मुंबई । Mumbai
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत संपली असली आहे. या निवडणुकीकरिता २८८ मतदारसंघासाठी मंगळवार (२९ ऑक्टोबर) पर्यंत ७ हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ अर्ज दाखल झाले आहेत.
दरम्यान पक्षाकडून संधी न मिळालेल्या इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीकडून बंडखोरांना समजवण्याचे प्रयत्न होताना दिसणार आहेत.
याचपार्श्वभूमीवर, महाविकास आघाडीमधील मतभेद मिटवून ऐक्य टिकवण्यासाठी काँग्रेसने बंडखोर उमेदवारांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीमध्ये कुठलीही मैत्रिपूर्ण लढत होणार नाही, पक्षाच्या अधिकृत उमेदवारीशिवाय ज्यांनी कुठे उमेदवारी अर्ज भरले असतील त्यांनी ते मागे घेतले पाहिजेत, असे स्पष्ट आदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी काँग्रेसच्या बंडखोरांना दिले आहे.
चेन्नीथला म्हणाले, आमच्याकडून जे कुणी बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांचे अर्ज आणि उद्या मागे घेण्यात येतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. आम्ही केवळ हायकमांडने घोषित केलेल्या उमेदवारांनाच एबी फॉर्म दिला आहे. अन्य कुणाला एबी फॉर्म दिलेला नाही. काँग्रेसच्या हायकमांडने उमेदवारी जाहीर केलेल्या उमेदवारांचाच प्रचार करा, असं आवाहन मी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना करत आहे. त्याशिवाय ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले पाहिजेत. महाविकास आघाडीमध्ये कुठलीही मैत्रिपूर्ण लढत होणार नाही. जिथे कुठे मतभेद असतील ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि वर्षा गायकवाड सोडवण्याचे प्रयत्न करतील, असेही चेन्निथला यांनी सांगितले.
तसेच, महाविकास आघाडीच्या सगळ्या २८८ उमेदवारांचे अर्ज काल दाखल झाले आहेत. महाविकास आघाडी एकसाथ मजबुतीने निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाली आहे. मविआचे सर्व उमेदवार आता जनतेमध्ये आहेत. महायुतीशी तुलना केल्यास महाविकास आघाडीमध्ये कुठलेही मतभेद नाही. पण महायुतीमध्ये आपापसात भयंकर भांडणं सुरू आहेत. भाजपाचे नेते शिंदे आणि अजित पवार गटातून लढत आहेत, असं मी कधी पाहिलेलं नाही. महायुती ही एक विचित्र आघाडी आहे. महायुतीमधून भाजपाच निवडणूक लढवत आहे. महायुतीचा कुठलाही प्रभाव आणि अस्तित्व दिसत नाही आहे. कारण महायुती संपली आहे. भाजपाने शिंदे आणि अजित पवार यांना या निवडणुकीतून संपवलं आहे. पण पण महाविकास आघाडीमध्ये असं नाही, असा दावा चेन्निथला यांनी केला.