Tuesday, November 5, 2024
HomeनाशिकAssembly Election 2024 : नाशिक जिल्ह्यात बंडाचे झेंडे कायम; दुरंगी-चौरंगी होणार लढती

Assembly Election 2024 : नाशिक जिल्ह्यात बंडाचे झेंडे कायम; दुरंगी-चौरंगी होणार लढती

नाशिक | Nashik

विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर काल अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे महायुती आणि मविआच्या वरिष्ठ नेत्यांकडून आपआपल्या पक्षातील उमेदवाराची बाजू भक्कम करण्यासाठी रिंगणातील बंडखोरांना थंड करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. नांदगाव, देवळाली वगळता सर्वच ठिकाणी बंडखोरी शमल्याने महायुती आणि महाविकास आघाडीसह अनेक अपक्ष उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत काही ठिकाणी चौरंगी तर काही ठिकाणी दुरंगीच होणार आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Assembly Elections 2024 : नाशिक जिल्ह्यातील १५ जागांसाठी २०० उमेदवार रिंगणात; १३७ जणांनी घेतली माघार

यात नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघातील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघातून ३३७ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर माघारीच्या शेवटच्या दिवशी १४१ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता १५ विधानसभा मतदारसंघात १९६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये सर्वाधिक उमेदवार हे मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात तर सर्वात कमी उमेदवार कळवण विधानसभा मतदारसंघात आहेत. त्यामुळे आता कोणत्या मतदारसंघातून कोण रिंगणात आहेत हे जाणून घेऊयात.

हे देखील वाचा : Nashik Political : महाविकास आघाडीच्या इच्छुक उमेदवारांचा नरहरी झिरवाळांना पाठिंबा

मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ

मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात माघारीनंतर पालकमंत्री दादा भुसे,उबाठा सेनेचे अव्दय हिरे व अपक्ष उमेदवार प्रमोद-बंडुकाका बच्छाव या तिघा मातब्बरांमध्ये लढत रंगणार आहे. मात्र बसपा, वंचित आघाडीसह दोघा पार्टी व दहा अपक्ष उमेदवारांनी निवडणूक रिंगणात लढण्याचा पवित्रा कायम ठेवल्याने या पार्टी-अपक्षांची उमेदवारी निवडणुकीतील रंगत वाढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ

मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात माघारीच्या अंतिम मुदतीत तीन इच्छुकांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतले. यामुळे १३ उमेदवार निवडणूक रिंगणात स्वतःचे नशीब आजमावत आहे. विद्यमान आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल, माजी आमदार आसिफ शेख रशीद, समाजवादी पार्टी जिल्हाध्यक्ष शानेहिंद निहाल अहमद व काँग्रेसतर्फे एजाज बेग अजीज बेग हे चौघे मातब्बर उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक अटीतटीची व चुरसपूर्ण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या चौरंगी लढतीत विविध पार्टीसह सात अपक्ष उमेदवार देखील निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यामध्ये मोहंमद इस्माईल जुम्मन या अपक्ष उमेदवाराने मध्यबरोबर बाह्य मतदारसंघात देखील निवडणूक रिंगणात उतरण्याचा आपला पवित्रा कायम ठेवल्याने त्यांची उमेदवारी शहरात चर्चेचा विषय बनली आहे.

येवला विधानसभा मतदारसंघ

येवला विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत ३० पैकी १७ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे निवडणूक रिंगणात १३ उमेदवार राहिले असले तरी महायुतीचे मंत्री छगन भुजबळ आणि महाविकास आघाडीचे अॅड. माणिकराव शिंदे अशी सरळ लढत होत आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या (सोमवारी) शेवटच्या दिवशी शिवसेना (उबाठा) ग्रामीण जिल्हा प्रमुख कुणाल दराडे, राष्ट्रवादी (शपा) पक्षातील इच्छुक सचिन आहेर, गोरख पवार, जयदत्त होळकर या प्रमुखांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महाविकास आघाडीतील बंडखोरी थांबली. तर बहुजन समाजपार्टीचे पौलस अहिरे, राष्ट्रीय स्वाभिमानी सेनेचे शेरूभाई मोमीन या पक्षीय उमेदवारांसह अपक्ष अशा एकूण १७ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. दरम्यान, निवडणूक रिंगणातील ४ पक्षीय उमेदवारांसह ९ अपक्ष अशा १३ उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले.

