दिंडोरी । प्रतिनिधी Dindori
दिंडोरी – पेठ विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदान करून शांततेत मतदान पार पडले असून 78.1 टक्के मतदान झाले असून जिल्ह्यात हे मतदान एक क्रमांक ठरले आहे. विशेष म्हणजे मतदानात महिलांनी विक्रमी मतदान केले. वाढलेला मतदानाचा टक्का कोणाला उपकारक ठरतो हे येत्या दि. 23 तारखेला कळेल.
गेल्यावेळी विधानसभेला 69.75 टक्के मतदान झाले तर लोकसभेला 75.5 टक्के मतदान झाले होते. यंदा त्यात विधानसभेच्या तुलनेत 8 टक्के तर लोकसभेच्या तुलनेत 3% मतदानात वाढ झाली आहे.एकूण 256760 मतदारांपैकी 256760 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात महिलांनी 129560 मतदान केले तर 134800 पुरुष मतदारांनी मतदान केले आहे.
महायुतीचे उमेदवार आ. नरहरी झिरवाळ, महाविकास आघाडीच्या उमेदवार सुनिता चारोस्कर, अपक्ष उमेदवार संतोष रहेरे यांंच्यासह 13 उमेद्वारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. सर्व उमेदवारांनी शेवटच्या मतदारापर्यंत गावोगावी फिरुन मतदानाची परिस्थिती जाणुन घेतली. आता कार्यकर्ते आकडेमोड करण्यात व्यस्त झाले असून उमेदवारांच्या मनातील धाकधुक वाढली आहे.
सध्या सर्वत्र द्राक्षशेतीच्या कामांना वेग आल्यामुळे मतदारांनी कामातून वेळ काढून मतदान केले. दुपारी बारा वाजेपर्यंत मतदारांमध्ये धीम्या गतीने मतदान करण्यात येत होते मात्र तीन वाजेनंतर पुन्हा एकदा शेतातील शेतमजूर वाड्या वस्तीवरील नागरिकांनी व महिलांनी मोठी गर्दी करून आपल्या मतदानाचे कर्तव्य पार पाडले. दुपारच्या वेळेत सुद्धा भर उन्हात मतदारांनी आपला हक्क बजावीला.मतदान करण्यासाठी अबालवृद्ध तसेच महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.दिंडोरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
गावनिहाय निहाय मतदान पुढील प्रमाणे :-
दिंडोरी शहर 79 %, वणी शहर 66.25 %, ओझे 85.97 %, करंजवण 83.1 %, जानोरी 78.80%, निळवंडी -79.7%, शिंदवड -83.6%, वरवंडी -78.66%, मडकीजांब – 77.27%, तळेगाव दिंडोरी – 76.80%, चाचडगाव -84 टक्के, परमोरी – 83%, पाडे 82 %, दहेगाव – 84.17%, खेडगाव -72.66%, वनारवाडी – 91%, लोखंडेवाडी -86.21%, चिंचखेड 77.61%, सोनजांब -81%, मोहाडी -70%, पिंपळणारे 70%, अवनखेड -79%, जऊळकेवणी -84%, पिंंपळगाव धूम-76.76%, खडकसुकेणे 83.76 %, रासेगाव -76.47%, आशेवाडी – 76%, रवळगाव 80%, चिंचखेड -77.61%, वलखेड -84.22%, आंबेगण -82%, तळेगाव वणी – 80.22 %, ओझरखेड -76%, मातेरेवाडी – 84%, कसबेवणी-66.25%, कोर्हाटे- 76.49%, पालखेड बंधारा- 84.40%, जऊळके दिंडोरी -70.78 %, अवनखेड – 79 %, पांडाणे-81%, आंबेदिंडोरी -78%, म्हेळूस्के-82.94 %, कुर्णोली- 76.92 %, वाघाड -82 %, खतवड -81. 46% इतके मतदान झाले आहे.
वणी शहरात 66.25 टक्के मतदान
वणी। वणी शहरात 66.25 टक्के मतदान झाले. एकूण 12 मतदान केंद्रावर एकुण 12852 पैकी 8515 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत 13 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदीस्त केले.
दिंडोरी-पेठ विधानसभा मतदार संघात महायुतीच्या वतीने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ विरुद्ध महा आघाडीच्या उमेदवार माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या पत्नी सुनिता चारोस्कर यांच्यात समोरासमोर लढत आहे. याच मतदार संघाचा केंद्रबींदू असलेल्या वणी शहरात बारा मतदान केंद्रात मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी सर्वच मतदान केंद्रावर उत्साह दिसुन आला.
दुपार नंतर मतदारांची गर्दी कमी झालेली दिसत होती. दरम्याण अगदी 95 वर्षाच्या वृध्दाने मतदानाचा हक्क बजावला तसेच नविन मतदार यांनी पहिला मतदानाचा हक्क बजावण्याचा उत्साह दिसुन येत होता. वणी शहरातुन 12 मतदान केंद्रावर एकुण 12852 पैकी 8515 म्हणजेच शेकडा 66.25% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा