पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
बीडच्या मस्साजोगचे सरपंच स्व.संतोष देशमुख यांच्या खुनातील आरोपींना आम्ही पाठीशी घालत नसून, भगवानगड स्व.संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आहे, आरोपींच्या नव्हे असे स्पष्ट करून भगवानगडाचे महंत डॉ.नामदेवशास्त्री यांनी माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जात असल्याचे सांगितले. संत भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर डॉ.नामदेव शास्त्री यांची स्व.संतोष देशमुख कुटुंसयिांंनी रविवारी (दि.2) भगवानगडावर भेट घेतली. त्यांच्यात अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली.
दोन दिवसांपूर्वी महंत नामदेवशास्त्री यांनी धनंजय मुंडे यांचे समर्थन करून आरोपींची मानसिकता अशी का झाली, हे तपासण्याची गरज आहे असे वक्तव्य केले होते. त्यानंतर रविवारी स्व.संतोष देशमुख यांचेे बंधू धनंजय देशमुख, मुलगी वैभवी, मुलगा व इतर नातेवाईकांनी नामदेव शास्त्री यांची भेट घेऊन आरोपींविरुद्ध असलेले अनेक गुन्हे व सरपंच संतोष देशमुख यांचे चांगले काम याबाबतची कागदपत्रे महंतांना दिली. महंत नामदेव शास्त्री म्हणाले, स्व. संतोष देशमुख यांचे कुटुंबीय हे भगवानगडाला मानणारे असून ते नेहमी भगवानगडावर भगवान बाबांच्या दर्शनासाठी येतात. देशमुख कुटुंबियांनी आरोपींविरोधात असलेले अनेक गुन्ह्यांची कागदपत्रे दाखवली आहेत. स्व.देशमुख यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेल्या चांगल्या कामांची प्रमाणपत्रे दाखवली. अनेक पुरस्कार गावाला मिळाले आहेत. देशमुख कुटुंबीय हे भगवान बाबांना मानणारे आहे.
आज मला ते कळाले असून देशमुख कुटुंबियांची जमीन तीन पिढ्यांपासून वंजारी समाजाचे मुंडे कुटुंबीय करीत आहे. त्यामुळे जातिवाद न करता खर्या आरोपींना शिक्षा व्हावी, असे माझे भगवान बाबांच्या गादीवरून सर्वांना सांगणे आहे. जातिवाद न करता सामाजिक सलोखा कायम राहण्यासाठी देशमुख कुटुंबीय भगवानगडावर आल्याचेही यावेळी नामदेव शास्त्री म्हणाले.धनंजय देशमुख म्हणाले, स्व. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व समाजातील लोक मदत करत आहेत. परंतु ज्याला आरोपीची बाजू घ्यायची आहे. तेच लोक जातिवाद करत आहे. या प्रकरणात कोणी जातिवादपणा करत असेल तर त्याला आपण समज देण्याचे काम करावे. बीड जिल्ह्यासह राज्यातील लोकप्रतिनिधी, पोलीस यंत्रणा पहिल्या दिवसापासून न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेत देशमुख कुटुंबियांबरोबर आहे. त्यांना जातीवादी म्हणण्यात आले, असा प्रकार घडला तर न्याय कधी मिळणार, असेही ते म्हणाले.
गुन्हेगारी विरोधात लढा
वैभवी देशमुख म्हणाली, गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांमुळे माझ्या वडिलांची हत्या झाली आहे. हि वृत्ती समाजातून बाहेर काढायची आहे. या आरोपींचे कोणाला समर्थन करायचे असेल तर त्याच्यावर आम्हाला काही बोलायचं नसून त्याआडून आरोपीची पाठराखण करणारे जातिवाद काढत आहेत. देशमुख कुटुंबियांनी कधी जातिवाद केला नसून आता न्याय मिळणे गरजेचे असताना जातिवादाचे वेगवेगळे फाटे फुटत आहेत.
आरोपींचे कधीही समर्थन करणार नाही
लवकरात लवकर हा खटला फास्टट्रॅकवर चालवून न्याय मिळावा यासाठी भगवान बाबाला माझी प्रार्थना असेल. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ झाला असेल मात्र आरोपींचे कधीही समर्थन करणार नाही. आरोपी हे आरोपीच असून ते गुन्हेगार आहेत. हे सांगण्यासाठी देशमुख कुटुंबिय या भगवानगडावर आले असून ते गडाचेच कुटुंब आहे. याला जातीय रंग न देता न्यायासाठी सर्वजण प्रार्थना करू, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.