Tuesday, November 19, 2024
HomeराजकीयParag Shah Net Worth : राज्यातला सर्वात श्रीमंत उमेदवार भाजपचा; पाच वर्षांत...

Parag Shah Net Worth : राज्यातला सर्वात श्रीमंत उमेदवार भाजपचा; पाच वर्षांत २२८२ कोटींनी वाढली संपत्ती

मुंबई । Mumbai

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात २८८ जागांसाठी निवडणूक होत आहे. यासाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस मंगळवारी होता. शेवटच्या दिवसापर्यंत राज्यात २८८ जागांसाठी जवळपास ८ हजार जणांनी अर्ज दाखल केले आहेत.

- Advertisement -

उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात उमेदवारांनी दिलेली संपत्तीची माहिती लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, भाजपचे मुंबईतील घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार पराग शाह हे राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. विशेष म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही पराग शहा हे राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले होते.

पराग शहा यांनी घाटकोपर पूर्व मतदारसंघातून भाजपाकडून सलग दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला. शहा यांच्याकडे २,१७८.९८ कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर त्यांच्या पत्नीकडे १,१३६.५४ कोटी रुपयांची संपत्ती आहे. यापैकी बहुतेक संपत्ती ही शेअर्स आणि इतर गुंतवणुकीशी संबंधित स्वरुपाची आहे.

शहा यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे. शहा यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेचे मूल्य ३१ कोटी तर, पत्नीच्या नावावर असलेल्या मालमत्तेचे मूल्य ३४.१७ कोटी रुपये आहे. शहा यांच्यावर एक लाख रुपयांचे तर, पत्नीच्या नावावर ३६.९० लाख रुपयांचे कर्ज आहे.

२०१९शी तुलना केली तर शहा यांच्या संपत्तीत दहापटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यावेळी शहा यांनी २३९ कोटी रुपयांची तर, पत्नीच्या नावावर १६० कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. तर कौटुंबिक संपत्ती २३ कोटी रुपयांची होती. त्यांच्याकडे असलेल्या स्थावर मालमत्तेचे मूल्य ३० कोटी तर पत्नीच्या नावे मालमत्तेचे मूल्य ३६.६४ कोटी रुपये होते.

कोण आहेत पराग शाह?

पराग शाह हे घाटकोपर मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार आहेत. शाह हे रिअल इस्टेट डेव्हलपर आहेत. गुजरात आणि चेन्नईमध्ये त्यांचे गृहनिर्माण प्रकल्प मोठ्या प्रमाणावर आहेत. २०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांनी ६९० कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. त्यांची पत्नी मानसी यांच्याकडंही कोट्यवधींची संपत्ती असून त्यात व्यावसायिक, निवासी आणि कृषी मालमत्तांचा समावेश आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या