बागलाण विधानसभा मतदारसंघ

बागलाण विधानसभा मतदारसंघात माघरीनंतर १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पारंपरिक दिलीप बोरसे व दिपीका चव्हाण या आजी-माजी आमदारांमध्ये लढत रंगणार असली तरी १५ अपक्षांनी रिंगणात राहण्याचा घेतलेला निर्णय निवडणुकीची रंगत वाढविणारा ठरणार आहे. भाजप-राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून अनेक मातब्बर निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र, पक्षाने उमेदवारी नाकारण्याबरोबरच माघार घेण्याबाबत त्यांचे मन वळविले असले तरी प्रहार जनशक्ती पक्षाच्या जयश्री गरूड यांच्यासह इतर १४ मातब्बर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असल्याने या मतदार संघातील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.

दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघ

दिंडोरी पेठ विधानसभा मतदार संघात २१ उमेदवारांपैकी ८ उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघारी घेतल्याने १३ उमेदवार रिंगणात उरले आहेत. मात्र, खरी लढत महायुतीचे नरहरी झिरवाळ, महाविकास आघाडीचे सुनीता चारोस्कर, संतोष रहेरे व सुशीला चारोस्कर यांच्यात जोरदार लढत रंगणार आहे. प्रचारासाठी कमी कालावधी शिल्लक असल्याने उमेदवारांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. शेवटच्या दिवशी महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार धनराज महाले यांनी माघार घेतली. धनराज महाले यांच्या उमेदवारीवर अनेक अंदाज व्यक्त होत होते. त्यात धनराज महाले कालपासून नॉटरिचेबल झाल्याने नाट्यमय रंगत आली होती. अखेरीस ३ वाजता धनराज महाले यांनी सूचकातर्फे उमेदवारी माघारीचा अर्ज पाठवला.त्यामुळे आता गोरख गोतरणे (बहुजन समाज पार्टी), सुनीता चारोस्कर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार), नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार), चंदर गायकवाड (निर्भय महाराष्ट्र पार्टी), भारत गायकवाड (भारत ट्रायबल पार्टी), योगेश भुसार (बहुजन वंचित आघाडी), दीपक जगताप, निवृत्ती गालट, मुरलीधर कनोजे, वसंत शेखरे, सविता गायकवाड, सुशीला चारोस्कर, संतोष रेहरे हे १३ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.

चांदवड- देवळा विधानसभा मतदारसंघ

चांदवड- देवळा विधानसभा मतदार संघात आठ उमेदवारांनी माघार घेतली असून, १४ उमेदवार रिंगणात आहेत. येथे महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार भाजपचे डॉ. राहुल आहेर यांच्यासमोर बंडखोर आणि अपक्ष म्हणून उभे असलेले केदा आहेर यांचे आव्हान आहे. तसेच काँग्रेसने माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली आहे. प्रहार जनशक्ती पक्षातर्फे गणेश निंबाळकर हे देखील रिंगणात आहेत. या मतदार संघात भाजपचे
बंडखोर आत्माराम कुंभार्डे व काँग्रेसचे संजय जाधव यांनी माघार घेत अपक्ष केदा आहेर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. माघार घेणाऱ्यांमध्ये धनश्री आहेर, शाम पगार, संपत वक्ते, सूरज चिंचोले व सचिन राजेदेवरे यांचा समावेश आहे.

इगतपुरी -त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघ

इगतपुरी -त्र्यंबकेश्वर मतदार संघात २८ उमेदवारांपैकी ११ जणांनी माघार घेतली असून आता १७ जण रिंगणात राहिले आहेत. यात महाविकास आघाडीच्या माजी आमदार निर्मला गावित आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जयप्रकाश झोले यांनी बंड करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे विद्यमान महायुतीचे आमदार हिरामण खोसकर, महाविकास आघाडीचे लकीभाऊ जाधव, मनसेनेचे काशिनाथ मेंगाळ आणि अपक्ष निर्मला गावित यांच्यात चौरंगी लढत होणार आहे.
मतदारसंघात काशिनाथ दगडु मेंगाळ, हिरामण भिका खोसकर, धनाजी अशोक टोपले, लकीभाऊ जाधव, अनिल दत्तात्रय गभाले, अशोक वाळु गुंबाडे, कांतीलाल किसन जाधव, चंचला प्रभाकर बेंडकुळे, भाऊराव काशिनाथ डगळे, शरद मंगलदास तळपाडे, कैलास सदु भांगरे, निर्मला रमेश गावित, जयप्रकाश शिवराम झोले, बेबीताई तेलम, भगवान रामचंद्र तेलम, विलास शेंगाळ, शंकर जाधव हे उमेदवार रिंगणात आहेत.

