Sunday, October 27, 2024
HomeनाशिकNashik Political : भुजबळ, झिरवाळ आणि कोकाटेंविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून...

Nashik Political : भुजबळ, झिरवाळ आणि कोकाटेंविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ‘या’ बड्या नेत्यांना उमेदवारी

नाशिक | Nashik

राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचा (Mahayuti and Mahavikas Aagahdi) अजूनही काही जागांवरील तिढा सुटलेला नाही. मात्र, दोन्ही युती-आघाड्यांतील घटक पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात येत आहे. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी (Candidate List) जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पत्रकार परिषदेत पक्षाची दुसऱ्या यादीची घोषणा केली. या यादीत नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे यांच्याविरोधातील उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून रिंगणात उतरविण्यात आले आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : मोठी बातमी! भाजपची दुसरी यादी जाहीर; ‘नाशिक मध्य’चा उमेदवार ठरला

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) (NCP Ajit Pawar) पक्षातील नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याविरोधात येवला विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कुणाला उमेदवारी दिली जाते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. कारण भुजबळ यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि मराठा आरक्षणाबाबत वारंवार केलेल्या विधानामुळे ते चर्चेत आले होते. त्यानंतर आता या मतदारसंघातून शरद पवारांनी माणिकराव शिंदे यांना उमेदवारी जाहीर करत मराठा उमेदवार रिंगणात उतरविला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष आणि विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुनिता चारोस्कर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

हे देखील वाचा : मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी उमेदवार यादी जाहीर; कुणाला मिळाली संधी?

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्याविरोधात सिन्नर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शीतल सांगळे यांचे पती आणि सिन्नर पंचायत समितीचे माजी गटनेते उदय सांगळे (Uday Sangle) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे येवला, दिंडोरी आणि सिन्नर या तिन्ही विधानसभा मतदारसंघांत ‘तुतारी विरुद्ध घड्याळ’ असा सामना रंगणार आहे.

हे देखील वाचा : Nashik Political : भाजपचा नेता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या गळाला; नाशिक पूर्वमधून उतरणार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

तर नाशिक पूर्व मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार राहुल ढिकले (Rahul Dhikale) यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे निकटवर्तीय गणेश गीते (Ganesh Gite) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गीते यांनी आजच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर लगेचच त्यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. तसेच बागलाण विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार दीपिका चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांचा सामना भाजपचे विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांच्याशी होणार आहे. त्यामुळे या लढतींमध्ये कोण बाजी मारतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या