मालेगाव । प्रतिनिधी Malegaon
हाय व्होल्टेज लढतीमुळे संपुर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत जनसंपर्क, विकासकामे व योजनांची यशस्वी अंमलबजावणी या त्रिसुत्रीवर शिवसेनेचे दादा भुसे यांनी 1 लाख 4 हजार 200 मतांचे दणदणीत मताधिक्य घेत विजय संपादन करत बारा बलुतेदार मंडळाचे अपक्ष उमेदवार बंडुकाका बच्छाव यांच्यासह उध्दव ठाकरे शिवसेनेचे अव्दय प्रशांत हिरे यांचा दारूण पराभव केला. दादा भुसे यांना 1 लाख 58 हजार 152 मते मिळाली तर बंडुकाका बच्छाव यांना 52 हजार 650 मते मिळाली. 39 हजार 819 मते घेत अव्दय हिरे यांनी तिसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. सलग पाचव्यांदा नेत्रदीपक विजय संपादन करत भुसे यांनी शहरासह तालुक्यावर आपलेच प्रभुत्व असल्याचे सिध्द केल्याने परिवर्तनाची आस धरलेल्या विरोधकांना मोठी चपराक बसली असल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघात 17 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले तरी चुरशीची लढत शिवसेनेचे उमेदवार पालकमंत्री दादा भुसे, उध्दव ठाकरे सेनेचे अव्दय हिरे व अपक्ष उमेदवार बंडुकाका बच्छाव यांच्यातच रंगली होती. प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा उमेदवारांनी उडवून देत निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. यामुळे बुधवारी अभुतपुर्व मतदान नोंदविले गेले. े3 लाख 80 हजार 576 पैकी 2 लाख 57 हजार 58 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सुमारे 67.54 टक्के मतदान नोंदविले गेले होते. गत निवडणुकीपेक्षा दहा टक्के मतदान अधिक झाल्याने निकालाबाबत उत्सुकता मतदार संघातच नव्हे तर राज्यात शिगेला पोहचली होती.
महायुतीचा अभुतपुर्व जल्लोष
अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेना महायुतीचे उमेदवार दादा भुसे यांनी 1 लाख 4 हजार 200 मतांच्या विक्रमी मताधिक्याने विजय संपादन करताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोसमपुल, कॅम्परोड, सटाणारोडवर एकच जल्लोष केल्याने हे तिन्ही रस्ते गुलालाने अक्षरश: माखले होते. ढोलताशांच्या गजरात डीजे च्या दणदणाटात वेगवेगळ्या भागातून मिरवणुकांव्दारे जल्लोष करीत कार्यकर्ते मतमोजणी केंद्राकडे येत होते. दादाभुसे यांच्यासह त्यांचे पूत्र अविष्कार व अजिंक्य भुसे हे येताच कार्यकर्त्यांनी अभुतपुर्व जल्लोष करत मुक्तहस्ते गुलालाची उधळण केली.
महायुतीचे पदाधिकारी सुरेशनाना निकम, अॅड. संजय दुसाने, निलेश आहेर, मनोहर बच्छाव, विनोद वाघ, भाजप जिल्हाध्यक्ष निलेश कचवे, प्रांतिक सदस्य लकी गिल, नितीन पोफळे, अजय बच्छाव, प्रमोद निकम, शशिकांत निकम, सुनिल देवरे, रामा मिस्तरी, प्रमोद शुक्ला, कृष्णा ठाकरे, सुरेश त्र्यंबक पवार, प्रमोद पाटील, शरद पाटील, राजेश अलीझाड, आर.डी. निकम, रिपाइं जिल्हाध्यक्ष भारत जगताप, संजय घोडके, अजयमामा मंडावेवाला, सुनिल पवार, केशव पवार, राजेश गंगावणे, जयराज बच्छाव आदींसह हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते या जल्लोषात सहभागी झाले होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा