलेली आहे.

खांबावर सुबक नक्षीकाम केलेले आहे.मंदिराच्या बाहेर नवीन बांधलेल्या सभामंडपात काही वीरगळ भग्न अवस्थेत उभ्या केल्या असुन त्या स्थापत्य कलेची साक्ष देत आहेत त्यामुळे या मंदिराचे जतन करण्याची मागणी कांबी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

कांबी ग्रामस्थांनी हेमाडपंथी प्राचीन मंदिराचा ठेवा आत्तापर्यंत जतन केला परंतु कालपरत्वे नष्ट होत चालल्या या मंदिरांची,येणाऱ्या भावी पिढीला प्रचिती मिळावी यासाठी पुरातत्व विभागाने याची जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी उचलावी.
– डॉ.अरुण भिसे-ग्रामस्थ कांबी

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या