Wednesday, November 20, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Assembly Election 2024 : निफाड मतदारसंघात 63.25 टक्के मतदान

Maharashtra Assembly Election 2024 : निफाड मतदारसंघात 63.25 टक्के मतदान

निफाड। प्रतिनिधी Niphad

निफाड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सायंकाळी 6 वाजेपर्यंत 63.25 टक्के मतदान झाले. निफाड मतदारसंघात मतदार राजामध्ये उत्साह बघायला मिळाला. यात महिला वर्गामध्ये जास्त उत्साह बघायला मिळाला. यासाठी प्रशासनाने विविध उपक्रम राबविले. प्रत्येक मतदार केंद्रात महिलांचे प्रमाण मतदार रांगेत लक्षणीय होते. त्यामुळे स्त्री शक्तीचा कौल कोणाच्या बाजूने झुकतो, यावरच आता निफाड मतदारसंघातील प्रमुख तीन उमेदवारांमध्येच लढत होणार आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी करत असलेले विद्यमान आमदार दिलीपराव बनकर, शिवसेना उबाठा पक्षाकडून उमेदवारी करत असलेले माजी आमदार अनिल कदम तर प्रहार जनशक्ती पक्षाकडून उमेदवारी करत असलेले गुरुदेव कांदे या तीन प्रमुख उमेदवारांमध्येच लढत होऊन उर्वरित सहा उमेदवारांपैकी अपक्ष तीन व इतर तीन पक्षांचे उमेदवार या निवडणुकीत लढत देत आहे. परंतु तुल्यबळ लढत या तीन उमेदवारांमध्येच होणार असल्याने यात स्त्री शक्तीच्या गर्दीवरून त्यांचे मतदान कोणाच्या बाजूने झुकते व त्याचा फायदा कोणत्या उमेदवाराला होईल, हे 23 तारखेच्या निकालावरून स्पष्ट होणार आहे.

सकाळी 7 वाजेपासूनच संपूर्ण मतदारसंघात मतदारांनी उत्साह दाखवत मतदानस्थळी जावून मतदान करण्याचे आपले पवित्र काम केले. काही अपवाद वगळता सगळीकडेच शांततेत मतदान झाले. काही ठिकाणी किरकोळ वाद वगळता निफाड मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी हेमांगी पाटील, सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार विशाल नाईकवाडे, अमोल चौधरी, राहुल मुळीक आदींनी योग्य प्रकारे निवडणूक अधिकारी, कर्मचारी, सेवक यांच्या माध्यमातून सदर परिस्थितीवर निफाड प्रशासकीय कार्यालयातून संपूर्ण मतदारसंघात लक्ष ठेवले.

तर काही ठिकाणी हेमांगी पाटील यांनी भेटी देऊन परिस्थिती हाताळली. पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस विभागीय अधिकारी डॉ.निलेश पालवे यांच्या नेतृत्वाखाली निफाड पोलीस निरीक्षक गणेश गुरव, पिंपळगाव बसवंत पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, ओझर पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, सायखेडा सहाय्यक उपनिरीक्षक विकास ढोकरे यांनी संपूर्णपणे पोलीस प्रशासनाच्या मदतीने मतदार संघातील परिस्थिती हाताळली.

ओझर येथील बुथ क्र. 123 मतदान केंद्रात नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्याचा देखावा तर पिंपळगाव बसवंत येथील बुथ क्रमांक 29 या मतदान केंद्रात किल्ल्यांची प्रतिकृती उभारण्यात येवून आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी हेमांगी पाटील यांनी दिली. या मतदार संघात तीन सखी बुथ तयार करण्यात आले होते. गुलाबी रंगात महिलांसाठी अनेक प्रकारच्या सजावट करण्यात आली होती. पिंपळगाव येथील बुथ क्र. 38, निफाड येथील बुथ क्र. 179, 182 असे सखी बुथ उभारण्यात आले होते.अशी माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी दिली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या