संगमनेर (प्रतिनिधी) – पोलीस भरतीच्या व सर्व स्पर्धा परिक्षा महाराष्ट्र शासनाने महापोर्टलद्वारे घेण्याच्या ठरविल्या. मात्र महापोर्टल चालविणार्या युएसटी ग्लोबल कंपनीला मध्यप्रदेश सरकारने व्यापम घोटाळ्यात काळ्या यादीत टाकले आहे. तेव्हा महाराष्ट्र शासनाने सदर महापोर्टल रद्द करावे, अशी मागणी छात्रभारती विद्यार्थी संघटनेनी केली आहे.
महापोर्टलद्वारे 1 डिसेंबरपासून महापोर्टलने आखलेले परीक्षांचे नियोजीत वेळापत्रक रद्द करावे व याच परीक्षा एमपीएसीमार्फत घ्याव्यात. महापोर्टल बंद करावे ही मागणी राज्यातील पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी महाराष्ट्र शासनाकडे करत आहेत. परंतु मागील सरकारने या प्रश्नावर अद्याप कोणताही तोडगा काढलेला नाही. महापोर्टलच्या विरोधात राज्यातील विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत. परंतु सरकारने त्यांना कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. विद्यार्थी अनेक वर्षांपासून हजारो रुपये खर्च करुन प्रशिक्षण घेतात, अभ्यास करतात.
मात्र मागील सरकारने पोलीस भरती काढलेली नसताना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अवघ्या 3 हजार 400 जागा काढल्या होत्या. इतक्या अल्प पोलीस भरतीच्या जागा काढून सरकारने विद्यार्थ्यांची चेष्टा केली आहे. त्यामुळे सदर महापोर्टल तातडीने रद्द करुन सर्व विभागांची पदे एमपीएससीमार्फत भरण्यात यावीत अशी मागणी छात्रभारती संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन प्रांताधिकार्यांना देण्यात आले आहे. यावेळी छात्रभारती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अनिकेत घुले, गणेश जोंधळे, तुषार पानसरे, शीतल रोकडे, सचिन सानप, कमलेश वराडे, गणेश सानप, विजय भोसले, शिवम शिंदे, विजय कदम, माधव वायकर, प्रशांत शिंदे आदी उपस्थित होते.