सिन्नर विधानसभा मतदारसंघ

सिन्नर विधानसभा मतदारसंघात माघार घेण्याच्या अंतिम दिवशी १० उमेदवारांनी माघार घेतली असून, १२ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, खरी लढत महायुतीचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे आणि महाविकास आघाडीचे उदय सांगळे यांच्यातच होणार आहे. रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये विद्यमान आमदार माणिकराव शिवाजीराव कोकाटे (अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस), उदय पुंजाजी सांगळे (शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस), शरद तुकाराम शिंदे (महाराष्ट्र स्वराज्य पक्ष), किशोर किसनराव जाधव (बसपा), अशोक चंद्रभान जाधव (रासप) हे अधिकृत पक्षांचे तर कैलास विश्वनाथ दातीर, भारत भाऊसाहेब आवारी, सागर दत्तात्रय सांगळे, शरद दामू धनराव, डॉ. राहुल विठ्ठल अहिरे, सागर पांडुरंग सांगळे, माधव गोविंद आव्हाड (सर्व अपक्ष) यांचा समावेश आहे.

निफाड विधानसभा मतदारसंघ

निफाड विधानसभा निवडणुकीत महायुतीचे विद्यमान आमदार दिलीप बनकर आणि महाविकास आघाडीचे माजी आमदार अनिल कदम हे आमनेसामने उभे आहेत. माघारीच्या दिवशी ८ अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती निफाड निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी हेमांगी पाटील यांनी दिली.निवडणुकीत ९ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने आता या उमेदवारांमध्ये लढत होणार असून, खरी लढत आजी-माजी यांच्यात होते की त्यांना जोरदारपणे लढत देणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे गुरुदेव कांदे किती टक्कर देतात, हे पाहणे आता रंजक ठरणार आहे.

कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघ

कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीतून सहा उमेदवारांनी माघार घेतली असून, सात उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.ही निवडणूक पारंपरिक विरोधक महायुतीचे विद्यमान आमदार नितीन पवार व महाविकास आघाडीतील घटकपक्ष माकपाचे उमेदवार माजी आमदार जिवा पांडू गावित यांच्यात लढत रंगणार आहे. मात्र, अपक्ष निवडणूक लढू पाहणारे उमेदवार भाजपाचे सुरगाणा तालुकाध्यक्ष रमेश थोरात यांनी ऐनवेळी महाराष्ट्र स्वराज्य पार्टीची उमेदवारी केल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे. त्यांच्या उमेदवारीचा फटका कोणत्या उमेदवाराला बसेल हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत बहुजन समाज पार्टीकडून प्रभाकर पवार, अपक्ष बेबीलाल पालवी, अपक्ष नितीन उत्तम पवार, प्रा. डॉ. भागवत महाले असे सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

नांदगाव विधानसभा मतदारसंघ

नांदगाव विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होणार असून, विद्यमान आमदार सुहास कांदे, उबाठा सेनेचे गणेश धात्रक, अपक्ष समीर भुजबळ आणि डॉ. रोहन बोरसे यांच्यात मुख्य लढत होणार आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी एकूण १८ उमेदवारांनी माघार घेतली असून प्रत्यक्षात १४ उमेदवार रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीतील भगरे पॅटर्न नांदगाव विधानसभा निवडणुकीत देखील वापरला जाणार असून शिवसेनेचे विद्यमान आमदार सुहास कांदे व उबाठा सेनेचे गणेश धात्रक यांना त्यांचे नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारांचा सामना करावा लागणार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली असली तरी मराठा महासंघाच्या वतीने डॉ. रोहन बोरसे यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली असून, मनोज जरांगे यांच्या आदेशानुसार उमेदवारी अर्ज मागे घेतलेले विशाल वडगुले, नाना बच्छाव, पंकज खताळ, प्रशांत पवार यांनी डॉ. रोहन बोरसे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.तर निवडणूक रिंगणात आमदार सुहास कांदे, उबाठा सेनेचे गणेश धात्रक, अपक्ष समीर भुजबळ आणि डॉ. रोहन बोरसे, तसेच गणेश धात्रक व सुहास कांदे (डमी), अकबर सोनावाला, गौतम गायकवाड, आनंद शिगारे, फिरोज करींम, वाल्मीक निकम, वैशाली व्हडगर, सुनील सोनवणे, हारुण पठाण, हे उमेदवार आहेत.

नाशिक पश्चिम मतदारसंघ

नाशिक पश्चिम मतदारसंघात माकपचे उमेदवार डॉ. डी. एल. कराड, भाजपचे शशिकांत जाधव व दिलीपकुमार भामरे, अपक्ष उमेदवार करण गायकर यांच्यासह एकूण ७ जणांनी माघार घेतल्याने येथे चौरंगी लढत रंगणार आहे. माघारीअंती १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यातही महायुती, महाविकास आघाडीसह मनसे व स्वराज्यच्या उमेदवारांमध्ये चौरंगी लढत रंगणार आहे. तर सीमा हिरे (महायुती), सुधाकर बडगुजर (महाविकास आघाडी), दिनकर पाटील (मनसे), दशरथ पाटील (महाराष्ट्र स्वराज्य पक्ष), भारत सुर्वे (बसपा), अमोल चंद्रमोरे (वंचित बहुजन आघाडी), सतीश आस्वारे (निर्भय महाराष्ट्र पार्टी), शिवाजी खोपे (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया, डेमोक्रॅटिक), आरिफ मन्सुरी, देवा वाघमारे, अॅड. प्रशांत खरे, राजू सोनवणे, शरद पाटील, सचिन गुंजाळ, समाधान पाटील (अपक्ष) हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

देवळाली विधानसभा मतदारसंघ

देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सोमवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घटना घडल्या. त्यामुळे आता देवळाली विधानसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवार आ. सरोज अहिरे, शिवसेना शिंदे गटाच्या डॉ. राजश्री अहिरराव आणि शिवसेना उबाठा गटाचे योगेश घोलप या तिघांमध्ये प्रमुख लढत रंगणार आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी या मतदारसंघातून रामदास उर्फ बाबा सदाफुले, दिलीप मोरे, प्रकाश दोंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सुनील कोथमिरे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली.

नाशिक मध्य मतदारसंघ

नाशिक मध्य मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीतील बंडखोरांनी माघार घेतल्याने ही निवडणूक दुरंगी होणार आहे. मात्र या मतदारसंघाचा काही भाग मुस्लीम बहुल असल्याने या भागातील मुशीर सय्यद यांनीही अपक्ष उमेदवारी केल्याने काँटे की टक्कर होणार आहे. नाशिक मध्यमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार वसंत गिते आणि भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांच्यात होत असलेल्या लढतीत मुशीर सय्यद यांची उपस्थिती निकालावर परिणाम करण्याची शक्यता आहे. नाशिक मध्यमध्ये सुरुवातीला हाय व्होल्टेज ड्रामा होणार असे चित्र होते. मात्र काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे रंजन ठाकरे, गुलजार कोकणी, संभाजी ब्रिगेडचे स्वप्निल इंगळे यांच्यासह प्रमुख उमेदवारांची मनधरणी करून त्यांची माघार घेण्यात दोन्ही गटांना यश मिळाल्याने परस्परांमध्ये होणाऱ्या मतांचे विभाजन रोखणे त्यांना शक्य झाले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये होणारा हा सरळ सामना आता कोणाच्या पारड्यात मतांचे दान टाकतो हे पाहणे महत्त्वाचे आहे. निवडणूक रिंगणात १० उमेदवार असले तरी प्रत्यक्षात हा सामना शिवसेना उबाठाचे वसंत गिते, भाजपच्या देवयानी फरांदे आणि अपक्ष मुशीर सय्यद यांच्यात रंगण्याची शक्यता आहे.

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात एकूण १३ उमेदवार रिंगणात असून दोन जणांनी माघार घेतली आहे. यावेळी मुख्य लढत महायुतीचे विद्यमान आमदार राहुल ढिकले आणि महाविकास आघाडीचे गणेश गिते यांच्यात होणार आहे.
अर्ज माघारीनंतर आता खऱ्या अर्थाने निवडणुकीचा आखाडा चांगलाच रंगणार आहे. दोन-तीन दिवसात राज्य राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्यांच्या प्रचारसभांनी नाशिक चांगलेच तापणार आहे. पूर्व विधानसभा मतदारसंघ गेल्या दशकापासून भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे. यावेळी महाविकास आघाडी आणि महायुती या दोन उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत बघायला मिळणार आहे. तसेच विधानसभा निवडणुकीतून अपक्ष उमेदवार भाऊसाहेब निमसे आणि निलेश मगर यांनी माघार घेतली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या