Friday, November 22, 2024
HomeनाशिकNashik Political : बहिणीला ओवाळणी म्हणून आमदारकी देऊ - जाधव

Nashik Political : बहिणीला ओवाळणी म्हणून आमदारकी देऊ – जाधव

‘मविआ’च्या उमेदवार सुनीता चारोस्कर यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मोहाडी । प्रतिनिधी | Mohadi

लगतच्या तालुक्याचा विकास बघता आपल्या मतदारसंघातील विकास खुंटला आहे. फक्त कोट्यवधींचा निधी आणला असल्याचे सांगत विकासाच्या गप्पा मारल्या जातात. परंतु दिंडोरीचा विकास गेला कुठे? हा प्रश्न आम्हाला पडला आहे. यंदाच्या या दिवाळीला आपल्या बहिणीला दिवाळीनिमित्त मतदानरुपी आशीर्वाद देऊन आमदाराकीची ओवाळणी आपली बहीण सुनीताताई चारोस्कर यांना देऊ, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी गटनेते तथा मविप्र संचालक प्रवीणनाना जाधव यांनी केले.

- Advertisement -

महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सुनीता रामदास चारोस्कर यांचा मोहाडी जिल्हा परिषद गटामध्ये प्रचार दौरा झाला. या प्रचार दौर्‍याला नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. गटातील जऊळके दिंडोरी, जानोरी, मोहाडी, कुर्णोली, खडकसुकेणे, कोर्‍हाटे, अक्राळे, तळेगाव दिंडोरी, वनारवाडी, अवनखेड, पिंपळगाव केतकी, पालखेड बंधारा, गणेशगाव, आंबेदिंडोरी, शिवनई, वरवंडी, खतवड, ढकांबे या गावांमध्ये महाविकास आघाडीचे नेते श्रीराम शेटे, खासदार भास्कर भगरे, दत्तात्रय पाटील, राजेंद्र ढगे, प्रकाश पिंगळ, पांडुरंग गणोरे, रमेश चौधरी, आप्पा वटाणे यांच्या प्रमुख प्रमुख उपस्थितीत गावोगावी कार्यकर्ता संवाद मेळावा झाला.यावेळी प्रवीणजाधव बोलत होते.

प्रवीण जाधव म्हणाले की, महायुती सरकारने आतापर्यंत विकासाऐवजी खासगीकरणावर जास्त भर दिला. जातीपातीचे राजकारण करून धार्मिक व जातीवाद निर्माण केले. लोकसभेप्रमाणे यंदाही आपण सर्व वैचारिक विचारसरणीतून एकत्र येण्याची गरज असून लोकसभेप्रमाणे विधानसभेतही महायुतीला पराभवाची धूळ चारण्याची आज वेळ आली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सुनीताताई चारोस्कर यांना प्रचंड मताांनी विजयी करण्याचे आवाहन प्रवीणनाना जाधव यांनी केले. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, युवक, महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उमेदवार सुनीता चारोस्कर यांनी प्रत्येक गावातील मतदारांपर्यंत पोहोचत संवाद साधला. ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद घेऊन त्यांनी अनेकांची मने जिंकली. महिला वर्गामध्ये संवाद साधत एक आपलेपणाची भावना निर्माण करण्यात सुनीता चारोस्कर यशस्वी ठरल्या आहेत.

महायुतीचे धोरण आंबेडकरी समाजाला न पटणारे : लोखंडे

काल महायुतीचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांच्या एका कार्यक्रमात बोलताना एक रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते संतोष लोखंडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, संपूर्ण आंबेडकरी समाज हा महायुती किंवा घड्याळ म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार पक्षासोबत आहे. असे काही नसून आंबेडकरी समाज हा पुरोगामी विचार मानून शाहू-फुले- आंबेडकर यांच्या विचारांसोबत राहतो. भाजप हा सामाजिकदृष्ट्या आंबेडकरी समुदायाचे खच्चीकरण करणे अथवा संविधान विरोधी भूमिका घेणारा असल्याची बाब आंबेडकरी समाजाला कधीही न पटणारी आहे. त्यामुळे एका व्यक्तीने केलेले वक्तव्य व मांडलेली भूमिका ही समाजाची भूमिका नसून ती स्वतःची वैयक्तिक भूमिका आहे, असे मला वाटते.

‘मलिदा गँग’ पोसण्यासाठी विकास का? : दत्तात्रय पाटील

विकासाच्या नावाखाली मतदारसंघात निव्वळ थोतांड सुरू आहे. विद्यमान आमदार विधानसभेच्या उपाध्यक्षपदी पोहोचल्यावर मतदारसंघात मोठा विकास येईल अशा अपेक्षा होत्या. परंतु विद्यमान आमदारांनी विकासासाठी योगदान दिले नाही. मतदारसंघातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. आरोग्याचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला आहे. रस्त्यांची कामे अर्धवट झालेली आहेत. जी झाली ती पण निकृष्ट दर्जाची झाली आहेत. ठेकेदारांकडून टक्केवारी घेण्यासाठी आणि त्यांना पोसण्यासाठी विकासकामे सुरू आहेत का? असा प्रश्न विचारत मतदारसंघात फक्त ‘मलिदा गँग’ पोसण्यासाठी विकास आणला आहे का? असा संतप्त सवाल दिंडोरी लोकसभा कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी केला आहे.

दिंडोरीत पहिल्यांदाच आपल्या बहिणीला उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे या बहिणीला विधानसभेत पाठवण्याची जबाबदारी आपली आहे. दिंडोरी-पेठ विधानसभेचा खर्‍या अर्थाने विकास करायचा असेल तर आपल्याला कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी निवडून देणे अपेक्षित आहे. निव्वळ गप्पा मारणे व लग्नकार्यामध्ये नाचकाम करणारे लोकप्रतिनिधी आपल्याला नकोच. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार सुनीताताई चारोस्कर कर्तृत्ववान महिला असून जिल्हा परिषदेच्या माजी समाजकल्याण सभापती म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. आपल्या सर्वांच्या अपेक्षा त्या पूर्ण करण्यात सक्षम असल्याने तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभा कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी केले आहे.

डुप्लिकेट उमेदवार उभा करून मत विभाजनाचा डाव : श्रीराम शेटे

दिंडोरी लोकसभा निवडणुकीत भास्कर भगरे यांच्या विरोधात तिसरी पास भगरेला सर ही पदवी देऊन लाखांच्या वर मते विभाजन करण्यात विरोधक यशस्वी झाले होते. यंदा पुन्हा तोच डाव आखत ड्युप्लिकेट उमेदवार उभा करण्यात आला आहे. परंतु आता मतदारसंघातील जनतेजवळ आपले चिन्ह पोहोचवण्यात आपण यशस्वी होऊन त्यांचा डाव उधळून लावण्याचे आवाहन ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांनी केले. हे सरकार उद्योगपतींचे कर्ज माफ करणारे सरकार आहे. शेतकर्‍यांप्रती त्यांना आस्था नाही. ग्राहक आणि शेतकर्‍यांना समान न्याय देणारे सरकार आपल्याला अपेक्षित आहे. यंदा महाविकास आघाडीचीच सत्ता राज्यात येणार असल्याने आपल्या मविआच्या उमेदवार सुनीताताई चारोस्कर या दिंडोरी-पेठ विधानसभेच्या प्रथम महिला आमदार म्हणून विधानसभेमध्ये प्रवेश करणार असल्याचा विश्वास श्रीराम शेटे यांनी व्यक्त केला. तसेच सुनीताताई चारोस्कर यांना भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन श्रीराम शेटे यांनी केले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या