मुंबई । प्रतिनिधी Mumbai
सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्ष महाविकास आघाडी यांच्यातील निकराच्या राजकीय लढाईत कोण बाजी मारणार याचा फैसला आज, शनिवारी होणार आहे. राज्यातील 288 मतमोजणी केंद्रांवर एकाचवेळी मतांची मोजणी सुरु होईल. या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे. मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जाणार असल्याने आज दुपारपर्यंत नव्या सरकार स्थापनेबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
हे देखील वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : निफाड विधानसभा मतदार संघातील मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज – हेमांगी पाटील
पंधराव्या विधानसभा निवडणुकीसाठी 288 मतदारसंघात 20 नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान झाले. तब्बल 30 वर्षानंतर राज्यात विधानसभेसाठी सर्वाधिक म्हणजे 66 टक्के मतदान झाले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी पाच टक्के मतदान जास्त झाले आहे. या जादा मतदानाचा फायदा नेमका कुणाला होणार याविषयी उत्सुकता आहे. जादा मतदान आपल्याच पारड्यात झाल्याचा दावा महायुती आणि महाविकास आघाडीने केला आहे. विविध संस्थांनी जाहीर केलेल्या मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्षांतील गोंधळामुळे निकालाविषयी अनिश्चितता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी निकालानंतर निर्माण होणार्या संभाव्य परिस्थितीनुसार आपले प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी तयार ठेवले आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया आज सकाळी सहा सहावाजेपासून सुरु होईल. निवडणूक आयोगाचे निरीक्षक, उमेदवार किंवा त्याचे प्रतिनिधी यांच्या समक्ष सीलबंद स्ट्राँग रूम उघडण्यात येतील. तेथून पोस्टल मतपत्रिका आणि मतदान मतमोजणी केंद्रांवर आणले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ शूटिंग केले जाणार आहे. सकाळी आठ वाजता पोस्टाने प्राप्त झालेल्या मतपत्रिकांची मतमोजणी केली जाईल. त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता मतदान यंत्रातील मतांची मोजणी सुरु होईल.
हे देखील वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : सिन्नर विधानसभा मतदार संघातील मतमोजणीसाठी तयारी पूर्ण
मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी निरीक्षक नेमले आहेत . त्यामुळे त्यांच्या निरीक्षणाखाली 288 विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची मतमोजणी होईल, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी शुक्रवारी दिली. याशिवाय नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी दोन निरीक्षकांच्या उपस्थितीत मतमोजणी हाती घेण्यात येणार असल्याचे चोक्कलिंगम यांनी सांगितले.
विधानसभा मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शी असणार आहे. त्यामुळे उमेदवारांचे प्रतिनिधी 17 सी फॉर्मच्या आधारे मतदान यंत्रातील मतांची पडताळणी करू शकतात. जवळपास 6 हजार 500 टेबल्सवर मतमोजणीच्या फेर्या पार पडणार आहेत. सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये टपाल मतपत्रिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे 288 मतमोजणी केंद्रांवर 1 हजार 732 टेबल्स टपाल मतपत्रिकांच्या मतमोजणीसाठी आणि 592 टेबल्स इटीपीबीएमएस स्कॅनिंगसाठी (पूर्व-मोजणीसाठी) उभारण्यात आले आहेत, असे चोक्कलिंगम यांनी सांगितले.
हे देखील वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : कळवण – सुरगाणा मतदार संघातील मतमोजणीची तयारी प्रशासनाकडून पूर्ण
राजकीय पक्षांच्या योजना तयार
विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडीना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संध्याकाळी उशीरा नंदनवन या सरकारी निवासस्थानी आपल्या आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मतदानाचा आढावा घेतला. निकालानंतर आमदारांच्या संख्याबळाच्या आधारे पुढील रणनीती निश्चित केली जाईल, असे शिंदे यांनी आमदारांना सांगितल्याचे समजते. तसेच गरज पडल्यास कोणते अपक्ष आमदार आणि छोटे पक्ष आपल्यासोबत येऊ शकतात, याचे सूतोवाचही त्यांनी केल्याचे सांगण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पक्षातील तसेच अन्य नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन चर्चा केली. तर काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज मुंबईत दाखल घेत नेत्यांशी चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार हे गुरुवारीच मुंबईतील आपल्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यांनी गुरुवारी रात्री उशीरा काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
आमदारांना हैद्राबाद, बंगळुरूला हलविण्याची काँग्रेसची योजना
काँग्रेसने निवडणूक निकाल घोषित झाल्यानंतर आपल्या आमदारांना उद्या, रविवारी मुंबईत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी नागपूर, कोल्हापूर आणि शिर्डीत विशेष विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे. महाविकास आघाडीला बहुमतापर्यंत पोहचता आले नाही आणि विधानसभेचे चित्र त्रिशंकू आल्यास आमदारांना काँग्रेशासित तेलंगणा किंवा कर्नाटकात हलविण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. या काँग्रेस आमदारांसाठी हैद्राबाद किंवा बंगळुरू येथील हॉटेलमध्ये ठेवले जाणार आहे.
तीन निरीक्षकांची नियुक्ती
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि कर्नाटकातील नेते डॉ. जी. परमेश्वरा या यांची निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे. हे निरीक्षक निवडणूक निकालांवर लक्ष ठेवून राहणार आहेत.
हे देखील वाचा–प्रतिक्षा संपली! IPL 2025 चे वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी होणार सुरुवात