Friday, November 22, 2024
HomeनगरAssembly Election 2024 : जिल्ह्यातही बंडाचे झेंडे कायम, बहुरंगी लढती

Assembly Election 2024 : जिल्ह्यातही बंडाचे झेंडे कायम, बहुरंगी लढती

अहिल्यानगर । प्रतिनिधी

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली असून काल अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी एकंदरित राज्यासह जिल्ह्यातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत युती व आघाडी कडून बंडखोरांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू होता.

- Advertisement -

यामध्ये काही मतदारसंघांमध्ये त्यांना यश आले असून काही मतदारसंघांमध्ये बंडखोरांनी आपली भूमिका ठाम ठेवल्याने युती व आघाडीला निवडणुकांमध्ये मोठी डोकेदुखी ठरणार आहे. अनेक मतदारसंघात बहुरंगी लढतीचे तर काही ठिकाणी सरळ लढतीचे चित्र आहे.

जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी बारा मतदारसंघांत मिळून २६९ उमेदवारी अर्ज दाखल होते. त्यापैकी १०८ जणांनी माघार घेतली असून आता विधानसभेच्या १२ जागांसाठी १५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

यात सर्वाधिक उमेदवार हे श्रीरामपूर आणि श्रीगोंदा मतदारसंघात आहेत. शिर्डीत अवघे ८ आणि अकोल्यात ९ आहेत. सोमवारी दुपारी तिननंतर मतदारसंघनिहाय शिल्लक राहिलेल्या आणि निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या मतदारसंघनिहाय अकोले ९, संगमनेर १३. शिर्डी ८. कोपरगाव १२, नेवासा १२, श्रीरामपूर १६, शेवगाव १५, राहुरी १३, पारनेर १२, नगर शहर १४ व कर्जत-जामखेड ११ आणि श्रीगोंदा १६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

नगर शहर

नगर शहर मतदारसंघांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने बंडखोरी केली आहे.

श्रीरामपूर

श्रीरामपूर मतदारसंघ हा राखीव असल्यामुळे या ठिकाणी सुद्धा बंडखोरी झाली आहे, या ठिकाणी माजी आमदार लहू कानडे आणि माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी बंडखोरी केली आहे. याठिकाणी आघाडीकडून हेमंत ओगले मैदानात आहेत. तसेच राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.

राहुरी-नगर-पाथर्डी

या विधानसभा मतदार संघात शिवाजी भानुदास कर्डिले (भाजपा), प्राजक्त प्रसादराव तनपुरे (राष्ट्रवादी काँग्रेस, श.प.गट), ज्ञानेश्वर दत्तात्रय गाडे (मनसे), साहेबराव पाटीलबा म्हसे (महाराष्ट्र स्वराज्य पार्टी), यांच्यासह १३ उमेदवार निवडणूक आखाड्यात उतरले आहेत.

नेवासा

नेवासा मतदारसंघांमध्ये भाजपाने बंडखोरी केली आहे. यामध्ये माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी प्रहार जनशक्तीकडून या ठिकाणी उमेदवारी अर्ज ठेवला आहे. या मतदार संघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार शंकरराव गडाख व एकनाथ शिंदे गटाचे विठ्ठलराव लंघे यांनी उमेदवारी अर्ज ठेवल्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत होत आहे.

शेवगाव

शेवगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेद्वार आमदार मोनिका राजीव राजळे व महाविकास आघाडीचे प्रतापराव बबनराव ढाकणे राष्ट्रीय समाज पक्षाचे आत्माराम किसन कंडकर बहुजन समाज पार्टीचे सुभाष त्रिंबक साबळे वंचित बहुजन आघाडीचे प्राध्यापक किसन जगन्नाथ चव्हाण यांच्यातील पंचरंगी लढतीत माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील व माजी जि. प. सदस्य सो हर्षदा काकडे यांच्या अपक्ष उमेदवारीने रंगत निर्माण झाली असून शेवगाव विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे.

अकोले

अकोले मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीही आघाड्यांमध्ये बंडखोरी झाली असून भाजपचे माजी मंत्री पिचड यांचे पुत्र, माजी आमदार वैभव पिचड, शिवसेना बंडखोर मधुकर तळपाडे व माजी उपसभापती मारुती मॅगाळ या प्रमुख उमेदवारांनी आपले अपक्ष अर्ज कायम ठेवले आहेत.

श्रीगोंदा

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे बंडखोर माजी आमदार राहुल जगताप आणि भाजपचे बंडखोर सुवर्णा पाचपुते यांनी आपले अर्ज मागे घेतले नाही. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हींचे बंडखोर रिंगणात आहेत. विशेष म्हणजे भाजपची उमेदवारी प्रतिभा पाचपुते यांना पंधरा दिवसांपूर्वीच जाहीर झालेली होती मात्र प्रतिभा पाचपुते यांच्याऐवजी त्याचे चिरंजीव विक्रम पाचपुते यांना पक्षाने उमेदवारी द्यावी यासाठी पाचपुते कुटुंब प्रयत्नशील होते. प्रतिभा पाचपुते यांनी मुलगा विक्रम पाचपुते यांना उमेदवारी दिली नाही. तर आपण आपला अर्ज मागे घेणारच अशी घोषणा केलेली होती. यामुळे भाजप पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष लागले होते. परंतु उशिरापर्यंत पक्षश्रेष्ठींचा फोन आला नाही तरीही प्रतिभा पाचपुते यांनी आपला अर्ज मागे घेतला यानंतर विक्रम पाचपुते यांचा उमेदवारी अर्ज कायम ठेवण्यात आला.

पारनेर

पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये पंचरंगी लढत पाहायला मिळणार आहे याठिकाणी माजी आमदार विजय औटी व माजी नगराध्यक्ष विजय औटी या दोघांनीही आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे तर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख सदेश कार्ले यांचा सुद्धा उमेदवारी अर्ज ठेवला आहे. तर या ठिकाणी अजित पवार गटाचे काशिनाथ दाते व खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे पारनेरमध्ये पंचरंगी लढत पाहायला मिळत आहे.

शिर्डी

लोकसभा मतदारसंघांमध्ये महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील निवडणूक लढवित असून महाविकास आघाडीतर्फे प्रभावती घोगरे निवडणूक रिंगणात आहेत. डॉ. राजेंद्र पिपाडा यांनीही आपला उमेदवारी अर्ज तसाच ठेवला आहे.

कर्जत जामखेड

कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये आमदार रोहित पवार विरुद्ध माजी मंत्री व भाजपाचे विद्यमान आमदार राम शिंदे यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे. विशेष म्हणजे या विधानसभा निवडणुकीमध्ये दोन रोहित पवार आणि तीन राम शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या विधानसभा निवडणुकीमध्ये रोहित राजेंद्र पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार असताना रोहित चंद्रकांत पवार हे अपक्ष उमेदवार देखील रिंगणात आहेत. तर प्राध्यापक राम शंकर शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असताना राम प्रभू शिंदे हे ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक व राम नारायण शिंदे हे अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

संगमनेर

संगमनेर मतदारसंघांमध्ये महसूल मंत्री राहिलेले विद्यमान आमदार काँग्रेसचे बाळासाहेब थोरात विरुद्ध महायुतीचे अमोल खताळ अशी लढत होणार आहे. या मतदारसंघातही अन्य ११ उमेदवार नशीब अजमावत आहेत.

कोपरगाव

कोपरगाव मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार आशुतोष काळे यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीकडून संदीप वर्षे यांची सरळ लढत होणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या